मराठी बोलींचे सर्वेक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:56 AM2018-04-22T06:56:38+5:302018-04-22T06:56:38+5:30

भाषेचे जसे एक शास्त्र आणि व्याकरण असते, तसेच बोलींचेही व्याकरण असते; मात्र हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आत्तापर्यंत कुणीही अभ्यास केला नाही.

Marathi bidding survey will be conducted | मराठी बोलींचे सर्वेक्षण होणार

मराठी बोलींचे सर्वेक्षण होणार

googlenewsNext

पुणे : प्रत्येक गावाची एक भाषा आणि बोली असते. जसे भाषेचे व्याकरण असते, तसे बोलीचेही असते. याच मराठी बोलींचा अभ्यास करण्यासाठी ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण’ (२०१७-२०२०) हा प्रकल्प डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था व राज्य मराठी विकास संस्था यांनी हाती घेतला आहे. मराठी बोलींचे व्याकरण काय आहे? त्यासंबंधी मराठी भाषेतील भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आढळणाऱ्या काही निवडक व्याकरणिक विशेषांचे भाषावैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करणे आणि भाषिक नकाशे तयार करणे या प्रकल्पातील महत्त्वपूर्ण टप्प्प्यांमुळे भविष्यात अभ्यासक आणि संशोधनाचा निश्चितच उपयोग होणार आहे.
या प्रकल्पाच्या निमित्ताने डेक्कन कॉलेजमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप शुक्रवारी झाला. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी प्रकल्पाची घोषणा केली. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर उपस्थित होते. या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ राज्य मराठी विकास संस्थेने दिले आहे. डेक्कन कॉलेजचे उप-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे आणि मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्र. ना. परांजपे आदी या वेळी उपस्थित होते. प्रकल्पाच्या प्रमुख भाषाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी आहेत.
भाषेचे जसे एक शास्त्र आणि व्याकरण असते, तसेच बोलींचेही व्याकरण असते; मात्र हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आत्तापर्यंत कुणीही अभ्यास केला नाही. तो करण्यासाठीच या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असल्याचे सांगून प्रकल्पाच्या प्रमुख भाषाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी म्हणाल्या की, भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलींचा अभ्यास क्वचित होतो.

भाषिक नकाशे होणार
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन स्थळ आणि वयोमानानुसार मराठीच्या व्याकरणामधील विविधता जाणून घेतली जाणार आहे. भाषिक नकाशे तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पात प्रत्यक्ष क्षेत्रपाहणी करणे, मुलाखती घेऊन भाषिक नमुने मिळविणे, त्यांचे प्रतिमांकन आणि भाषावैज्ञानिक विश्लेषण करणे या टप्प्यांतून हे काम पूर्ण केले जाणार आहे. प्रकल्पात तंत्रज्ञानाचा आणि सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे.

Web Title: Marathi bidding survey will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी