पुणेकरांनी अनुभवला मणिकांचन योग : गानसरस्वती महोत्सव; किशोरी आमोणकर यांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:06 PM2018-02-03T13:06:35+5:302018-02-03T13:10:18+5:30

कातरवेळी वातावरणाने पांघरलेली शीतलतेची दुलई, तितक्याच शीतलतेने मनात रुंजी घालणारे स्वर, सुरांमधून अवतरलेले वेणूपर्व असा मणिकांचन योग कानसेनांनी अनुभवला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची उणीव रसिकांना अस्वस्थ करून गेली. 

Manikanchan Yog : Pune Gansaraswati Festival; Salute to Kishori Amonkar | पुणेकरांनी अनुभवला मणिकांचन योग : गानसरस्वती महोत्सव; किशोरी आमोणकर यांना मानवंदना

पुणेकरांनी अनुभवला मणिकांचन योग : गानसरस्वती महोत्सव; किशोरी आमोणकर यांना मानवंदना

Next
ठळक मुद्दे२ ते ४ फेब्रुवारी दरम्यान गानसरस्वती महोत्सवाचे आयोजननाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर महोत्सव

पुणे : कातरवेळी वातावरणाने पांघरलेली शीतलतेची दुलई, तितक्याच शीतलतेने मनात रुंजी घालणारे स्वर, सुरांमधून अवतरलेले वेणूपर्व असा मणिकांचन योग कानसेनांनी अनुभवला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची उणीव रसिकांना अस्वस्थ करून गेली. 
नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन केले आहे. जयपूर घराण्याच्या गायिका अपर्णा पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनाने गानसरस्वती महोत्सवास प्रारंभ झाला. त्यांनी ‘तेरे बिरहा’ या रचनेतून भीमपलास रागाचा विस्तार केला. डमरू डमडम बाजे, सुंदर अंगना बैठी या रचनांमधून रसिकांवर सुरांची बरसात झाली. त्यांना श्रीकांत भावे (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), संपदा बेलवलकर (तानपुरा), आरती पटवर्धन (तानपुरा), माधवी घुमटकर (गायन) यांनी सुरेल साथसंगत केली. त्यांच्यानंतर बासरीवादक शशांक सुब्रह्मण्यम यांच्या कर्नाटक शैलीतील बासरीवादनातून वातावरणात सुरेल रंग भरले. त्यांनी हेमवती राग सादर केला. आलाप, जोड, झालाशी सुसंगत रागम, तानम सादरीकरणानंतर पल्लवीतून तीनतालातील दोन रचना सादर केल्या. त्यांना पं. योगेश समसी (तबला), पत्री सतीश कुमार (मृदंग), शुभम खंडाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खाँ यांच्या स्वरमैफलीने समारोप झाला.  

...आता दुसरी किशोरी आमोणकर होणे नाही!
पुणे : आई लोकानुरंजनासाठी कधीच गायली नाही. संगीत अध्यात्म, शांततेकडे नेणारे असते, असेच तिचे मत होते. सुगरणीच्या हातचे जेवल्यावर इतर कोणतेच पदार्थ रुचकर लागत नाहीत. त्याचप्रमाणे लहानपणापासून आईचे स्वर कानावर पडल्यामुळे बेसूर गाण्यांचा त्रास होतो. आईची संगीताप्रति श्रद्धा, गुरूवरचा विश्वास, रियाझ आणि साधना विलक्षण आहे. आता दुसरी किशोरी आमोणकर होणे नाही, अशा शब्दांत निहार आणि बिभास आमोणकर यांनी आईच्या आठवणी कथन करताना त्यांना गहिवरून आले होते. आईबद्दल लिहिण्याची ताकदही नाही, असे सांगत त्यांनी भावनांना वाट करून दिली. 


किशोरीतार्इंच्या नावाच्या मंचावर सादरीकरण करताना मनात भीती आहेच; मात्र, प्रेक्षक सांभाळून घेतील, हा विश्वासही वाटतो.
- अपर्णा पणशीकर


किशोरीतार्इंकडून आयुष्यभर प्रेरणा मिळत राहिली. त्यांच्या सादरीकरणाच्या स्मृती जपलेल्या रंगमंचावर आज सादरीकरणाची संधी मिळत आहे. पुण्यातील रसिकांसमोर सादरीकरण करणे, हा कायम सन्मान असतो.
- शशांक सुब्रमण्यम 


आपल्याकडे संगीतातील अनेक घराण्यांची परंपरा आहे. प्रत्येक जण आपापले कलश कवटाळून बसतो. संगीत हा त्या पलीकडचा महासागर आहे. सर्वांनी एकत्र आल्यास संगीताचे महाकाय रूप प्रत्येक घराण्याच्या दृष्टिकोनातून अनुभवता येईल, अशी ‘सहेला रे’ मागील संकल्पना होती.  
- अमोल पालेकर


मी ३-४ वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा किशोरीताई होत्या. आज प्रकर्षाने त्यांची उणीव जाणवत आहे. त्यांचे गायन आजही मनात आहे.    
- उस्ताद रशीद खाँ

Web Title: Manikanchan Yog : Pune Gansaraswati Festival; Salute to Kishori Amonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे