बिघडलेल्या पदार्थांतून बनवा या भन्नाट रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:07 PM2018-03-16T14:07:30+5:302018-03-16T14:07:30+5:30

स्वयंपाक करणं कला आहे. पण एखाद्यावेळी पदार्थ चुकतो आणि सारं काही बिघडतं. अशावेळी निराश न होता बिघडलेल्या पदार्थातून तुम्ही दुसरा पदार्थ बनवला तर तुम्हालाही 'मास्टर शेफ' म्हणून ओळखलं जाईल.

Make the tasty recipe from spoiled food | बिघडलेल्या पदार्थांतून बनवा या भन्नाट रेसिपी 

बिघडलेल्या पदार्थांतून बनवा या भन्नाट रेसिपी 

Next
ठळक मुद्देलाडू, चकली, ढोकळा बिघडला तर काळजी नको दाखवा थोडी हुशारी आणि बनवा भन्नाट रेसिपी

पुणे :

अनेकदा स्वयंपाक करताना केवळ नवशिक्या नव्हे तर तरबेज असणाऱ्या व्यक्तीकडूनही पदार्थ बिघडतात. अशावेळी फजिती जगासमोर येण्याची भीती असते. त्यापेक्षा त्यात थोडासा बदल करत आणि घरातले पदार्थ वापरत काही बदल केले तर नवीन आणि चवदार परार्थ बनवून तुम्ही घरच्यांना आश्चर्याचा धक्का देऊ शकता. 

भात :

मोकळा, सुटसुटीत आणि पूर्ण शिजलेला भात बनविण्याची प्रत्येकाची ईच्छा या असते. पण एखाद्यावेळी भात थोडा कच्चा झाला किंवा पातळ झाला तर घाबरण्याचे कारण नाही. कांदा, टोमॅटो आणि लसणाचा तडका देवून त्याच भातात गरम पाणी टाकले तर उत्तम दाल खिचडीसारखा पदार्थ तयार होवू शकतो. त्यात शिजलेली डाळ घातली तर दालखिचडी तयार होते. 

ढोकळा :

काहीवेळा ढोकळा फुगला नाही तर कुकरमध्ये फक्त आंबट चवीच्या वड्या शिल्लक राहतात. अशावेळी कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, मश्ररूम यांचे आवडीनुसार काप आणि टोमॅटो, शेजवान सॉस टाकून वड्या फ्राय केल्या तर उत्तम स्टार्टर तयार होऊ शकतो. ऐनवेळी चीजही किसून टाकता येईल. 

बेसनाचे लाडू :

तूप जास्त किंवा कमी झाले तर बेसन  लाडू बिघडू शकतात. अशा वेळी दोन चमचे लाडवाचे बाकर वाटीत घेऊन त्यावर थंड आणि आटवलेले दूध टाका. मात्र लाडवात साखर असल्याने दुधात साखर टाकू नका. सर्व्ह करताना शोभेसाठी ड्रायफ्रूटचे तुकडे आणि केशर सिरप टाका, झकास डेझर्ट तयार होईल. 

पोळी :

वातड पोळ्या चावतानाही त्रास होतो. अशावेळी पोळी गॅसवर पूर्ण कडक करून घ्यावी. पोळीचे हव्या त्या आकारात मध्यम  तुकडे करून त्यावर घट्ट दही, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर  आणि बारीक शेव भुरभुरावा. चटपटीत रोटीचाट तयार होईल. 

चकली :

चकल्या करताना बऱ्याचवेळा त्या मऊ किंवा कडक होतात. अशावेळी तेल निथळून चकल्या मिक्सरमध्ये फिरवून आवश्यकतेनुसार पाणी टाकून पूर्ण पेस्ट करा. त्यात मावेल तेवढे गव्हाचे पीठ टाकून मऊ आणि खुसखुशीत पराठे करता येतात. 

 

 

Web Title: Make the tasty recipe from spoiled food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.