Local losses in Koregaon Bhima crash; the villagers complaint about social media | कोरेगाव भीमा दुर्घटनेत स्थानिकांचे नुकसान; सोशल मीडियामुळे गावाची बदनामी, ग्रामस्थांची तक्रार

ठळक मुद्देकोरेगाव भीमामध्ये तिसऱ्या दिवशीही जमावबंदी, काही प्रमाणात जनजीवन सुरळीत सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण कोरेगाव भीमाचेच नाव बदनाम

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरुर) येथे झालेल्या दंगलीमध्ये स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कारण नसताना गावचे सोशल मीडियावर नाव बदनाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी करतानाच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आम्ही स्वागतच करु, असे आश्वासन बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी दिली. 
कोरेगाव भीमामध्ये तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागू आहे. आज काही प्रमाणात जनजीवन सुरळीत चालू झाले असूनही गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर व सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण कोरेगाव भीमाचेच नाव बदनाम होत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरुन मंगळवारी (दि.२) रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्यात कोरेगाव भीमा येथील मराठा व बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमेश गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 
या बैठकीत दोन्ही समाजांनी गावात एकोपा असल्याचे व विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे स्वागतच होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस घोडगंगेचे माजी संचालक विठ्ठल ढेरंगे, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, राष्ट्रवादीचे नारायण फडतरे, विक्रम गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक गव्हाणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, सरपंच संगिता गव्हाणे, उपसरपंच कल्पना गव्हाणे, विजय गव्हाणे, अशोक काशिद, केशव फडतरे, अरविंद गव्हाणे, उमेश गव्हाणे, विक्रम दौंडकर, बबन गव्हाणे, संपत गव्हाणे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, वृषाली गव्हाणे आदी उपस्थित होते. 
विठ्ठलराव ढेरंगे यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत कोरेगाव ग्रामस्थांचा कसलाही संबंध नसताना गावचे नाव बदनाम होत आहे. यापूर्र्वी विजयस्तंभास मानवंदना देण्यात येणाऱ्या अनुयायांनासुविधा पुरविण्यातच येत होत्या. यापुढेही त्यांचे स्वागतच करण्यात येईल. स्थानिक ग्रामस्थांचे बाहेरच्या लोकांनी मोठे नुकसान केले असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बौद्ध समाजाच्यावतीने राजेंद्र गवदे, भाऊसाहेब भालेराव, सचितानंद कडलक व इतर ग्रामस्थांनीही कोरेगावच्या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितले, की समाजकंटकाच्या चिथावणीवरुन वादाची ठिणगी पेटली असून गावच्या लोकांचेच यात मोठे नुकसान झाले. गावचे नाव वापरुन लोक गैरफायदा घेत असल्याचे सांगत उलट सवर्ण व दलित समाजाच्या लोकांनी मिळून महिला, मुलांचे संरक्षण केल्याचे सांगितले. 
दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्र बैठक घेतल्याने गावातील वातावरण सुरळीत होण्यास मदत मिळाली असून गावातील प्रत्येक गोष्टीवर पोलीस प्रशासनाचे बारिक लक्ष ठेवून असून तिसऱ्या दिवशीही गावामध्ये जमावबंदी लागू आहे. आज काही प्रमाणात गावातील व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.