The literature is a meeting of publishers? | साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल?

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दरवर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान केला जात आहे. महामंडळाची प्रकाशकांबाबतची भूमिका उदासीन झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रंथप्रदर्शनाची जबाबदारी महामंडळाऐवजी प्रकाशकांनी उचलण्याच्या सूचनेचे यंदा काय होणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
प्रकाशन व्यवसाय हा साहित्य व्यवहाराचा अविभाज्य भाग असल्याने साहित्य संमेलनांमध्ये प्रकाशकांना दर वर्षी सामावून घेतले जाते. केवळ संमेलनांपुरतेच नव्हे; तर वर्षभर प्रकाशन वाङ्मयीन व्यवहाराशी संबंधित असतात. साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथविक्रीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते, वाचनसंस्कृती जोपासली जाते. साहित्यिक आणि प्रकाशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलनामध्ये एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सन्मान करण्याची परंपरा चालत आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकाशकांना या परंपरेतून डावलले जात असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे.
दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुण्यातून नागपूरला गेले. त्यानंतर डोंबिवलीतील संमेलनात लेखक म्हणून डॉ. जयंत नारळीकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रकाशकाऐवजी प्रकाशनाशी संबंधित चेहरा अशी ओळख असलेले मुखपृष्ठाची दखल घेण्याच्या दृष्टीने बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. बडोदा येथे होत असलेल्या आगामी ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लेखक श्याम मनोहर यांचा, तर संपादक गंगाधर पानतावणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाही प्रकाशक सन्मानापासून दूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनाचा वाटा मोलाचा असतो. प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचक संमेलनाला हजेरी लावतात, पुस्तकांशी त्यांचा संबंध येतो. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथविक्री घटली होती. त्या वेळी ग्रंथप्रदर्शन हे केवळ विक्रीसाठी नसते, वाचकांनी येऊन पुस्तके पाहावीत, हा त्यामागचा हेतू असतो, असे मत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशकांचा सन्मान केला जातो. महामंडळाच्या सभेमध्ये हा विषय चर्चिला जाणे आवश्यक आहे. महामंडळात एखादी व्यक्ती स्वत:चा अजेंडा राबवणार असेल तर ते योग्य नाही. प्रकाशक हा साहित्यिकाशी सर्वांत जवळचा घटक आहे. प्रकाशक वर्षभर वाङ्मयीन व्यवहारात सहभागी होतात. शासनातर्फेही दर वर्षी प्रकाशकांना गौरवले जाते. महामंडळाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेत बदल करू नये, असे वाटते.
- अरुण जाखडे, प्रकाशक

घुमानच्या संमेलनात मराठी वाचकच संमेलनाला येणार नसेल, तर पुस्तकांची विक्री कशी होणार, या मुद्द्यावरून प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.
कालांतराने तो रद्द करण्यात आला. आगामी संमेलन बडोद्याला होत असताना प्रकाशकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.