literature on child; highlight & introduction about family from 'Minoo's Manogat' | चिमुरड्यांचे संवादकाव्य पुस्तकरुपातच; ‘मिनूचे मनोगत’मधून कुटुंबाची ओळख

ठळक मुद्देविविध प्रकारचे साहित्य चिमुरड्यांसाठी करुन दिले उपलब्धमुलांना वाचनाची गोडी लागेल : संगीता बर्वे

पुणे : ‘पहिल्यांदाच सांगते स्पष्ट, चिनूबद्दल लिहिताना मी खूप घेतलेत कष्ट, पण हे गद्य की पद्य? काही समजत नाहीये बाई! लिहिलंय चांगलं, असं म्हणाली आई’ अशा शब्दांत आपलं म्हणणं मांडणारी मिनू प्रत्येकाला आपल्याच घरातली चिमुरडी आहे, असं प्रत्येकालाच वाटेल. लहान मुलांचे भावविश्व त्यांच्या संवादातून व्यक्त होत असते. चिमुरड्यांचे हेच संवादविश्व पुस्तकाच्या रुपाने वाचकांच्या भेटीला आले आहे. ‘मिनूचे मनोगत’ मधून आज दुर्मीळ होत असलेले भावंडांचे नातेसंबंध आणि कुटुंबाची करुन दिलेली ओळख अशी संकल्पना रंगवण्यात आली आहे.
सध्याच्या काळात बालसाहित्यामध्ये खूप कमी लिखाण होत आहे, असे म्हटले जाते. मात्र, ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी या समजाला छेद देत विविध प्रकारचे साहित्य चिमुरड्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. पियूची वही, नलदमयंती आणि इतर कथा यानंतर त्यांनी ‘मिनूचे मनोगत’ या पुस्तकातून लहान मुलांसाठी संवादकाव्य हा नवा प्रकार हाताळला आहे. 
संवादकाव्य गमभन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या नव्या काव्यप्रकारामुळे मुलांना वाचनाची गोडी लागेल आणि त्यांच्याच भावना त्यांच्याच शब्दात मांडल्याने त्या आपल्याशा वाटतील. मुलांना वाचनातील, साहित्यातील अभिरुची वृध्दींगत करायची असेल तर विविध साहित्यप्रकारातून त्यांचे भावविश्व रेखाटायला हवे, अशी गरज संगीता बर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
एक छोटी मुलगी संवादकाव्याच्या रुपाने तिच्या छोटया बहिणीबद्दल लाडिक गोड तक्रारी सांगते आणि त्याचबरोबर कुटुंबाची ओळख करुन देते. ‘स्वल्पविराम, अर्धविराम, अवतरणचिन्ह, उदगारचिन्ह, कुठे नि काय द्यायचं सगळं काढलं शोधून, आईशपथ! खूप अभ्यास करुन’ अशा शब्दांत चिमुरडीने मांडलेली कैैफियत असून, दीपक संकपाळ यांनी पुस्तकातील चित्रे रेखाटली आहेत. सोशल मीडिया, तसेच शाळांच्या माध्यमातून हे पुस्तक घरोघरी पोचवले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.