खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 08:40 PM2018-12-15T20:40:49+5:302018-12-15T20:43:07+5:30

ठाकूर पिंपरी परिसर डोंगरालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Leopard arrest by forest department at Thakur Pimpri in Khed taluka | खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद

खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देअखेर रेस्क्यू पथकाने साहसाने बिबट्याच्या जवळ जात त्याला केले बेशुद्ध

आंबेठाण/ वाकी बुद्रुक : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाकूर पिंपरी (ता. खेड) येथे भरदिवसा शिकारीच्या शोधात असलेला बलदंड बिबट्या शनिवारी फिरत होता, याची माहिती येथील वनविभाग व माणिकडोहमधील बिबट्या निवारा केंद्राला मिळाली. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने सापळा लावला. मात्र, बिबट्या हुलकावणी देत होता. अखेर रेस्क्यू पथकाने साहसाने बिबट्याच्या जवळ जात त्याला बेशुद्ध केले. यानंतर वनखात्याने त्याला जेरबंद केले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 


ठाकूर पिंपरी परिसर तसा महामार्गावरून आडवळणी आणि डोंगरालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या या परिसरात नागरिकांना आढळून आला होता. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती येथील वनविभागाचे कर्मचारी आणि जुन्नर बिबट्या निवारा केंद्राच्या जवानांना कळविली. त्यामुळे संबंधित ठिकाणी मोठ्या धाडसाने त्यांनी सापळा लावला. बिबट्या निवारण केंद्राच्या जवानांनी त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून बिबट्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर चित्तथरारक बचावकार्य सुरू केले. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास ठाकुर पिंपरी गावकऱ्यांना हा बिबट्या दिसला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यांनी ही माहिती वनविभाग आणि जुन्नर बिबट्या निवारा केंद्राच्या जवानांना याबाबतची माहिती कळवून त्यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. संबंधित विभागाचे कर्मचारी येथे क्षणाचाही विलंब न करता अल्पावधीत आले. मात्र, जवान व कर्मचारी येथे दाखल होईपर्यंत हा बलदंड बिबट्या येथे घनदाट दाट झुडपांमध्ये दडून बसला.त्यामुळे त्याचा शोध घेणे जिकीरीचे होऊन बसले होते.  
मात्र, रेस्क्यू पथकाने संबंधित ठिकाणी रातोरात सापळा लावला. दरम्यानच्या काळात बिबट्या पाहण्यासाठी या परिसरात बघ्यांची तुडुंब गर्दी झाली होती. माणसांच्या आवाजाने बिबट्या झुडपातच निपचित बसून राहिला. त्यामुळे येथील नागरिक रात्रभर जागून राहिले. सापळा लावूनही बिबट्या हातातून निसटला, तर मोठा धोका निर्माण होईल, या भीतीने नागरिक भयभीत झाले होते. रेस्क्यू टीमला  त्याला जिवंत बिबट्या जेरबंद करण्यात झुडपांचा अडसर येत होता. बराच वेळ झाला तरी बिबट्या झुडपातून बाहेर येत नसल्याने तो आजारी असल्याचे लक्षात आले. थंडीमुळे बिबट्या बेशुद्ध पडला असावा, याची खात्री होताच त्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीमचे दोन जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून बिबट्या ज्या ठिकाणी दडून बसला आहे, त्या ठिकाणी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्याला डॉट मारण्यात आले. बिबट्या बेशुद्ध पडल्याची पक्की खात्री होताच सर्वांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. यानंतर त्याला जुन्नर येथील बिबट्या निवारा केंद्रात नेण्यात आले. 
--------------------------------------------------

ठाकूर पिंपरी येथून बलदंड बिबट्याला मोठ्या चित्तथरारक परिस्थितीत आणि बेशुद्धावस्थेत ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात तातडीचे उपचार सुरू करण्यात आले.
 - डॉ. विकास देशमुख, जुन्नर बिबट्या निवारा केंद्राचे अधिकारी 
----------------------------------------------
 
"  कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वन्यप्राणी आढळून आल्यास नागरिकांनी मुळीच घाबरून जाण्याचे कारण नाही, तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याची गरज आहे. 
 

Web Title: Leopard arrest by forest department at Thakur Pimpri in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.