‘दहावी’ची लढाई जिंकून ‘कृष्णा’ गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:38 AM2018-06-14T01:38:16+5:302018-06-14T01:38:16+5:30

एकीकडे जगण्याची लढाई... दुसरीकडे अभ्यासाची लढाई... असाध्य रोगाशी तब्बल १२ वर्ष झुंज... आईवडिलांची त्याला असलेली खंबीर साथ... आजारपणाच्या वेदना सहन करीतच त्याने दिली दहावीची परीक्षा... मात्र, हा निकाल पाहायला ‘तो’ या जगात नव्हता...

Krishna Passes away after Winning the battle of 'SSS' | ‘दहावी’ची लढाई जिंकून ‘कृष्णा’ गेला

‘दहावी’ची लढाई जिंकून ‘कृष्णा’ गेला

Next

लोणी काळभोर : एकीकडे जगण्याची लढाई... दुसरीकडे अभ्यासाची लढाई... असाध्य रोगाशी तब्बल १२ वर्ष झुंज... आईवडिलांची त्याला असलेली खंबीर साथ... आजारपणाच्या वेदना सहन करीतच त्याने दिली दहावीची परीक्षा... मात्र, हा निकाल पाहायला ‘तो’ या जगात नव्हता... त्याने ८०.४० टक्के मिळवले होते... त्याची गुणपत्रिका पाहून आईवडलांच्या अश्रूंचा बांध फुटला.
काळजाला पीळ पाडणारी ही घटना आहे लोणी काळभोरची. व्यावसायिक सुनील जगदीश भट्टड व वंदना यांचा ‘कृष्णा’ हा मुलगा. या दाम्पत्याला दोन मुली व कृष्णा अशी एकूण तीन अपत्ये. भट्टड हे संगणक तंत्रज्ञ म्हणून थेऊर ( हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यात पंचवीस वर्षे नोकरी करत होते. वंदना यांचे शिक्षण डीएमएलटी असल्याने गावात एक विविध आजारांची तपासणी करण्याची लॅब चालवतात.
कृष्णा चार वर्षांचा असताना त्याला स्नायू आखडण्याचा आजार झाला होता. सुरुवातीला या आजाराचे प्रमाण खूपच नगण्य होते. काही वर्षांनी त्याला येथील एका खासगी शाळेत घालण्यात आले.
सहावी पर्यंत त्याने शाळेत व्यवस्थित शिक्षण घेतले. एप्रिल २०१२ मध्ये भट्टड दांपत्य त्याला घेऊन पुण्याहून लोणी काळभोर कडे परतत असताना चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर त्याच्या आजाराचे स्वरूप वाढले. आजारामुळे त्याला शाळेत जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याला घरीच शिकवणी लावण्यात आली.
शीतल जैन व रश्मी तिखे या दोन शिक्षिकांनी घरी येऊन त्याला सर्व विषय शिकवले. फक्त परीक्षेच्या वेळी आईवडील त्याला रिक्षात बसवून शाळेत नेत असत. शाळेत नेण्यासाठी कृष्णाला संतोष नारायण सोनवणे या मित्राने खुप मदत केली. अशा प्रकारे अतिशय कष्ट घेऊन आई वडिलांनी त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मार्च २०१८ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला तो बसला होता. परिक्षा दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्याचे २३ मे रोजी निधन झाले. दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. या परिक्षेत त्याला ८०.४० टक्के पडले आहेत. त्याची गुणपत्रिका पाहून आई-वडील, दोन बहिणी, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला. कृष्णा हयात असता तर त्याला केवढा आनंद झाला असता या कल्पनेनेच सर्वांना गहिवरुन आले.

कृष्णा चार वर्षांचा असताना आम्हाला या आजाराबाबत माहिती मिळाली. आम्ही शक्य ते सर्व आधुनिक औषधोपचार केले. परंतु यश मिळाले नाही. तो खुप जिद्दी होता. एवढा असाध्य आजार होऊनही त्याने शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही. मी एक दिवस नक्कीच बरा होईल. स्वत:च्या पायावर चालत जाऊन व्यवस्थित महाविद्यालयात शिक्षण घेईन असे तो म्हणत असे. आजारी असतानाही तो आमची भरपूर काळजी करत असे. त्याची आई वंदना यांच्या जिद्दीमुळे तो असाध्य आजाराशी एखाद्या योद्ध्याप्रमाणे शेवट पर्यंत लढला.
- सुनील भट्टड, वडील.

Web Title: Krishna Passes away after Winning the battle of 'SSS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.