कोरेगाव भीमा प्रकरण : कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे,नक्षली कनेक्शनचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:21 AM2018-04-17T11:21:21+5:302018-04-17T12:19:52+5:30

पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली,  नागपूर आणि गडचिरोली येथे ही शोध मोहीम सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

Koregaon Bima Case: Raids at the residence of Kabir Kala Mancharya, suspicion of Naxalite connections | कोरेगाव भीमा प्रकरण : कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे,नक्षली कनेक्शनचा संशय

कोरेगाव भीमा प्रकरण : कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे,नक्षली कनेक्शनचा संशय

Next

पुणे : पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या गुन्ह्यात आज पुणे पोलिसांनी कबीर कला मंचचे कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर छापे टाकून शोध मोहिम सुरु केली आहे.  पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली,  नागपूर आणि गडचिरोली येथे ही शोध मोहीम सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते.  या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला.  याप्रकरणी ७ जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली़ ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.  त्यानंतर याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

आज पहाटेपासूनच अतिशय गुप्तपणे पोलिसांनी पुणे, मुंबई, गडचिरोली येथील कार्यकर्त्यांच्या घरावर एकाचवेळी सर्च आॅपरेशन सुरु केले़ पुण्यात कबीर कला मंचचे स्वतंत्र कार्यालय नाही़ येरवडा येथील रमेश गायचूर आणि वाकड येथील सागर बोडके यांच्या घरात तपासणी सुरु आहे. त्याचवेळी नागपूर येथील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी तपासणी सुरु आहे.

अत्यंत गुप्तपणे सुरु केलेल्या या सर्चमध्ये पोलिसांना कार्यकर्त्यांच्या घरातून कोरेगाव भीमा संबंधी वाटण्यात आलेली पत्रके, पेनड्राईव्ह व अन्य काही साहित्य मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.  याशिवाय मुंबईतही सुधीर ढवळे व अन्य काही कार्यकर्त्यांच्या घरात सर्च सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नकार दिला असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.  

Web Title: Koregaon Bima Case: Raids at the residence of Kabir Kala Mancharya, suspicion of Naxalite connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.