शिक्कामोर्तब ! कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 07:26 PM2019-07-16T19:26:40+5:302019-07-16T19:34:19+5:30

कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंती पडून घडलेल्या दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे.

Kondhwa, Ambegaon accident happened due to poor construction | शिक्कामोर्तब ! कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच 

शिक्कामोर्तब ! कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच 

Next
ठळक मुद्देसीईओपीच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर सीमाभिंतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचेभिंतींमध्ये पाणी मुरल्याने निर्माण झाला दबाव

पुणे : कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंती पडून घडलेल्या दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पाणी मुरल्याने आणि झाडांच्या दबावामुळे या भिंती कोसळल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले असून उर्वरीत भिंतीचा भाग पाडून त्याठिकाणी नव्याने मजबूत भिंती बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे. 


कोंढव्यातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत २९ जून रोजी मध्यरात्री पडली होती. तर १ जुलै रोजी सिंहगड कॉलेजची सीमाभिंत पडली होती. कोंढव्यातील घटनेत १५ तर सिंहगड कॉलेजच्या दुर्घटनेत ६ असे एकूण २१ मजूर दगावले होते. या घटनांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. तसेच दोन्ही दुर्घटनांमधील बांधकामाची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी करण्याची विनंती केली होती. सीओएपीचे तज्ञ डॉ. एम. एस. रणदिवे,  डॉ. आर. एस. दळवी आणि डॉ. आय. पी. सोनार यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार केला. हा अहवाल सोमवारी महापौरांना सुपूर्द करण्यात आला.


अल्कोन स्टायलस इमारतीतील सीमाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होते. सोसायटीतील आतील बाजूस असलेल्या सिमेंट ब्लॉक मधून पाणी जमिनीत मुरत होते. तसेच सीमाभिंतीलगत वाहनेही लावण्यात येत होती. त्यामुळे दबाव वाढत गेल्याने निकृष्ट बांधकाम असलेली भिंत मजुरांच्या घरावर कोसळल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. या इमारतीची उर्वरित सीमाभिंतही धोकादायक असून ती पाडून नव्याने पक्की भिंत बांधावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.


तसेच सिंहगड कॉलेजच्या सीमाभिंतीलाही जागोजाग तडे गेलेले आहेत. महाविद्यालयाची इमारत आणि सीमाभिंतीदरम्यान बांधलेल्या वर्कशॉपच्या छतावर पावसाचे पाणी साठत होते. हे पाणी वर्कशॉप आणि भिंतीदरम्यान असलेल्या भागात पडत होते. या ठिकाणी झाडे लावण्यात आली असून येथे पावसाळी गटाराचे पाणीही जमिनीत मुरत होते. त्यामुळे मातीचा दाब निर्माण होऊन भिंतीचा काही भाग कोसळला आणि झाडेही उन्मळून पडल्याने मजुरांच्या झोपड्यांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. येथे शिल्लक राहिलेली उर्वरित सीमाभिंतही  पाडून नव्याने भिंत बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे.

कोंढवा आणि सिंहगड कॉलेज सीमाभिंत दुर्घटनेनंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये सीओईपीचे प्राध्यापक बिराजदार यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांनी दोन्ही घटनांच्या ठिकाणच्या बांधकामाचा अभ्यास करुन त्याचा अहवाल ४ जुलैरोजी पालिकेला दिला होता. सर्वसाधारण सभेमध्ये उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या अहवालावर प्रश्न उपस्थित करीत अहवालाच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली होती. प्राध्यापक बिराजदार, डॉ. दळवी आणि तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालातील निष्कर्ष सारखेच आहेत. 

Web Title: Kondhwa, Ambegaon accident happened due to poor construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.