पुरुषोत्तम महाकरंडकावर कोकणचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 07:08 PM2018-12-10T19:08:32+5:302018-12-10T19:10:36+5:30

पुरुषाेत्तम करंडक महाअंतिम फेरीत रत्नागिरी जिल्ह्यातील गाेगटे जाेगळेकर महाविद्यालयाने पुरुषाेत्तम करंडक मिळवला.

kokan region win the purushottam karandak | पुरुषोत्तम महाकरंडकावर कोकणचा झेंडा

पुरुषोत्तम महाकरंडकावर कोकणचा झेंडा

पुणे : आवाज कोणाचा कोकणचा, अरे पुरुषोत्तम करंडक कोणाचा कोकणचा, अरे स्पर्धा पुण्यात पण करंडक मात्र कोकणात, अशा घोषणा देत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पुरुषोत्तम करंडकावर अापले नाव काेरले आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम महाअंतिम फेरीचा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे दिग्दर्शक प्रवीण तरडे, परीक्षक राज काझी, अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी, अभिनेत्री शुभांगी पाठक, महाराष्ट्रीय कलोपासक संस्था अध्यक्ष अनंत निगोजकर, चिटणीस राजेंद्र ठाकूर देसाई, अादी उपस्थित होते.
 
    यंदा पुरुषोत्तम महाअंतिम फेरीसाठी पुणे, जळगाव, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यातून १९ महाविद्यालयांची निवड करण्यात आली हाेती. या महाविद्यालयातून चार सांघिक पारितोषिके, पाच वैयक्तिक व दहा उत्तेजनार्थ पारितोषिक काढण्यात आली. सांघिकमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरुषोत्तम करंडक गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या मॅडम या एकांकिकेने पटकावला आहे. द्वितीय करंडक प्रेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगरच्या पीसीओ या एकांकिकेने मिळवला. तर तृतीय करंडक मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय पुणे अफसाना या एकांकिकेला मिळाला. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी दिला जाणारा करंडक  सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे यांच्या बातमी क्रमांक एक करोड एक या एकांकिकेला मिळाला. 

    प्रवीण तरडे म्हणाले, पुरुषोत्तम ही माझी अविस्मरणीय आठवण आहे. कबड्डी चॅम्पियन पासून लेखकापर्यंतचा विलक्षण प्रवास आहे. पुरुषोत्तम ही व्यवस्थापन शिकवणारी एकमेव स्पर्धा आहे. कुठल्याही गोष्टीत वेळेच महत्व दिले जाते. या स्पर्धेचे कडक नियम आपल्याला पुढील अनेक वर्षे फायदेशीर ठरतात. नाटकात वेळेत या, एक तासातच नाटक संपले पाहिजे, रांगेत उभे रहा, एका संघात सोळा पेक्षा जास्त कलाकार नको, ग्रीन रूममध्ये शांत रहा अशा अनेक नियमांचे कौतुक करावेसे वाटते. पुरुषोत्तम विजेता कलाकार हा आयुष्यात एक उत्तम अभिनेता होतो. महाविद्यालयातील तरुण मुलामुलींनी एकदा तरी पुरुषोत्तम स्पर्धा करावी. 
 
परीक्षकांच्या वतीने राज काझी म्हणाले, पुरुषोत्तम ही युवा ऊर्जेचे स्वप्न जागे करणारी स्पर्धा आहे. या महाअंतिम फेरीत संपूर्ण महाराष्ट्रतून तरुणाई उत्साहाने सहभागी होते. यावर्षी सोशल मीडिया प्रभाव, मानवाच्या मेंदूची विचारसरणी, स्त्रियांच्या समस्या, विनोदी एकांकिका असे वैविध्यपूर्ण विषय पाहायला मिळाले. तरुण कलाकार आपल्या मराठी रंगभूमीची ताकद आहे. यंदाच्या पुरुषोत्तमचे वैशिष्ट्य म्हणजे महिला राज चा दबदबा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला आहे. 

Web Title: kokan region win the purushottam karandak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.