सहकारी बँकांसाठी नॉलेज हब उभारणार : नागरी सहकारी बँकेच्या बैठकीतील निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:33 PM2018-08-18T19:33:30+5:302018-08-18T19:42:18+5:30

एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन पैसे लुटून नेण्याच्या प्रकारात अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध बँकांना आलेल्या अनुभवाचे, त्यांनी त्यावर केलेल्या उपाययोजनांची देवाणघेवाण करण्यासाठी नॉलेज हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

Knowledge Hub for Co-operative Banks: Decision in Co-operative Bank meeting | सहकारी बँकांसाठी नॉलेज हब उभारणार : नागरी सहकारी बँकेच्या बैठकीतील निर्णय

सहकारी बँकांसाठी नॉलेज हब उभारणार : नागरी सहकारी बँकेच्या बैठकीतील निर्णय

Next
ठळक मुद्देकॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णयसायबर हल्ला , डेबिट कार्ड क्लोनिंग याच्यावर अडचणींची देवाणघेवाण शक्य

पुणे : देशातील बँकींग क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नागरी सहकारी बँक असोसिएशनने नॉलेज हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड क्लोनिंग, सायबर हल्ला, लेखापरीक्षणातील त्रुटी अशा विविध अडचणींची देवाणघेवाण आणि त्यावरील उपायांची माहिती या हबच्या माध्यमातून बँकांना उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 
देशातील दुसऱ्या क्रमांकाची शेड्युल्ड को आॅपरेटीव्ह बँक म्हणून कॉसमॉस बँक मानली जाते. या बँकेवर ११ आणि १३ आॅगस्ट रोजी झालेल्या सायबर हल्ल्यात तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटुन नेले होते. विदेशातील एटीएमबरोबरच पुणे,कोल्हापूर आणि देशातील विविध एटीएममधून देखील पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीसाठी तावरे कॉलनीतील पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या मुख्यालयात शनिवारी बैठक बोलावण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान प्रमुख उपस्थित होते. या शिवाय माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ निरंजन फडके आणि मोहन कामत यांनी बँक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. 
एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन पैसे लुटून नेण्याच्या प्रकारात अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध बँकांना आलेल्या अनुभवाचे, त्यांनी त्यावर केलेल्या उपाययोजनांची देवाणघेवाण करण्यासाठी नॉलेज हब उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या शिवाय लेखापरीक्षण इतर अडचणींबाबतही या नॉलेज हबची बँकांना मदत होणार आहे. स्वत:चे डाटा सेंटर असणाऱ्या बँका, अर्धे डाटा सेंटर स्वत:चे आणि अर्धे डाटा सेंटरचे काम बाहेरच्या कंपनीकडून करुन घेणारे अथवा संपूर्ण काम बाहरेच्या कंपनीला दिलेल्या बँका यांनी कोणती खबरदारी घ्यावी याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. 
या बाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नॉलेज हब उभारण्यात येणार असून पुण्याच्या संघटनेपासून याची सुरुवात होईल. राज्य फेडरेशन देखील असेच हब उभारेल. त्यामुळे सायबर हल्ला , डेबिट कार्ड क्लोनिंग याच्यावर अडचणींची देवाणघेवाण शक्य होईल. 
 

Web Title: Knowledge Hub for Co-operative Banks: Decision in Co-operative Bank meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.