Khandala shooting point closed from two years | खंडाळ्याचा शुटिंग पाॅईंट दोन वर्षापासून बंदच 
खंडाळ्याचा शुटिंग पाॅईंट दोन वर्षापासून बंदच 

लोणावळा - आपल्या निर्सगरम्य सौंदर्यानं लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा खंडाळ्यातील शुटिंग पाॅईंट मागील दोन वर्षांपासून बंद करण्यात आल्याने पर्यटकांना मोठा हिरमोड होत आहे. लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हा पाॅईंट पुन्हा पर्यटकांकरिता खुला करण्याकरिता पाऊले उचलावीत, अशी मागणी शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे व स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष शौकत शेख यांनी केली आहे.

पर्यटनाचे व थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यातील वलवण धरण व गार्डननंतर खंडाळ्याचे वैभव असलेला शुटिंग पाॅईंट दोन वर्षापूर्वी जागा मालकांने अचानक बंद केला. मुंबई व रायगड जिल्हातील जीवघेण्या गरमीचा सामना करत घाट चढून आल्यानंतर खंडाळ्यातील निर्सगरम्य वातावरण व डोंगर दर्‍या व व्हॅली पर्यटकांना साद घालतात. शुटिंग पाॅईंट या ठिकाणावर अनेक सिनेमांचे चित्रिकरण झाले असून या ठिकाणाहून राजमाची किल्ल्याचे विहंगम दृष्य पहायला मिळते, पावसाळ्यात समोरील काचळदरीतून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

या ठिकाणाचा पर्यटनात्मक विकास साधण्याकरिता सदर जागेवर नेचर झोनचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र सदरची जागा अद्याप नगरपरिषदेने ताब्यात घेतलेली नाही. मागील अनेक वर्ष पर्यटकांनी सदैव गजबजलेला हे ठिकाण दोन वर्षापासून उंच उंच पत्रे लावत अचानक पर्यटकांकरिता बंद करण्यात आले आहे. तत्कालिन मुख्याधिकार्‍यांनी सदरचे पर्यटनस्थळ नागरिकांकरिता खुले करावे असे जागा मालकांना सांगितले होते. मात्र यावर अद्यापही कार्यवाही न झाल्याने हा पाॅईंट आज अखेर बंदच आहे. खंडाळा शहराला निर्सगाचा मोठा वरदहस्त लाभला आहे. येथील मनमोहक सौंदर्य पाहण्याकरिता लोणावळ्यापेक्षा जास्त गर्दी होते. राजमाची पाॅईंट, शुटिंग पाॅईंट, सनसेट पाॅईंट व खंडाळा तलाव परिसरात अनेक स्थानिक नागरिकांचे लहान-सहान व्यवसाय आहेत.

या सर्व ठिकाणांचा विकास केल्यास खंडाळ्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. शुटिंग पाॅईंट लगत नगरपरिषदेचा डीपी रस्ता आहे. सदरचा रस्ता विकसित झाल्यासदेखील शुटिंग पाॅईंटवर जाता येणार असल्याने नगरपरिषदेने तातडीने हा डीपी रस्ता विकसित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ. किरण गायकवाड यांनी केली आहे. शुटिंग पाॅईंटप्रमाणे लोणावळ्यातील वलवण धरण व उद्यानदेखील टाटा कंपनीने सुरक्षेच्या कारणावरुन गत सात ते आठ वर्षापासून बंद केले आहे.

ते धरण उद्यान तातडीने सुरु करावे अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी टाटा कंपनीकडे केली आहे. लोणावळा खंडाळा परिसरातील एक एक पर्यटनस्थळे अशा प्रकारे बंद होऊ लागल्यास येथील पर्यटन व्यावसायावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याने तातडीने ही बंद केलेली पर्यटनस्थळे सुरू करावीत तसेच इतर पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.


Web Title: Khandala shooting point closed from two years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.