Junnar's sole MLA from Sonawane goes to Shivsena's path | जुन्नरचा मनसेचा एकमेव आमदार सोनवणे निघाले शिवसेनेच्या वाटेवर
जुन्नरचा मनसेचा एकमेव आमदार सोनवणे निघाले शिवसेनेच्या वाटेवर

पुणे : राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.
प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे दबावतंत्र वापरून जि. प. गटनेत्या आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीस गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याने या पदाधिकाऱ्यांना कोणतेही म्हणणे सादर न करताच माघारी यावे लागले. ठाकरे यांनी पदाधिकाºयांच्या राजीनाम्याच्या दबावतंत्राला दाद न दिल्याने आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेनाप्रवेशास हिरवा कंदील दिला असल्याचे मानले जात आहे. येत्या आठ दिवसांत आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता असून आमदार सोनवणे यांचा प्रवेश झाला तर आशाताई बुचके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार सोनवणे यांच्या प्रवेशापूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयांना मातोश्रीवर बोलाविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मातोश्रीवर त्यांना पाचारणदेखील करण्यात आले होते. सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या आशाताई बुचके यांच्या सर्व समर्थकांनी नारायणगाव येथील विश्रामगृहावर बैठक घेऊन आमदार सोनवणे यांच्या शिवसेनाप्रवेशास विरोध दर्शविला. जर सोनवणे यांना प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती, तसेच अनेक पदांवर काम करणाºया शिवसैनिकांनी सामूहिकरीत्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. याबाबत वृत्तपत्र व सोशल मीडियावर जुन्नर तालुक्यात शिवसेनेत फूट पडणार, तसेच लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी झळकल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी काल दि. ५ मार्च रोजी मातोश्रीवर भेटण्यासाठीगेले होते.
।वरिष्ठांकडून जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाºयांची कानउघाडणी
आशाताई बुचके यांनी वैयक्तिक भेट मागितली असता उद्धव ठाकरे यांनी ‘मला तुमच्याशी बोलायचे नाही,’ असे म्हणत भेट देण्यास नकार दिला. तसेच हॉलमध्ये येऊन सर्व पदाधिकाºयांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आशाताई बुचके यांना राजीनाम्याच्या दबावतंत्रावर खडे बोल सुनविले. मीडियामार्फत आपण केलेले वक्तव्य पक्षाला अशोभनीय आहे. आपण पक्षापेक्षाही मोठ्या झाल्या आहात. तुम्ही तालुक्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा. त्यानंतर आपणास भेटण्यास टाईम देऊ, असे स्पष्ट केले, बेशिस्तपणा चालणार नाही, अशी तंबीही पदाधिकाºयांना दिली. जुन्नर तालुक्यातून राजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिकाºयांची उद्धव ठाकरे यांनी हवा काढून घेतल्याने आशाताई बुचके व त्यांचे समर्थक एकाकी पडले आहेत. आमदार सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे त्यांना मिळालेल्या वागणुकीवर स्पष्ट झाल्याने आता आशाताई बुचके यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या आठ दिवसांत माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, संभाजी तांबे, राजाभाऊ गुंजाळ, नगराध्यक्ष शाम पांडे व काही निवडक पदाधिकाºयांनामातोश्रीवर बोलावून आमदार सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयाचे नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.


Web Title: Junnar's sole MLA from Sonawane goes to Shivsena's path
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.