पुणे : विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देणा-या महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने अखेर समान पाणीपुरवठा योजनेच्या फेरनिविदेवर शिक्कामोर्तब केले; मात्र तरीही निविदा प्रसिद्ध व्हायला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर निविदा प्रसिद्ध करून, त्या मागवल्या जातील. छाननी करून पात्र निविदा मंजूर केली जाईल. म्हणजे प्रत्यक्ष काम सुरू व्हायला अजून तीन महिने तरी लागण्याची चिन्हे आहेत.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनीच ही बाब स्पष्ट केली. योजनेचा खर्च २९० कोटी रुपयांनी कमी झाला आहे, एकूण २ हजार ३२५ कोटी रुपयांची निविदा झाली आहे. जलवाहिन्या, फायबर आॅप्टिकल डक्ट यात २०० कोटींची कपात झाली आहे. देखभाल-दुरुस्ती, जलवाहिन्या, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खर्च कमी झाला. पुढील महिनाभरात निविदा काढण्यात येईल, असे वाघमारे म्हणाले.
या योजनेच्या कामातच रस्त्यांमध्ये टाकण्यात येणाºया आॅप्टिकल फायबर केबलचे काम करण्यात येणार आहे. याआधीच्या निविदेत तेच काम २९७ कोटी रुपयांचे होते. चर्चेअंती तो खर्च १९० कोटी रुपयांनी कमी करण्यात आला. त्यामुळे मोठा फरक पडला आहे. योजनेतील विविध कामांसाठीच्या निविदांना प्रतिसाद मिळाल्यानंतर ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासूनच काम देण्यात येणार आहे. निविदेवर शिक्कामोर्तब झाले असले, तरी अजून काही प्रशासकीय पूर्तता शिल्लक आहे, त्याला काही काळ लागेल व नंतरच निविदा प्रसिद्ध केली जाईल.
आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या योजनेत सातत्याने अडथळे येत आहे. काही विशिष्ट कंपन्यांना काम देण्याचा घाट घातला जात आहे, असे आरोप यात होत आहेत. त्यावरूनच आधीची निविदा रद्द करण्यात आली. आता फेरनिविदेला कोणत्या कंपन्या प्रतिसाद देतात, यावर विरोधकांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी सुचित केले आहे.