आयाेजकांची सेहगलांना संमती ; महामंडळाचाच विराेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:16 PM2019-01-08T16:16:30+5:302019-01-08T16:19:06+5:30

इंग्रजीभाषिक साहित्यिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्याचा निर्णय महामंडळानेच घेतला होता, असा खळबळजनक आरोप आयोजकांनी केला आहे. अजूनही सहगल यांना आमंत्रित करण्याची तयारी असून तसे पत्रही आयोजकांनी ईमेलद्वारे पाठवले आहे.

invitees has no objection about sehagal | आयाेजकांची सेहगलांना संमती ; महामंडळाचाच विराेध

आयाेजकांची सेहगलांना संमती ; महामंडळाचाच विराेध

Next

पुणे : इंग्रजीभाषिक साहित्यिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्याचा निर्णय महामंडळानेच घेतला होता, असा खळबळजनक आरोप आयोजकांनी केला आहे. अजूनही सहगल यांना आमंत्रित करण्याची तयारी असून तसे पत्रही आयोजकांनी ईमेलद्वारे पाठवले आहे. मात्र, ‘आता संमेलनाला येण्याची माझीच इच्छा नाही’, असे सहगल यांच्याकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्याचा निर्णय सर्वस्वी डॉ. श्रीपाद जोशी यांनीच घेतल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सहगल यांचे भाषण श्रीपाद जोशी यांच्या हाती आधीच पडल्याचेही बोलले जात आहे. जोशी यांनी तातडीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही आयोजकांकडून करण्यात येणार आहे.

यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधी संकलन समितीचे प्रमुख पद्माकर मलकापुरे यांनी याबाबत ‘लोकमत’शी बोलताना सविस्तर खुलासा दिला. ते म्हणाले, ‘इंग्रजी साहित्यिकेच्या हस्ते मराठी संमेलनाचे उदघाटन झाल्यास संमेलन उधळून लावू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला. मनसेची ‘खळ-खट्याक’ भूमिका अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यामुळे संमेलनात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. आम्ही संमेलनाचे तीनही दिवस पूर्ण पोलीस बंदोबस्त पुरवू, असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, मनसेला पोलिसांकडून कोणतीही लेखी नोटीस देण्यात आली नाही. मनसेचे कार्यकर्ते जे बोलतात, तसे वागतात, याचा अनुभव असल्याने पुढे काय करता येईल, याचा सल्ला घेण्यासाठी डॉ. रमाकांत कोलते आणि मी ५ जानेवारी रोजी दुपारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान नागपूरला महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्याकडे गेलो. मनसेचा इशारा, सहगल यांना दिले गेलेले आमंत्रण याबाबत सविस्तर चर्चा झाली. परिस्थितीची कल्पना देणारे पत्र सहगल यांना पाठवावे, त्याचा मसुदा मी आपणास ईमेलने पाठवतो, असे जोशींनी सांगितले.’

कोलते आणि मलकापुरे रात्री ८.३० वाजता यवतमाळला पोहोचल्यावर श्रीपाद जोशी यांनी ईमेलद्वारे दोन पत्रांचा मसुदा तयार करुन पाठवला होता. त्यामध्ये एक पत्र सहगल यांचे आमंत्रण रद्द केल्याचे तर दुसरे पत्र त्यांचे विमानाचे तिकिट रद्द करण्याबाबतचे होते. याबद्दल विचारणा केली असता, संमेलन हे सर्वस्वी महामंडळाचे असून आयोजकांनी केवळ महामंडळाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोलते यांनी सही करुन ते पत्र सहगल यांना पाठवावे, असे जोशी यांच्याकडून कळवण्यात आले. संमेलनाशी संबंधित कोणतेही पत्र प्रसिध्द करण्याआधी ते मला दाखवले जावे, अशी सूचनाही त्यांनी केली होती.
सहगल यांचे आमंत्रण आयोजकांनी रद्द केल्याचे वृत्त प्रसिध्द होताच सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. आयोजकांवर निशाणा साधला जाऊ लागल्यानंतर या प्रक्रियेत आपली काहीही भूमिका नाही, असे सांगत डॉ. श्रीपाद जोशी यांनी हात झटकले आणि चूक सर्वस्वी आयोजकांची असल्याची प्रतिक्रिया दिली. प्रत्यक्षात, त्यांनीच या पत्राचा मसुदा तयार केल्याचे वृत्त हाती येताच, जोशी यांनी ‘यू टर्न’ घेतला. आपण केवळ पत्राचा मसुदा इंग्रजीत तयार करुन दिला. मात्र, महामंडळाने वा महामंडळ अध्यक्षांनी असे पत्र पाठवा असे आदेश दिलेले नाहीत, असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला. याबाबत मलकापुरे म्हणाले, ‘केवळ पत्राचा मसुदा इंग्रजीत तयार करुन घेण्यासाठी आम्ही एवढा प्रवास करुन नागपूरला गेलोच नसतो. ते काम यवतमाळमध्येही झाले असते. महामंडळाच्या अध्यक्षांना संमेलनाशी संबंधित प्रत्येक निर्णयावर स्वत:चे वर्चस्व ठेवायची सवय असल्याने सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्याचा निर्णय त्यांनी परस्पर घेतला.’

आयोजकांकडून नयनतारा सहगल यांना दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. आम्ही संमेलनात तुमचे सन्मानाने स्वागत करु, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सहगल यांनी आता संमेलनाला येण्यास नम्रतापूर्वक नकार कळवला आहे. दरम्यान, उदघाटक म्हणून आता कोणाला बोलवायचे यासंबंधी आपण काही नावे सुचवावीत, असा ईमेल श्रीपाद जोशी यांनी आयोजकांना पाठवला आहे.

महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या वर्तणुकीचा आम्ही जाहीर निषेध करतो. यवतमाळमधील नागरिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जोशींनी तातडीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही सदस्यांकडे करणार आहोत. जोशींशिवायही संमेलन पार पडू शकते. आयोजक, स्वागताध्यक्ष संमेलनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडू शकतात.
- पद्माकर मलकापुरे 

मी विदर्भ साहित्य संघाचा उपाध्यक्ष असल्याने महामंडळाचा अध्यक्ष आहे. पुढील चार-पाच दिवस पूर्णपणे संमेलनाच्या कामामध्ये व्यस्त असणार आहे. नयनतारा सहगल यांच्या भाषणातील कोणताही मुद्दा मी वाचलेला नाही. सहगल यांच्या पत्राचा मसुदा आयोजकांना इंग्रजीत करून देण्याची मागितलेली संस्थात्मक मदत निश्चितच  केली गेली. मात्र तो महामंडळाचा निर्णय वा निर्देश म्हणून कोणी घेत असेल तर ते चुकीचे आहे. महामंडळाने वा महामंडळ अध्यक्षांनी असे पत्र पाठवा असे आदेश दिलेले नाहीत. तो पर्याय श्रीपाद भालचंद्र जोशी यांना तेंव्हाही मान्य नव्हता हे सांगून झाले होते, आजही नाही.
- डॉ. श्रीपाद जोशी

Web Title: invitees has no objection about sehagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.