Investigation of Carla apex theft wrong direction: Anant Tare; Signal of agitation | कार्ला कळसचोरीचा तपास चुकीच्या दिशेने : अनंत तरे; सनदशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्देकळस चोरीचा तपास सीआयडीकडे सोपवावा : अनंत तरेसनदशीर मार्गाने रस्ता रोको, मोर्चा, धरणे आंदोलन करण्याचा इशारा

पुणे : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या लोणावळा कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या कळसाचा तपास जाणूनबुजून तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने करत आहे आणि वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज मिळून अद्यापही पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नाही, असा आरोप करत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एपीआय साधना पाटील यांना तातडीने निलंबित करून चौकशी करून बडतर्फ करावे, अशी मागणी एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी मदन भोेई, नवनाथ देशमुख, विलास कुटे आदी उपस्थित होते.
या मंदिराचा कळस ३ आॅक्टोबर रोजी चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास एपीआय साधना पाटील यांच्याकडे होता. कळस चोरीबाबत अशोक पडवळ या व्यक्तीने आवाज उठवला असता तथाकथीत गावातल्यांनी त्याला बेदम मारहाण केली, अशोक पडवळ ह्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली पण साधना पाटील यांनी एफआयआरसुद्धा दाखल केला नाही. मावळ तहसिलदार आणि एपीआय साधना पाटील यांच्यासमोर दहशद आणि दादागिरीने आमचे राजीनामे घेतले आहेत. आम्हाला जबरदस्ती करून कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या असून विश्वस्त विलास कुटे, संजय गोविलकर, विजय देशमुख यांनी सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा एफ आर आय नोंदवला नाही. 
ट्रस्टचे सहखजिनदार विलास कुटे यांना पिस्तूल लावून पळवून नेऊन कोंडून ठेवले, व कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या, याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार केली, पण साधना पाटील यांनी काहीही कारवाई आजपर्यंत केली नाही, असे तरे म्हणाले.
कळस चोरांना तातडीने पकडावे. २० वर्षांपासून अधिकृत असलेल्या एकवीरा देवस्थान ट्रस्टचे बॅनर, बोर्ड ज्या ठिकाणी लावले होते ते वनखाते, पुरातत्व खाते यांना दमबाजी करून काढायला लावावे, दहशत आणि अनधिकृत कामाला प्रोत्साहन देणाऱ्यांना पाठीशी घालून कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे वर्तन करून देवस्थान ट्रस्टच्या विरोधात काही गावगुंडांना भडकविणाऱ्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मुख्य एपीआय साधना पाटील यांचे तातडीने निलंबित करून चौकशी करून बडतर्फ करावे. कळस चोरीचा तपास सीआयडीकडे सोपवावा, वेहेरगावातील काही नेते गावगुंडांना हाताशी धरून हाणामारी, दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना तातडीने अटक करून कारवाई व्हावी अन्यथा एकवीरा देवस्थान ट्रस्ट व देवीचे भक्त असलेले संतोष केणे, वेदा म्हात्रे, डी. एम. कोळी, जयेंद्र खुणे, जितेंद्र पाटील, अरविंद भोईर आदी कोळी-आगरी भक्तगण लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन विरोधात सनदशीर मार्गाने रस्ता रोको, मोर्चा, धरणे आंदोलन करतील, असा इशारा एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला.