अमित शहांकडून इच्छुकांच्या जनप्रतिमेची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 03:27 AM2019-03-10T03:27:05+5:302019-03-10T07:03:02+5:30

लोकसभेच्या राज्यातील उमेदवार निवडीसाठी भाजपाच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत

Inquiries of Amit Shahan's public image | अमित शहांकडून इच्छुकांच्या जनप्रतिमेची चौकशी

अमित शहांकडून इच्छुकांच्या जनप्रतिमेची चौकशी

Next

पुणे : लोकसभेच्या राज्यातील उमेदवार निवडीसाठी भाजपाच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या जनमानसातील प्रतिमेबाबत विचारणा केली असल्याचे समजते. विद्यमान आमदार, खासदार यांच्या मागील पंचवार्षिकमधील कामाबाबत तसेच मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा कशी आहे, याबाबत त्यांनी चौकशी चालवली असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

स्वच्छ प्रतिमा, अजातशत्रू, वादात न अडकता काम करण्याची शैली व जनमानसातील चांगली प्रतिमा याला पक्षाकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. एक-एक जागा महत्त्वाची समजून अयोग्य उमेदवार दिला जाऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारासाठी स्वत: शहा यांनीच हे निकष लावल्याचे समजते.

त्यामुळेच राज्यातील आमदार, खासदारांवर किती आणि कोणते आरोप झाले आहेत, न्यायालय वा कोणत्या सामाजिक संस्थांनी त्यांच्यावर ताशेरे मारले आहेत काय, वगैरे माहिती शहा यांच्या कार्यालयाकडून जमा केली जात आहे. पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा हा पक्षाचा ‘यूनिक सेलिंग पॉइंट’ आहे. काँग्रेस कितीही आरोप करीत असली, तरी मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे कसलेही आरोप झालेले नाहीत. त्याला साजेसे असेच उमेदवार देण्याचा पक्षाचा प्रयत्न
आहे. त्यामुळेच ही माहिती जमा केली जात आहे.

उमेदवारीसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात चुरस आहे. खासदार शिरोळे यांच्यावर गेल्या ५ वर्षांत कसलेही आरोप झालेले नाहीत; मात्र त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी असल्याची चर्चा असते.

बापट वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावर वादांची तीव्रता कमी करून घेण्यात यश मिळवले आहे. शहा यांच्या कसोटीवर कोण उतरते, याची उत्सुकता पक्ष कार्यकर्ते व राजकीय वतुर्ळात निर्माण झाली आहे.

Web Title: Inquiries of Amit Shahan's public image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.