If you have perseverance, then you will succeed - Aboli Jagtap-Patil | जिद्द, चिकाटी असेल तर यश मिळतेच - अबोली जगताप-पाटील

अबोली जगताप-पाटील म्हणाल्या, की मी वयाच्या चौथ्या वर्षापासून तायक्वांदो खेळायला सुरुवात केली. त्या वेळी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये क्लास सुरू केला. मला खेळासाठी प्रवीण सोनकुल यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी माझा खेळाचा खूप सराव घेतला. त्याचबरोबर, माझ्या परिवाराचा पाठिंबा पहिल्यापासूनच होता. म्हणून मी खेळू शकले. पाचवीपर्यंत खेळत होते. तेव्हाच वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळले; पण कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपद मला मिळाले नाही. खेळात यश मिळत नव्हते म्हणून पुढे मी खेळ बंद केला. ११वीमध्ये असताना सरांनी मला व पालकांना भेटून खेळासाठी प्रेरित केल्यानंतर स्पर्धा म्हणून नाही, तर आवड म्हणून मी खेळायला सुरुवात केली व तायक्वांदोचा सराव करू लागले. नंतर पथकासाठी न खेळता माझी आवड म्हणून मी खेळू लागले. २००८मध्ये केरळला राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये रौप्यपदक मिळविले.
२००९, २०१० आणि २०११मध्ये सलग ३ वर्षे फेडरेशनच्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन रौप्यपदक मिळविले. माझी पदवी पूर्ण झाल्यावर मला घरच्या परिस्थितीमुळे काम करावे लागले. मी शाळेत क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. काम करीत असताना २०१३मध्ये फेडरेशनची डिस्ट्रिक्ट, स्टेट लेवलला खेळले. सलग ४ वर्षे फेडरेशनच्या नॅशनल खेळले. राज्यस्तरीय स्पर्धेत मला सुवर्णपदक मिळाले. २०१५मध्ये लग्न झाल्यावरही मला माझ्या पतीने खेळासाठी खूप प्रोत्साहन दिले. आई-वडिलांचा पाठिंबा तर होताच; त्याचबरोबर पतीचाही पाठिंबा मिळाला. त्यांनी कुठल्याही प्रकारचे बंधन माझ्यावर लादले नाही. त्यांनी माझ्या खेळात मला पूर्णपणे मदत केली. माझ्या यशामध्ये परिवारासोबत गुरूंचे मला खूप प्रोत्साहन मिळाले, असे अबोली यांनी सांगितले.
२०१५मध्ये माझी केरळला नॅशनल स्पर्धा झाली तीमध्ये सहभाग घेतला. शाळेकडून अनेक विजेतीपदे मिळाली. एसएनडीटी कॉलेजमधून आॅल इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला. लग्नानंतर मी खेळात थोडे अंतर ठेवले, असे सांगून अबोली जगताप-पाटील म्हणाल्या, की पुन्हा काही काळानंतर तायक्वांदो खेळाला सुरुवात केली. माझ्या खेळामध्ये अनेक वेळा खंड पडला; पण मी खेळ सोडला नाही. सराव सुरूच ठेवला. माझे वडील शेतकरी आहेत. खेळाबद्दल कसलीही माहिती नसूनही माझ्या परिवाराने मला खेळासाठी परवानगी दिली. माझ्या खेळातील कामगिरी पाहून माझ्या मार्गदर्शकांनीही मला खूप मदत केली. सध्या मी युनिक इंग्लिश मीडियम ११वी-१२जुनिअर कॉलेजला अर्थशास्त्र शिकवते. खेळ आणि शिक्षण सांभाळून पुढे गेले. आज प्रत्येक स्त्री ही आपल्या कर्तृत्वगुणांनी ओळखली जाते. जीवनात नावाला आणि रूपाला जेवढे महत्त्व नाही, तेवढे त्या व्यक्तीच्या गुणांना, कर्तृत्वाला आहे. व्यक्तीचे नाव हे केवळ तिच्या संबोधनासाठी आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव जेव्हा आपण घेतो, तेव्हा तिचे संपूर्ण जीवन, वैशिष्ट्ये, गुण आपल्या नजरेसमोर येतात. प्रत्येक स्त्रीचे व्यक्तिमत्त्व हे वेगळेच असते. त्यासाठी तिच्यामधील आत्मविश्वास जागृत असणे गरजेचे असते. जुना काळ सोडला तर आजची स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत सक्षम आहे, यात तिळमात्र शंका नाही. आपल्या कार्यात यश मिळविण्यासाठी स्वत:च्या अंगी जिद्द, चिकाटी असणे गरजेचे असते. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मला मी केलेल्या मेहनतीचे फळ तसेच माहेर आणि सासरच्या पाठिंब्यामुळे प्राप्त झाला आहे. त्याबद्दल खूप अभिमान वाटतो, असे या प्रसंगी अबोली जगताप-पाटील यांनी सांगितले.


Web Title: If you have perseverance, then you will succeed - Aboli Jagtap-Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.