मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:57 PM2018-02-21T13:57:18+5:302018-02-21T14:28:09+5:30

मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे

HUNTING IN MAVAL, PIMPRI CHINCHWAD: FOREST DEPARTMENT NEGLIGENCE | मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

Next
ठळक मुद्दे मावळ भागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीचे वाढले प्रमाण गावातील ठराविक नागरिकांना बंदुकीचे परवाने, मात्र शिकारीसाठी सर्रास वापर

कामशेत : मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे. या भागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीची मजा घेण्याचे प्रमाण काही वर्षांमध्ये वाढले आहे. यासह वृक्षतोड, बेकायदा उत्खननही वाढले आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन तर धोक्यात आलेच; तसेच वनविभागातील जंगले नष्ट होऊ लागली आहेत. 
मावळ तालुका हा निसर्गसृष्टीने व नैसर्गिक संसाधन सामग्रीने बहरला असून, मावळातील निसर्गसृष्टी पाहण्यासाठी अनेक पर्यटक मावळात भेट देत आहेत. मावळातील अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात दाट वनराई, जंगले असल्याने येथे बऱ्याच प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो. दरम्यान, गावातील काही ठराविक नागरिकांना बंदुकीचे परवाने दिले असून, या बंदुकीचा विधायक कामासाठी वापर न करता अनेकजण सर्रास शिकारीसाठी वापर करण्याचे प्रकार वाढले आहे. यातच अनेकांकडे बेकायदा बंदूकही आहेत असे अनेक निसर्गप्रेमी सांगतात. स्थानिकांनी शेतीबरोबर शिकार करणे, मुंबई-पुणे व आजूबाजूच्या प्रमुख शहरांतील प्रतिष्ठित नागरिकांना शिकारीचे सावज कोठे मिळेल, शिकार कशी करायची या बरोबरच एखाद्या प्राण्याची केलेली शिकार व त्याची मेजवानी आदी बंदोबस्त करणे यासारखा जोडधंदाच सुरु केला आहे. यामुळेच शहरी भागातील अनेक अधिकृत व अनधिकृत बंदूकधारी शिकारीसाठी मावळला पसंती देत आहेत. प्रामुख्याने या शिकारी सुटीच्या दिवशी होत असून, शहरी भागातील पाहुणे येणार म्हणून त्यांच्यासाठी खास बेत व पूर्वनियोजनही केले जात आहे.
नाणे, अंदर, पवन मावळातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भागांमध्ये मोठी वनराई जंगले, मोठी धरणे, तलाव, ओढे, गावतळी असून, डोंगर पठारावरील जंगलातील पाणी कमी झाल्यास वन्यप्राणी या पाण्याच्या ठिकाणी पाणवठ्यावर येतात. या प्राण्यांकडून कोणाच्याही जीविताला अद्यापपर्यंत धोका निर्माण झालेला नाही. तरीही अनेक जण येथे शिकार करतात. 
या शिकारींमध्ये प्रामुख्याने रानडुक्कर, सायाळ, ससे, मोर, लांडोर आदी प्राण्यांचा समावेश असतो. शहरात राहणाऱ्या मित्रमंडळींना  पार्ट्यांचे आमंत्रण पाठवून पारंगत 
आहेत. या सर्वांत ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील बहुतेकांनी हा 
रोजगार बनवला आहे. तर गावातील अनेक तरुण व्यसनाच्या अधीन होऊ लागले आहेत. 
मावळातील वाढलेल्या शिकारींमध्ये गावातील स्थानिकांबरोबर अनेक मोठ्या शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. मुंबई-पुण्याच्या, तसेच आजूबाजूच्या प्रमुख शहरातील नागरिकांचे सुटीच्या दिवशी मावळातील या दुर्गम भागात वावर वाढला असून, गावातील अनेक तरुण पैशांसाठी त्यांना साथ देऊन वन्यसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहेत. याचप्रमाणे शहरातील नागरिकांच्या दारूच्या आमिषाला बळी पडत आहेत. 
या वाढत्या शिकारींमुळे दुर्गम गावांमधील तरुणवर्ग नशेच्या आहारी जाऊ लागला असून, फुकटात मिळणाऱ्या मद्यासाठी मुक्या प्राण्यांचे बळी घेऊ लागला आहे. अशा शिकारी बंदूकधाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी, त्याचप्रमाणे स्थानिकांच्या वृक्षतोड, बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मावळातील निसर्गसृष्टी वाचवा, वन्यप्राणी वाचवा हा नारा अनेक प्राणिमित्र संघटना, पर्यावरणप्रेमी व नागरिक देत आहेत.

Web Title: HUNTING IN MAVAL, PIMPRI CHINCHWAD: FOREST DEPARTMENT NEGLIGENCE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.