पुणे शहरात बारावीची परीक्षा सुरळीत; औक्षण करून, फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:23 PM2018-02-21T19:23:37+5:302018-02-21T19:31:16+5:30

बारावीच्या लेखी परीक्षेला बुधवारपासून सुरूवात झाली, बहुसंख्य विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या इंग्रजीचा पेपर पहिल्या दिवशी पार पडला. शहरात ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रामध्ये औक्षण करून, फुले देऊन, लिंबू शरबत पाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

HSC exam starts in Pune city; Welcome students by giving flowers | पुणे शहरात बारावीची परीक्षा सुरळीत; औक्षण करून, फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे शहरात बारावीची परीक्षा सुरळीत; औक्षण करून, फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

Next
ठळक मुद्दे उत्साह, हुरहुर, परीक्षेचा ताण अशा संमिश्र वातावरणामध्ये परीक्षेला सुरूवातराज्यभरातून १४ लाख ८५ हजार तर पुणे विभागातून २ लाख ४५ हजार विद्यार्थी देत आहेत परीक्षा

पुणे : बारावीच्या लेखी परीक्षेला बुधवारपासून सुरूवात झाली, बहुसंख्य विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या इंग्रजीचा पेपर पहिल्या दिवशी पार पडला. शहरात ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रामध्ये औक्षण करून, फुले देऊन, लिंबू शरबत पाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिलाच पेपर असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे पालक सोडण्यासाठी आले होते. एकंदरीत उत्साह, हुरहुर, परीक्षेचा ताण अशा संमिश्र वातावरणामध्ये परीक्षेला सुरूवात झाली. 
यंदाच्या वर्षीपासून परीक्षेला उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात हजर रहावे, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले होते. त्यामुळे वेळ पाळण्यासाठी विद्यार्थी पळत पळत परीक्षा केंद्र गाठताना दिसून येत होते. राज्यभरातून १४ लाख ८५ हजार तर पुणे विभागातून २ लाख ४५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. पहिला पेपर इंग्रजीचा असल्यामुळे अनेक विद्यार्थी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत होते. यावेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठी गर्दी दिसून आली. काही महाविद्यालयांनी पालकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली होती. यंदा परीक्षेचे काही नियम बदलले असले तरी विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणार याची दक्षता घेत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक कुठे आले आहेत, याची माहिती देण्यासाठी त्यांना मदत केली जात होती. पेरुगेट भावे  हायस्कूलमध्ये शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. परीक्षा केंद्रावर झालेल्या या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. याबाबत विद्यार्थ्यांशी बातचीत केली असता त्यांनी परीक्षेला तयार असल्याचे सांगितले. दहावीच्या बोर्ड परीक्षेला एकदा सामोरे गेल्यामुळे पहिल्या वेळेस इतकी भीती वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. भावे हायस्कूलतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या जातात. एम ई एस बॉईजहायस्कूल मध्येही शिक्षकांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. पालक महेश सूर्यवंशी म्हणाले, की परीक्षा केंद्रावर चांगल्या पद्धतीने स्वागत चांगले केले गेल्यामुळे मुलांचा तणाव निवळला. सर्वच परीक्षा केंद्रावर असे स्वागत करण्यात यावे.
पहिल्या अर्धा तासामध्ये मुलांकडून उत्तरपत्रिकेवरील माहिती भरून घेण्यात आली, परीक्षेबाबतच्या आवश्यक सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी दडपण न घेता उत्तरपत्रिका सोडावी द्यावी. कॉपीसारखे गैरप्रकार करू नयेत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.  

प्रवेशपत्रावर उपकेंद्राचे नाव नसल्याने ऐनवेळी धावपळ
बारावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर केवळ मुख्य केंद्राचे नाव देण्यात आले आहे. उपकेंद्रातील महाविद्यालयात बैठक व्यवस्था करण्यात आली असल्यास त्याची माहिती या प्रवेशपत्रावर देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशी जाऊन बैठक व्यवस्थेची माहिती घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले होते. मात्र तरीही काही विद्यार्थ्यांनी याची माहिती न घेता थेट परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रात आल्याने त्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. मॉडर्न महाविद्यालयात एक विद्यार्थीनी आली, तेव्हा तिची बैठक व्यवस्था उपकेंद्रातील महाविद्यालयात आल्याची माहिती तिला मिळाली. त्यावेळी मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षकांनी वाहनाची व्यवस्था करून एका कर्मचाºयासमवेत तिला त्या उपकेंद्रात पोहचवले. प्रवेशपत्रातील गोंधळामुळे शहरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना ऐनवेळी धावपळ करण्याचे बरेच प्रकार घडले. पुढील वर्षीपासून प्रवेश केंद्रांवर उपकेंद्रांचे नाव देण्यात येईल असे राज्य मंडळाकडून स्पष्ट केले आहे.

नोटीस बोर्ड पाहण्यासाठी गर्दी 
प्रत्येक महाविद्यालयात नोटीस बोर्डावर लावलेल्या बैठक व्यवस्थेची माहिती पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी गर्दी केल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. परीक्षा क्रमांक, वर्ग क्रमांक यांची माहिती लिहिलेला फलक दर्शनी भागावर लावण्यात आले होता. त्याचबरोबर संबंधित केंद्रातील शिक्षकही विद्यार्थ्यांना त्यासाठी मदत करत होते. 

लिंबू शरबत देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत 
आबासाहेब गरवारे महाविद्यालयात लिंबू शरबत देऊन बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. मुक्तजा मठकरी, उपप्राचार्य डॉ. अंकुर पटवर्धन, डॉ. सुनिता भागवत, डॉ. अपर्णा आगाशे व शिक्षकेतर कर्मचारी ही उपस्थित होते. इंग्रजीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असते, विद्यार्थी काही खात पीत नाहीत, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे महाविद्यालयाने त्यांना लिंबू शरबत देऊन तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला असे मुक्तजा मठकरी यांनी सांगितले.

Web Title: HSC exam starts in Pune city; Welcome students by giving flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.