वाटेवरच्या काचा, किती काळ बोचणार ? कधी थांबणार हा त्रास? तरुणींचा उद्विग्न सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:29 AM2018-02-26T05:29:08+5:302018-02-26T05:29:08+5:30

तरुणी : आई, आज मी खूपच वाईट प्रसंग अनुभवला. आई : का गं, काय झाले? कुणी काही केले का? तरुणी: नाही गं, पण सांगू पण शकत नाही...

 How long will the glass be on the way? When will it stop? The intriguing question of the young woman | वाटेवरच्या काचा, किती काळ बोचणार ? कधी थांबणार हा त्रास? तरुणींचा उद्विग्न सवाल

वाटेवरच्या काचा, किती काळ बोचणार ? कधी थांबणार हा त्रास? तरुणींचा उद्विग्न सवाल

Next

पुणे : तरुणी : आई, आज मी खूपच वाईट प्रसंग अनुभवला.
आई : का गं, काय झाले? कुणी काही केले का?
तरुणी: नाही गं, पण सांगू पण शकत नाही.
आई : सांग, उगाच माझ्या चिंतेत भर घालू नकोस.
तरुणी: अगं एक माणूस आमच्यासमोर विकृत चाळे करीत होता.
आई : मग? तुम्ही काय केलेत?
तरुणी : आम्ही काय करणार, घाबरून पळून आलो.
आई : बरं झालं, अशा गोष्टींकडे दुर्लक्षच केलेलं चांगलं.
शाळेतील मुली, तरुणी किंवा महिलांना पुरुषांच्या वासना, विकृती, वाईट नजर यांचा अनेकदा सामना करावा लागतो. मात्र, धड कुणाला सांगता येत नाही आणि तो प्रसंग डोळ्यासमोरून काही केल्या जात नाही, अशा एका विचित्र परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागते. या अनुभवांना ‘आळीमिळी गुपचिळी’ सारखे मनातच दाबून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. ही पुरुषी विकृती कधी थांबणार? प्रत्येक वाटेवर पसरून ठेवलेल्या काचांचे तुकडे किती काळ बोचत राहाणार? आम्ही किती सहन करायचे? असा उद्विग्न सवाल तरुणींनी उपस्थित केला आहे.
अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांना विलेपार्ले येथे भरदिवसा आलेल्या घृणास्पद प्रसंगाला सोशल मीडियावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. एका बीएमडब्ल्यू गाडीच्या चालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथुन करायला सुरुवात केली. या विकृत प्रकाराने चिडून त्या त्याला मारण्यासाठी पुढे सरसावल्या पण तितक्यात तो पळून गेला. या संदर्भात चिन्मयी यांच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण असे प्रसंग महिलांच्या जीवनात काही नवीन नाहीत. चिन्मयी यांनी आवाज उठविल्यामुळे या विषयाची दखल घेऊन किमान चर्चा तरी सुरू झाली आहे. आज नोकरी किंवा क्लासेसच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी तरुणी, मुली आणि महिलांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या जागा हेरून विकृत पुरुष अश्लील चाळे करून त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांची ही कृती इतकी बेमालूमपणे सुरू असते की कुणालाच त्याचा पत्ता लागत नाही. गल्लीबोळ, बसस्टॉप, शाळा, उद्यान अशा जागांवर पुरुष रात्रीच्या वेळेसच नव्हे तर दिवसाही दबा धरून बसलेले असतात. एखादी महिला किंवा तरुणी समोर उभी असलेली दिसली की ते आपले विकृत चाळे सुरू करतात. कुणाला सांगण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी त्या पुढे सरसावल्या तर ते पळ काढतात. खरेतर ही त्यांची कृती कुणाला सांगण्याचीही लाज वाटत असल्याने अनेक जणी वाईट अनुभव म्हणून त्याच्याकडे डोळेझाक करतात किंवा घरी सांगितले तरी विश्वास ठेवणारे कुणी नसते आणि जरी ठेवला तरी दुर्लक्षच केलेले चांगले, असा सल्ला त्यांना दिला जातो. त्यामुळे ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असेच राहणे त्या पसंत करतात.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी ‘प्रतिसाद’ किंवा ‘बडी कॉप’सारखी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून देत सकारात्मक पाऊल उचलले असले तरी अशा अनुभवांना पोलीस कितपत प्रतिसाद देतील अशी शंका तरुणींच्या मनात आहे. तरी या घटना रोखल्या जाऊन एका मुक्त जगात आम्हाला श्वास घेऊ द्यावा. यासाठी महिलांचा वावर असलेल्या प्रत्येक ठिकाणी ‘पोलीसकाका’सारखी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अनुभव-
-कोरेगाव पार्कच्या परिसरात दुचाकीवरून डबे कुठं खायला मिळतात, ती जागा आम्ही शोधत होतो. उद्यानाच्या बाहेर एक जागा सापडली. आमच्यासमोरच एक रिक्षावाला बसलेला होता. आमच्या दोघींचे त्याच्याकडे लक्ष गेले तेव्हा तो हस्तमैथुन करीत असल्याचे दिसले. आम्ही दोघीही शॉक झालो आणि तडक तेथून उठलो.
-बसची वाट पाहात एका बस्टॉपवर बसले होते. आसपास कुणीच नव्हते. अचानक एक माणूस काही अंतरावर येऊन बसला. त्याच्याकडे सहज पाहिले तेव्हा तो काहीतरी विचित्र चाळे करत असल्याचे दिसला. शेवटी घाबरून मी तोंड फिरविले.
-इमारतीखाली आम्ही दोघी बोलत उभ्या होतो. आमच्या गप्पा रंगल्या असताना कुंपणाच्या बाजूला लांबवर अंधारात एक व्यक्ती उभी असलेली दिसली. अचानक त्या व्यक्तीने हातवारे करायला सुरुवात केली. मुलींचे लक्ष नाही बघून संबंधित व्यक्तीने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. ते लक्षात आल्यावर घाबरलेल्या मुलींनी तिथून तत्काळ पळ काढला.
सार्वजनिक ठिकाणी इतरांना लज्जा निर्माण होईल, असे विकृत किंवा लैंगिक हातवारे करणे अथवा क्रिया करणे हा प्रदर्शनीयता नावाचा आजार आहे. स्वत:बद्दल न्यूनगंड असेलल्या व्यक्तींकडून आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी असे वर्तन केले जाते. पुरुषत्वाबद्दल असणाºया न्यूनभावनेमुळे आपले व्यक्तिमत्व ठसवण्यासाठी व्यक्ती अशा नकारात्मक पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रकार करते. याशिवाय वृद्धत्वात होणा-या डिमेन्शिया या आजारातही व्यक्ती असे वर्तन करू शकते. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णाला औषधोपचार आणि मोठ्या प्रमाणावर मानसोपचाराची गरज असते. - डॉ. उल्हास लुकतुके, प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ

Web Title:  How long will the glass be on the way? When will it stop? The intriguing question of the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.