महापालिकेची सत्ता राबवायची कशी हे पण मीच सांगू का : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 07:13 PM2018-10-22T19:13:22+5:302018-10-22T19:21:46+5:30

स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महापालिकेच्या कामकाजात ते अजून चाचपडतच असतील तर त्यावर उपाय शोधावा लागेल असा गर्भित इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

how can I tell the working power of the corporation : Chief Minister | महापालिकेची सत्ता राबवायची कशी हे पण मीच सांगू का : मुख्यमंत्री

महापालिकेची सत्ता राबवायची कशी हे पण मीच सांगू का : मुख्यमंत्री

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकाऱ्यांबाबत तक्रारी, बदल्यांची मागणी, निधीची चणचण असे सातत्याने महापालिकेत सुरू पक्षाला पक्षाची प्रतिमा महत्वाची आहे,सत्ता नाहीसमान पाणी योजनेची अंमलबजावणी लांबणीवर स्मार्ट सिटी योजनेला महापालिकेकडून सहकार्य नाहीसंचालक मंडळाकडूनच कामकाजात अडथळे निर्माण

पुणे : सत्ता मिळवून दिली, ती राबवायची कशी हेही आता त्यांना मीच सांगायचे का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांकडे केला असल्याची चर्चा आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात सातत्याने तक्रारी करणाऱ्या महापालिका पदाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी या ज्येष्ठांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
दोन वर्ष होत आली, अजूनही महापालिकेतील सत्तेचा प्रभाव पुणेकरांवर पाडता आलेला नाही. अधिकारी बदलून द्या अशीच मागणी सातत्याने केली जात आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही ते अजून चाचपडतच असतील त्यावरच उपाय शोधावा लागेल असा गर्भित इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. महापालिकेकडून कामे होत नाही अशी या ज्येष्ठांची तक्रार होती. ती समजावून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च महापालिकेच्या एकूणच कामजाबाबत स्पष्ट शब्दात नाराजी बोलून दाखवली असल्याची माहिती मिळाली. 
अधिकाऱ्यांबाबत तक्रारी, त्यांच्या बदल्यांची मागणी, निधीची चणचण असेच सातत्याने महापालिकेत सुरू आहे. धोरणात्मक निर्णय, जनसमूहाला उपयोगी पडतील अशी कोणतीही कामे गेल्या दोन वर्षांच्या सत्ताकालावधीत झाली नाहीत. पदाधिकाºयांची याची खंत वाटत नाही व आता पुन्हा नव्याने अधिकाऱ्यांविषयी तक्रार केली जात आहे. यांच्या सांगण्यानुसार बदल्या करत गेले तर महापालिकेत कामासाठी म्हणून यायला कोणीही तयार होणार नाही असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याची पद्धत असते. ती या पदाधिकाऱ्यांना येत नसेल तर ती आता मीच शिकवायची का अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. 
समान पाणी योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडत आहे. मुख्यमंत्र्यांची योजना म्हणूनच ही योजना दोन वर्षांपुर्वी पुढे आणली गेली. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता असतानाही राज्यातील सत्तेच्या बळावर ही योजना आणली गेली. त्यासाठी कर्जरोखे काढले व आता महापालिकेत सत्ता येऊनही योजना पुढे सरकायला तयार नाही. स्मार्ट सिटी योजनेला महापालिकेकडून सहकार्य केले जात नाही. संचालक मंडळाकडूनच कामकाजात अडथळे निर्माण केले जात आहेत असे त्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. चांदणी चौक उड्डाणपुलाबाबत भूसंपादन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यानंतरही महापालिका काहीच हालचाल करायला तयार नाही, त्यांच्या कामाला  गती दिसत नाही., भामा आसखेड योजनेबाबतही त्यांचा पुढाकार दिसत नाही अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
 सत्ताधारी नगरसेवकच सभा सुरू असताना प्रशासनावर अविश्वास दाखवतात. त्यांच्यावर टीका करतात, आंदोलनाचे इशारे देतात, ही काम करण्याची पद्धत असेल तर अवघड आहे असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. शनिवारी झालेल्या दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे पुन्हा अधिकाऱ्यांची तक्रार करण्यात आली. कामे करत नाहीत, फाईलवर निर्णय घेत नाहीत असेच मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यामुळे तर मुख्यमंत्री आणखीनच चिडले. त्याप्रमाणे काही कठोर निर्णय घ्यावा लागला तो घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

पक्षाची प्रतिमा महत्वाची
पक्षाला पक्षाची प्रतिमा महत्वाची आहे, सत्ता महत्वाची नाही. पक्षाच्या प्रतिमेवरच अनेकांना विजय प्राप्त झाला आहे. या प्रतिमेला धक्का लागेल अशा काही गोष्टी होत असल्याने पक्षाचे अनेक जुने कार्यकर्ते, पदाधिकारी व्यथीत आहेत. त्यांच्यातीलच काहींनी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांबरोबर संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी यात लक्ष घालू असे सांगून या जेष्ठांना दिलासा दिला.  

Web Title: how can I tell the working power of the corporation : Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.