होळी रे होळी, पुणेकरांना हवी ‘रेडिमेड’ पोळी!, शहरात ४३५ ठिकाणी मिळतात तयार पुरणपोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:36 AM2019-03-20T02:36:00+5:302019-03-20T02:36:17+5:30

‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ अशी आरोळी ठोकत पुरणपोळीवर ताव मारण्याचा आनंद काही निराळाच. कोणाच्या घरी पुरणपोळीचे बेत शिजतात तर कोणी रेडिमेड पुरणपोळ्यांना पसंती देतात.

Holi : Punekar's want 'ready made' Poli | होळी रे होळी, पुणेकरांना हवी ‘रेडिमेड’ पोळी!, शहरात ४३५ ठिकाणी मिळतात तयार पुरणपोळ्या

होळी रे होळी, पुणेकरांना हवी ‘रेडिमेड’ पोळी!, शहरात ४३५ ठिकाणी मिळतात तयार पुरणपोळ्या

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे - ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ अशी आरोळी ठोकत पुरणपोळीवर ताव मारण्याचा आनंद काही निराळाच. कोणाच्या घरी पुरणपोळीचे बेत शिजतात तर कोणी रेडिमेड पुरणपोळ्यांना पसंती देतात. तयार पुरणपोळ्या घेण्यामध्ये नोकरदार स्त्रियांची संख्या जास्त आहे. होळीच्या निमित्ताने ४३५ घरगुती पुरणपोळी केंद्रे, ९ भोजनशाळा आणि शेकडो फूड पार्लरमधून खवय्ये पुणेकर लाख ते दीड लाख पुरणपोळ्या फस्त करतात. पुरणपोळीमध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर असे प्रमाण वापरले जाते.

होळीची चाहूल लागली की घरोघरी हरभऱ्याची डाळ, गूळ, तूप अशा जिन्नसांची खरेदी केली जाते, पुरणयंत्र घासून-पुसून चकाचक केले जाते आणि गृहिणींचा पुरणपोळीचा बेत शिजतो. पण, आता घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत करणाऱ्या नोकरदार महिलांना पुरणपोळीचा घाट घालणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात रेडिमेड पुरणपोळ्यांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. विशेषत:, पेठांसह शहराचा मध्यवर्ती भाग, कोथरूड, तसेच उपनगरांमध्ये खासमखास तयार पुरणपोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरगुती स्तरावर पुण्यात सुमारे ४३५ ठिकाणी रेडिमेड पुरणपोळ्यांची आॅर्डर घेतली जाते. याशिवाय १०० हून जास्त फूड पार्लर, नऊ गुजराती आणि मारवाडी भोजनशाळा अशा विविध ठिकाणी होळीच्या दिवशी तयार पुरणपोळ्यांची खरेदी होते, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

‘लोकमत’शी बोलताना सरपोतदार म्हणाले, ‘भोजनशाळांमध्ये पोळ्या करून गरम गरम पानात वाढल्या जातात. इतर ठिकाणी आॅर्डरप्रमाणे एका पाकिटामध्ये दोन पुरणपोळ्या पॅक करुन विकल्या जातात. आजकाल दुकानांमध्ये, तसेच घरगुती विक्री केंद्रांमध्ये वर्षभर पुरणपोळ्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. तरीही सणाचे औचित्य साधून पोळ्यांची मागणी अनेक पटींनी वाढते. पुण्यातील शैक्षणिक संस्थांशी जोडल्या गेलेल्या खानावळींमध्येही मुलांना दोन दिवस जेवणात पुरणपोळ्यांचा बेत दिला जातो.’

उपनगरांच्या तुलनेत शहराचा मध्यवर्ती भाग, कोथरूड, पेठांमध्ये रेडिमेड पुरणपोळ्या खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. बचत गटांच्या माध्यमातून फार कमी प्रमाणात पुरणपोळ्यांची विक्री होते. बचत गटांचा कल प्रामुख्याने फराळाचे पदार्थ, टिकणारे पदार्थ, मसाले बनवण्याकडे असतो. पुरणपोळीमध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर असे प्रमाण वापरले जाते. पिठामध्ये कणिक आणि मैदा यांचे मिश्रण वापरले जाते. दोन दिवसांमध्ये खूप आॅर्डर असल्याने फक्त गुळाची पुरणपोळी करणे शक्य नसते. फूड पार्लरची मोठी साखळी असणाºया शहरातील नामांकित व्यावसायिकांच्या कारखान्यात पुरणपोळ्या मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात. इतर वेळच्या तुलनेत पोळ्यांची मागणी दुपटीने-तिपटीने वाढते. कारखान्यात तयार झालेल्या पोळ्या एका पाकिटात दोन अशा पद्धतीने पॅक करुन दुकानांमध्ये रवाना केल्या जातात.

होळीच्या निमित्ताने या दिवशी साधारण २४,००० पोळ्यांची आॅर्डर असते. फक्त पोळ्या बनविण्यासाठी कारखान्यात २० कर्मचारी कामाला आहेत. त्यामध्ये १६ स्त्रिया आणि चार पुरुष आहेत. एका तासात साधारणपणे ६०० पोळ्या तयार होतात. त्यामध्ये गूळ आणि साखर असे मिश्रण वापरले जाते. त्यानंतर त्या पॅक करून सात आऊटलेटमध्ये पाठवल्या जातात.
- माधवी परचुरे

नोकरदार महिलांना कामाच्या गडबडीमुळे होळीच्या दिवशी पुरणपोळ्या घरी करणे शक्य नसते. बरेचदा, गृहिणी, बाहेरून येथे स्थायिक झालेले तरुण-तरुणी रेडिमेड पोळ्यांची खरेदी करतात. एरवी, दिवसाला ४००-५०० पोळ्यांची विक्री होते. होळीच्या निमित्ताने ही संख्या ७००-८०० वर जाते. आॅर्डर असल्यास कटाची आमटीही दिली जाते.
- आरती सदागळे

नारायण पेठेमध्ये मी घरगुती स्तरावरच पुरणपोळी करते. होळीच्या दिवशी ७००-८०० पुरणपोळ्यांची आॅर्डर असते. एक पोळी साधारणपणे १८ रुपयांना आहे. घरगुती स्तरावर कटाची आमटी देणे शक्य होत नाही.
- गीतांजली बोर्लेकर

Web Title: Holi : Punekar's want 'ready made' Poli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.