त्यांनी केला हिंसेच्या प्रदेशात शांततेचा जागतिक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 04:45 PM2019-03-08T16:45:04+5:302019-03-08T16:47:09+5:30

गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे.

He made a world record of peace in the violence region | त्यांनी केला हिंसेच्या प्रदेशात शांततेचा जागतिक विक्रम

त्यांनी केला हिंसेच्या प्रदेशात शांततेचा जागतिक विक्रम

Next

पुणे : गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे. नक्षली भागात जगताप यांनी सर्व धर्मातील शांततेचा संदेश एकत्र करत त्याचे पुस्तक तयार करुन त्याच्या सामुहिक पठणाचा कार्यक्रम घेत जागतिक विक्रम केला आहे. या कार्यक्रमाला आत्मसमर्पित नक्षली, शहीद पाेलिसांचे कुटुंब, नक्षल पिडीत लाेक, पाेलीस, विद्यार्थी असे तब्बल 7 हजार लाेक उपस्थित हाेते. 3 मार्च 2018 ला हा कार्यक्रम घेण्यात आला हाेता. याची दखल गिनिज बुक्स ऑफ वल्ड रेकाॅर्ड यांनी घेतली आहे. 
 
उदय जगताप यांनी आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. पदवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या जगताप यांचा सामाजिक क्षेत्राकडे ओढा वाढू लागला. पुण्यातून फिरत असताना गुन्हेगारांच्या फ्लेक्सवर तरुणांचे फाेटाे पाहिल्यानंतर या तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लांब ठेवण्याचा विचार त्यांच्या मनात आला. गुन्हेगाराचा मुलगा हा गुन्हेगार हाेऊ नये यासाठी त्यांनी गुन्हेगारांच्या मुलांना गुन्हेगारी वातावरणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न पाेलिसांच्या मदतीने सुरु केला. त्यांनी 2007 साली गुन्हेगार दत्तक याेजना सुरु केली. या याेजनेअंतर्गत त्यांनी 2500 गुन्हेगारांशी संवाद साधून त्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले. त्याचवेळी नक्षलवाद्यांच्या हल्लयात पाेलीस शहीद हाेत असल्याच्या बातम्या कानावर पडत हाेत्या. अशातच पुण्यातही काही नक्षलवादी सापडले. त्यावेळी नक्षलवाद ही भारतापुढील माेठी समस्या असल्याने यावर काम करणे आवश्यक त्यांना वाटू लागले. त्यांनी गडचिराेलीत जाऊन तेथे काम करण्याचा निर्णय घेतला. 

नक्षलीभाग संवेेदनशील असल्याने माेठ्या टीमसाेबत काम करणे शक्य नव्हते. तेथे जाऊन तेथील लाेकांच्या समस्या जगताप यांनी समजून घेतल्या. नक्षलवाद्यांच्या हातातून शस्त्र टाकून त्यांच्या हातात पुस्तक देण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधला हाेता. त्यासाठी त्यांनी गडचिराेलीत तत्कालिन पाेलीस अधिक्षक संदीप पाटील, सध्याचे अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास सुंचुवार यांची मदत मिळाली. सुरुवातीला त्यांनी नक्षलपिडीत 110 कुटुंबियांना सायकलींचे वाटप केले. त्याचबराेबर आत्मशरण आलेल्या नक्षलींसाठी अग्निपंख ही याेजना त्यांनी हाती घेतली. या दुर्गम भागात लाईट नव्हती. त्यांनी 1035 घरांमध्ये वीज आणली. तेथील 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या दिल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील पाेलीस स्टेशनमध्ये त्यांनी पुस्तकांचे ग्रंथालय सुरु केले. 

नक्षली भागात हिंसेचे विचार जाऊन गांधी विचार रुजावेत यासाठी त्यांनी गांधी विचार परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. जे नक्षलवादी शरण आले आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे विचार बदलण्याचे काम जगताप यांनी केेले. या नक्षलींसाठी विविध लाेकांचे लेक्चर्स ठेवून त्यांना गांधींच्या अहिंसेच्या विचारांकडे वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गडचिराेलीतील 56 माओवाद्यांनी गांधी विचार परीक्षा दिली. ज्या जिल्ह्याने कायम हिंसा पाहिली तेथे अहिंसेचे बीज राेवण्याचे काम त्यांनी केले. या पुढे जात विविध धर्मअभ्यासकांना बाेलावून शांतीचा संदेश या भागात दिला. याचीच परिणीती म्हणजे सर्व धर्मातील शांतीचे संदेश एकत्र करत त्याचे पुस्तक तयार करुन त्याचे सामुहिक पठण करण्यात आले. या उपक्रमात आत्मसमर्पित नक्षली, शहीद पाेलीसांची कुटुंबे, नक्षल पिडीत लाेक, पाेलीस, विद्यार्थी असे एकूण 7 हजार लाेक सहभागी झाले. याची दखल गिनिज बुकच्या जागतिक विक्रमांमध्ये घेण्यात आली. 

नक्षली भागात आराेग्य, शिक्षण, रस्ते यावर काम केल्यास तेथील नक्षलवाद संपून जाईल असा विश्वास जगताप यांना वाटताे. नक्षलवाद्यांशी संंवाद साधून त्यांच्यात विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे जगताप सांगतात. नक्षलवादावर काम करणे ही काळाजी गरज असल्याचेही ते सांगतात. एका गणेश मंडळापासून सुरु झालेला प्रवास त्यांना जागतिक विक्रमापर्यंत घेऊन गेला. जगताप यांची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 

Web Title: He made a world record of peace in the violence region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.