Good news! Children are reading Marathi, 'good days' to child seekers | खुशखबर! मुले मराठी वाचताहेत, बालसाहित्याला ‘अच्छे दिन’
खुशखबर! मुले मराठी वाचताहेत, बालसाहित्याला ‘अच्छे दिन’

- प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : मुले वाचत नाहीत; किंबहुना मुले मराठी पुस्तके वाचत नाहीत, ही चिंता कायमच पालकांना, लेखकांना सतावत असते. मराठीच्या तुलनेत मुलांचा इंग्रजी भाषेकडील वाढता कल हीसुद्धा डोकेदुखी ठरत आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळी सुट्टीने मराठी बालसाहित्याला ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत. चरित्रविषयक लिखाणासह अनुवादित साहित्याकडील मुलांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मराठी बालसाहित्याची मागणी वर्षभराच्या तुलनेत उन्हाळ्याच्या सुट्टीत २०-२५ टक्क्यांनी वाढली
आहे.
सध्याच्या काळात मुलांवर मनोरंजनाच्या नानाविध पर्यायांचा अक्षरश: भडिमार होत आहे. मॉल संस्कृती, मल्टिप्लेक्समधील झगमग, मोबाईल, टीव्हीकडील वाढता कल यामुळे मुले वाचनापासून दूर होत आहेत. कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला वाव देणारे वाचनच काळाच्या ओघात मागे पडत चालले आहे. त्यातही इंग्रजी विरुद्ध मराठी ही लढाई चिंतेचा विषय बनली आहे. मुले एकतर कमी वाचतात आणि त्यातही इंग्रजीवर भर देतात, हे वास्तव सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी या डोकेदुखीला अपवाद ठरली आहे. मुलांनी मोठ्या प्रमाणात मराठी पुस्तकांना पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मराठी पुस्तकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे समाधान प्रकाशक, बालसाहित्यिकांकडून व्यक्त केले जात आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने मुलांसाठी ग्रंथालय व्यवस्था, वाचनाची शिबिरे, बालसाहित्यिकांशी संवाद, ओरिगामी, चित्रकला, गोष्टींचा तास अशा विविध उपक्रमांवर भर देण्यात आला. एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांमध्ये बालमहोत्सव आयोजित करण्यात आल्याने मुलांकडून भरघोस प्रतिसाद
मिळाला.
मुलांना वाचायला आवडतेच; मात्र मुलांना पुस्तकांपर्यंत पोहोचवता आले किंवा पुस्तके मुलांपर्यंत पोहोचली तर वाचनाशी त्यांची नक्कीच गट्टी जमते, असा विश्वास बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे
यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘‘पीयूची डायरी’ या पुस्तकाबाबत चिमुरड्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. शहरी मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांमध्येही वाचनाचे वेड पाहायला मिळते. मुले वाचत आहेत, प्रश्न विचारत आहेत, ही आशादायक बाब आहे. मुलांना वाचनाची आवड लावण्याची जबाबदारी पालक, शाळा, लेखक अशा सर्वांचीच आहे, हे विसरून चालणार नाही.’’

त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचण्याची गरज
यंदाच्या उन्हाळी सुट्टीत मुलांनी आत्मचरित्र, शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांचे चरित्र, जंगल बुक, माधुरी पुरंदरे यांचे ‘राधाचं घर’, राजीव तांबे यांचे ‘प्रेमळ भूत’, कोंबडू, मांजरु ही सिरीज, अशा पुस्तकांना विशेषत्वाने पसंती दिली. रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’ या लीना कचोळे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकांच्या २००हून अधिक प्रतींची विक्री झाली. वर्षभराच्या तुलनेत बालसाहित्याच्या खरेदीत २०-२५ टक्क्यांनी वाढ झाली. मुले वाचत नाहीत, असे म्हणून चालणार नाही. त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचण्याची गरज आहे. ही जबाबदारी पालकांनी पार पाडावी आणि काय निवडावे, वाचावे हे मुलांना ठरवू द्यावे.
- रमेश राठिवडेकर,
अक्षरधारा

बालसाहित्याकडे वाढतोय कल
गेल्या काही वर्षांत बालसाहित्याकडील कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चि. विं. जोशी यांच्या साहित्याला आजही खूप पसंती दिली जाते. मुलांचा अनुवादित साहित्याकडील कलही वाढलेला दिसत आहे. मुले वाचत नाहीत, ही भीती अनाठायी आहे. विज्ञानमालांमधून मुलांना हसत-खेळत विज्ञान शिकण्याची संधी मिळत आहे.
- देवयानी अभ्यंकर,
कॉन्टिनेन्टल प्रकाशन

एकूणच साहित्याला मागणी कमी
जंगल बुक या अनुवादित पुस्तकाचा वाचकवर्ग यंदाच्या सुट्टीत वाढल्याचे पाहायला मिळाला. याशिवाय माधुरी पुरंदरे यांच्या सर्वच पुस्तकांना चांगली पसंती मिळत आहे. पण, वाचन कमी होत आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केवळ बालसाहित्याची नव्हे, तर एकूणच साहित्याची मागणी कमी झाली आहे.
- मिलिंद परांजपे,
ज्योत्स्ना प्रकाशन


Web Title:  Good news! Children are reading Marathi, 'good days' to child seekers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.