लेक लाडकी त्या घरची....काढली वरात '' बुलेट '' वरची... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:29 PM2019-05-30T17:29:14+5:302019-05-30T17:32:23+5:30

शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाहस्थळापर्यंत बुलेटवरून वरात काढुन तिची हौस पूर्ण केली आहे...

girl marriage miravnuk on bullet motorcycle | लेक लाडकी त्या घरची....काढली वरात '' बुलेट '' वरची... 

लेक लाडकी त्या घरची....काढली वरात '' बुलेट '' वरची... 

googlenewsNext

बारामती : लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता..तशी वधूकडची मंडळीत चुळबुळ सुरु झाली.. विशेष करुन मुलीच्या मैत्रिणी , नातेवाईक महिला यांचा काहीतरी प्लॅन सुरु असल्याची कुजबुज वऱ्हाडी मंडळींच्या कानावर पडली. पण नेमकं वधूपक्षात चाललंय तरी काय..थांगपत्ता काही केल्या लागेना.. इतक्यात मुहूर्त जवळ आल्यावर एकदम बुलेट गाड्यांचा आवाज येऊ लागला.. इंदापुर तालुक्यातील सणसर येथील शेतकऱ्याच्या मुलीची बुलेटवरुन लग्नमंडपात अवतरली.. आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अशा प्रकारे बुलेटवरुन काढलेली वरात परिसरात कुतुहलाचा विषय ठरली.. 
मुलीला दुचाकी चालविण्याची आवड आहे. विशेष तिला बुलेट चालविण्याचे मोठे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाहस्थळापर्यंत बुलेटवरून वरात काढुन तिची हौस पूर्ण केली आहे. सणसर परिसरातील या वधुची संपुर्ण वरातच बुलेटवर काढण्यात आली.या वरातीमध्ये वधुसह २५ बुलेटस्वार सहभागी झाले होते. नातेवाईकांसह सणसरच्या ग्रामदैवताला फेरी मारुन वरात विवाहस्थळी पोहचली. प्रकाश विनायकराव निंबाळकर यांची ज्येष्ठ कन्या रेश्मा हिचा विवाह श्री क्षेत्र माहुली (तालुका आणि जि.सातारा )येथील नारायण आबाजी जाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव गौरव याच्यासमवेत भवानीनगर येथे श्री छत्रपती मंगल कार्यालयात पार पडला. मुलगी रेश्मा आर्किटेक्चर इंजिनिअर आहे. या विवाहासाठी सकाळपासूनच मित्र परिवार आणि नातेवाईक जमा झाले. 
 बॅन्ड-बाजा,ताशा,तुतारी सारख्या पारंपारीक वाद्याद्वारे यावेळी नातेवाईक मंडळींचे स्वागत सुरु  होते. यावेळी एकाच वेळी २५ बुलेटच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यावर नववधू  रेशमा चक्क फेटा बांधून, गॉगल लाऊन लग्न मंडपात दाखल झाली. यावेळी वधुसमवेत असणाºया इतर नातेवाईकांनी देखील पारंपारीक फेटे परीधान केले होते. त्यामुळे हि आगळीवेगळी वरात पाहुन अनेकांच्या  भुवया उंचावल्या. वधु म्हणजे लाजत, खाली मान घालुन मंडपात प्रवेश करते,हा बहुतांश  विवाहामधील अनुभव आहे.आज मात्र, नवरीबाईचा बुलेटवरील  थाट,आत्मविश्वास पाहुन अनेकांनी टाळ्या वाजवुन तिचे स्वागत केले.  मुलीचे चुलते जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, मुलगी म्हणजे दोन्ही घरांना जोडणारा दुवा असतो.तिच्या भावनांचा सन्मान राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आजच्या युगात मुलींच्या आवडीनिवडी महत्वपुर्ण आहेत.माझ्या पुतणीला सर्वच दुचाकी चालविण्याचे कसब आहे.बुलेटची तिला विशेष आवड आहे.त्यामुळे तिच्या विवाहानिमित्त पाठवणीची ही वरात आगळीवेगळी काढ्ण्याची संकल्पना आम्ही कुटुंबियांनी राबविली. 

Web Title: girl marriage miravnuk on bullet motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.