Get permission for expression - Anupam Kher | अभिव्यक्तीसाठी परवानगी घ्यावी - अनुपम खेर
अभिव्यक्तीसाठी परवानगी घ्यावी - अनुपम खेर

पुणे - बाप-मुलांमध्ये काही गोष्टींवरून मतभेद असतात, तसेच नाते प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे आहे. चित्रांमधून अभिव्यक्त व्हायचे आहे ना? ती होण्यासदेखील हरकत नाही. मात्र ते करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यायला हवी. एखादी कृती विचारून केली तर नक्कीच ती नाकारली जाणार नाही, अशा शब्दांत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रातील अभिव्यक्तीवर एकीकडे आक्षेप घेतला तर दुसरीकडे ‘संजू’ या चित्रपटाच्या अभिव्यक्तीवर मात्र एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. सत्याचे आपापल्या परीने अर्थ लावले जाऊ शकतात. सत्य हेच आपल्याला पुढे नेते असे सांगून त्यांनी दिग्दर्शकाची कलाकृतीची पाठराखण केली.
दोन ते तीन महिन्यांनंतर अनुपम खेर यांनी एफटीआयआयला भेट दिली. ते संस्थेमध्ये आल्याचे त्यांनी स्वत: ट्विटर वर व्हिडीओ टाकून शेअर केले. त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. तीन दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांनी कॅँटीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्रे काढली. या चित्रांमध्ये एका चित्रात कवी फैज अहमद फैज यांच्या कवितेच्या हम देखेंगे या ओळी लिहिल्या. रात्रीच्या वेळी हेतुपुरस्पर दहशत पसरविण्याच्या हेतून ही चित्रे काढली असल्याचा आरोप ठेवत एफटीआयआय प्रशासनाने विद्यार्थ्यांना नोटीस पाठविली. त्याविषयी विचारले असता खेर यांनी विद्यार्थ्यांच्या कृतीवर आक्षेप
घेतला.
बाप-मुलाचे उदाहरण देऊन कुटुंबातही कुठलीही गोष्ट वडिलांची मान्यता मिळाल्यानंतरच केली जाते तशीच इन्स्टिट्यूटमधील संचालकांना विचारून अभिव्यक्तीचे सादरीकरण करायला हवे. कोणतीही गोष्ट विचारून केली तर नक्कीच परवानगी मिळेल, असे त्यांनी सांगितले.
संस्थेतर्फे देशभरात घेण्यात येणाऱ्या कमी कालावधीच्या कोर्सचेदेखील त्यांनी समर्थन केले. सामान्य लोकांना संस्थेशी जोडून घेणे त्यांच्यापर्यंत इन्स्टिट्यूटने पोहोचावे हा त्यामागील उद्देश
आहे.
चित्रसाक्षरता निर्माण व्हावी आणि संस्थेनेदेखील अशा कोर्समधून निधी उभा करावा, एवढ्याच अपेक्षेने हे कोर्स देशभरात सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

नियामक मंडळाच्या स्थापनेसाठी काही नावे सुचविलीत

नियामक मंडळाचे अध्यक्ष होऊन खेर यांना नऊ महिने झाले तरी अद्याप ‘एफटीआयआय’चे नियामक मंडळच स्थापन झालेले नाही, याविषयी छेडले असता ते म्हणाले, मंडळाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
माझ्याकडून काही नावे सुचविली आहेत. एक यादी तयार झाली आहे जी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच मंडळ स्थापन केले जाईल. एफटीआयआयचा जगातील दहा प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये समावेश झाला आहे.
ज्या सकारात्मक गोष्टी होत आहेत त्या दिसत नाहीत मात्र जे घडत नाही त्याच गोष्टी दृष्टिक्षेपात आणल्या जातात, याबद्दल त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.
 


Web Title: Get permission for expression - Anupam Kher
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.