गंगूबाई हनगल यांचा तानपुरा पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयात विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:51 PM2017-11-30T12:51:35+5:302017-11-30T12:55:31+5:30

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. गंगुबाई हनगल यांचा स्वर अनुभवलेला तानपुरा बुधवारी राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संग्रहात दिमाखात विराजमान झाला.

Gangubai Hangal's Tanpura in raja Dinkar Kelkar Museum in Pune | गंगूबाई हनगल यांचा तानपुरा पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयात विराजमान

गंगूबाई हनगल यांचा तानपुरा पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयात विराजमान

Next
ठळक मुद्देगंगुबाई यांचे नातू अ‍ॅड. मनोज हनगल यांनी संग्रहालयाकडे सुपूर्त केला तानपुराहुबळी येथील घरात साकारण्यात आले ‘गंगुबाई हनगल म्युझिक म्युझियम’

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे सुवर्णयुग अनुभवलेल्या आणि ‘कन्नड कोकिळा’ अशी ओळख असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. गंगुबाई हनगल यांचा स्वर अनुभवलेला तानपुरा बुधवारी राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संग्रहात दिमाखात विराजमान झाला. गुरु पं. सवाई गंधर्व यांच्या तानपुऱ्याशेजारी हा तानपुरा विराजमान झाल्याने गुरु-शिष्य जोडी आज लौकिक अर्थाने पुन्हा अजरामर झाली.
गंगुबाई यांचे नातू अ‍ॅड. मनोज हनगल यांनी संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांच्याकडे एका छोटेखानी समारंभात हा तानपुरा सुपूर्त केला. गंगुबाई यांचा तारांवरून फिरलेला हात आणि त्यांचे स्वर अनुभवलेल्या तानपुऱ्याने वाद्यांचे दालन अधिक समृद्ध झाले. गंगुबाई यांची नात वैष्णवी हनगल-तलकाड, माधवी जोशी, जावई विश्वजीत जोशी, पणती सुहास हनगल, ऐश्वर्या जोशी व  पणतू मानस जोशी यांच्यासह पं. सवाई गंधर्व यांच्या नातसून शीला देशपांडे, गायिका पद्मा देशपांडे, किराणा घराण्याचे गायक उपेंद्र भट, राजेंद्र कंदलगावकर उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित छोटेखानी मैफिलीत हनगल यांचे शिष्य पं. अशोक नाडगीर आणि वैष्णवी हनगल यांचे गायन झाले. त्यांना बसवराज हिरेमठ (संवादिनी) व राजेंद्र भागवत (तबला) यांनी साथसंगत केली.
संग्रहालयाला देणगी स्वरुपात मिळालेले हे चोविसावे वाद्य आहे. वाद्य दालनामध्ये साडेचारशेहून अधिक वाद्ये आहेत. त्यामध्ये उस्ताद सलामत अली, उस्ताद नजाकत अली, पं. सवाई गंधर्व, पं. सुरेशबाबू माने, पं. बालगंधर्व यांचे तानपुरे, उस्ताद अल्लारखाँ यांचा तबला, पं. रामशंकर पागलदास यांचा पखवाज, पं. मधुकर गोळवलकर यांची तारशहनाई, पं. गोविंदराव टेंबे यांची संवादिनी, उस्ताद बंदे अली खाँ यांची बीन, उस्ताद कादरबक्ष खाँ यांची सारंगी या वाद्यांचा समावेश आहे, असे सुधन्वा रानडे यांनी सांगितले.

 

गुरु पं. सवाई गंधर्व यांच्या तानपु-याशेजारी आपला तानपुरा असावा, अशी आजीची इच्छा होती. एकदा मी आजीबरोबर संग्रहालयामध्ये आलो असता, तिने सवाई गंधर्व यांच्या तानपुऱ्याला नमस्कार केला होता. पुण्याला आल्यानंतर ती न चुकता येथे येऊन तानपु-याचे दर्शन घेत असे. पूर्वी तानपुरा सहज उपलब्ध होत नसे. मिरज येथून ७० वर्षांपूर्वी मिरजकर यांच्याकडून घडवून घेतलेल्या या तानपुऱ्याने अनेक मैफलींमध्ये आजीला साथसंगत केली.    

- अ‍ॅड. मनोज हनगल

 

साडेचारशे छायाचित्रांचा संग्रह
हुबळी येथील घरात ‘गंगुबाई हनगल म्युझिक म्युझियम’ साकारण्यात आले आहे. त्यामध्ये गंगुबाई हनगल यांचे चार तानपुरे, संवादिनी, सारंगी, तुंबा आदी वाद्यांसह त्यांना मिळालेले ‘पद्म’ किताब आणि विविध पुरस्कारांचा समावेश आहे. गायक आणि संगीतकारांच्या साडेचारशे छायाचित्रांचा संग्रह येथे करण्यात आला आहे.

Web Title: Gangubai Hangal's Tanpura in raja Dinkar Kelkar Museum in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे