मोफत तपासण्यांसाठीही मोजावे लागतात पैसे; गरिबांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 03:37 AM2018-12-13T03:37:00+5:302018-12-13T03:37:16+5:30

कमला नेहरू रुग्णालयात डायग्नोस्टिक सेंटरकडून दिरंगाई

Free check also requires money to be paid; Poor exploitation | मोफत तपासण्यांसाठीही मोजावे लागतात पैसे; गरिबांची पिळवणूक

मोफत तपासण्यांसाठीही मोजावे लागतात पैसे; गरिबांची पिळवणूक

Next

- विशाल शिर्के 

पुणे : डेंग्यू, चिकुणगुणिया, एचआयव्ही अशा रक्त चाचण्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत दिल्या जातात. डेंग्यूसाठी तर सर्व उपचारच मोफत असताना, शहरातील गरीब रुग्णांना याचा लाभच दिला जात नाही. मोफत रक्त तपासणीसाठी देखील पैसे आकारले जात असून, महापालिकेने कमला नेहरू हॉस्पिटलमधे नेमलेल्या डायग्नोस्टिक सेंटरकडून वेळेत रिपोर्ट दिले जात नसल्याने रुग्णांना खासगी पॅथॉलॉजी सेंटरकडे धाव घ्यावी लागत आहे. या प्रकरणी रुग्णाने तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित संस्थेला मेमो बजावला आहे.

याप्रकरणी रुग्णाचे वडील युसूफ खान यांनी सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांच्यामार्फत महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी अंजली साबणे यांच्याकडे १७ सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. डेंग्यूच्या पेशंटवर कोणतेही शुल्क न आकारता मोफत उपचार केले जातात, असे उत्तर आरोग्य विभागाने माहिती अधिकारात दिले आहे. रुग्ण गर्भवती असल्यास त्यास रक्त तपासणीची सुविधा मोफत आहे. सोनोग्राफी आणि एक्स-रेची सुविधादेखील मोफत असल्याचे आरोग्य विभाग म्हणते. अशी रक्त तपासणीची जबाबदारी सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वानुसार क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरने दिले आहे.

या सेंटरकडून मोफत सुविधांची माहिती न देता डेंग्यूच्या रक्तचाचणीसाठी पैसे आकारले जात आहेत. काही तपासण्यांसाठी त्याच रुग्णालयातील खासगी डॉक्टरांकडे पाठविण्यात येत आहे. त्यांच्याकडून केवळ तपासणीसाठीच शंभर रुपये आकारले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जुनेद खान (वय १९) यांना कमला नेहरू रुग्णालयात सप्टेंबरमध्ये दाखल करण्यात आले होते. डेंग्यूच्या संशयावरून त्यांचे रक्त तपासणीसाठी क्रस्ना सेंटरकडे दिले; मात्र त्याचा रिपोर्ट वेळेत मिळाला नाही. त्यासाठी ५२ रुपये आकारले होते. या तक्रारीनंतर २४ सप्टेंबर २०१८ रोजी कमला नेहरू रुग्णालयातील क्रस्ना सेंटरला मेमो बजावला. त्यात सेवेबाबत रुग्णांकडून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी येत आहेत. कामगार लॅब कलेक्शनसाठी वेळेवर येत नाहीत. त्याचे रिपोर्टही तीन दिवसांनी मिळतात. याशिवाय बिलाच्या पावत्या मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा खुलासा करावा असा मेमो काढला. त्यावर प्रश्न सोडून भलतेच उत्तर डायग्नोस्टिक सेंटरने दिले असून, कमला नेहरू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीदेखील खुलासा असमाधानकारक असल्याचा अभिप्राय नोंदविला आहे.

कामात सुधारणा नाही : कमला नेहरू रुग्णालयाने काढलेला मेमो
आपल्या लॅबप्रमुखांना सतत रुग्ण व नातेवाइकांच्या लेखी व तोंडी स्वरूपाच्या तक्रारी देऊनही कामात सुधारणा होत नाही. लॅब कलेक्शनसाठी वेळेवर कामगार येत नाहीत; तसेच अत्यावश्यक रिपोर्टदेखील ३ दिवसांनी मिळतात. लॅबच्या बिलाच्या पावत्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.

क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरने केलेला खुलासा
आपल्या तक्रारीची संस्थेच्या संचालक मंडळाने योग्य दखल घेतली असून, प्रयोगशाळा प्रमुख व तंत्रज्ञ यांना समज दिली आहे. भविष्यात तक्रार येऊ न देण्याचा तपशिलवार आराखडा मागितला आहे. संस्थेने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. आपल्या सूचनेनुसार त्यात वाढ करण्यात येईल.

खुलाशावर वैद्यकीय अधीक्षकांचा अभिप्राय
रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनंतर कमला नेहरूमधील वैद्यकीय अधीक्षकांनी क्रस्ना डायग्नोस्टिकने असमाधानकारक
खुलासा दिला असल्याची माहिती महानगर पालिकेच्या सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना कळवली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात डेंग्यूवरील संपूर्ण उपचार मोफत असल्याचे महापालिका म्हणते. संबंधित रुग्णाकडे तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिकादेखील होती. त्यानंतरही उपचार मोफत सोडा, सवलतीच्या दरातही मिळत नाहीत. उलट रक्ततपासण्यांसह तपासणी देखील खास व्यक्तीकडून करून घेण्यास सांगण्यात येते. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दिली आहे.
- वाजिद खान, तक्रारकर्ते

रुग्णालयात गेल्यानंतर रक्त तपासणीसाठी खासगी पॅथॉलॉजीतील व्यक्तींना बोलाविण्यात आले. रक्त तपासणीसाठी सहाशे रुपये मोजावे लागले. त्याचे कारण प्रशासनाला विचारले असता आमचे रिपोर्ट येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. रुग्णाची स्थिती थोडीशी खराब असल्याने आम्ही ते केले. मात्र, आणखी तपासण्यासाठी त्याच रुग्णालयातील खासगी डॉक्टरकडे पाठविण्यात आले. त्यांनी तपासणीचेच शंभर रुपये घेतले. 
- तबस्सुम खान, रुग्णाची आई

Web Title: Free check also requires money to be paid; Poor exploitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.