चाळीस वर्षांपूर्वीचा निवारा क्षणात नष्ट; २२ कुटुंबे रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 01:55 AM2019-01-10T01:55:46+5:302019-01-10T01:56:44+5:30

घोरपडी रेल्वे प्रशासन : १९७३ पासूनची होती वस्ती, रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरे पाडली

Forty years ago the shelter was destroyed; 22 families on the streets | चाळीस वर्षांपूर्वीचा निवारा क्षणात नष्ट; २२ कुटुंबे रस्त्यावर

चाळीस वर्षांपूर्वीचा निवारा क्षणात नष्ट; २२ कुटुंबे रस्त्यावर

Next

मनोज गायकवाड

मुंढवा : आमची घरं पाडली... आम्हाला निवारा नाही... आम्ही रस्त्यावरंच राहतोया.. कुटुंबात लहान लेकरंबाळं आहेत... बायामाणसं आहेत. या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच्या बिछान्यातच झोपतोया... रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशातच स्वयंपाक अन् पोरं शाळेचा अभ्यास करत्यात... दोन वेळचं जेवणही मिळंनासं झालंया... साहेबा.. आम्हाला या थंडीत कोणी घर देता का घर... अशी आर्त हाक घोरपडी येथील रेल्वे प्रशासनाने रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरे पाडल्यामुळे संसार रस्त्यावर आलेल्या महिला देत आहे.

शनिवार, २२ डिसेंबर २०१८ रोजी घोरपडी येथील रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरांवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली. या कारवाईत साधारण २२ घरे जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही घरे पत्र्याची, तर काही घरे विटांची होती. यात काही जण साधारण १९७३ पासून येथे वास्तव्य करीत होते. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर समोरील रस्त्यावरच या २२ कुटुंबांनी आपले संसाराचे साहित्य मांडून तिथे राहत आहेत. तिथे ना पाणी, ना वीज, ना छप्पर अशा परिस्थितीतही ही कुटुंबे उघड्यावरच राहत आहेत. ही कारवाई झाल्यानंतर काही नगरसेवकांनी तुम्हाला १५ दिवसांत घरे मिळतील, अशी आश्वासने दिली आहेत. याविषयी पुणे महानगरपालिकेत मीटिंगही झाल्या आहेत. येथील नागरिकांनी काही कागदपत्रेही जमा केली आहेत. त्यावर एक महिनाभरात तुमची सोय होईल, असे येथील महिलांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे. अशा वातावरणात ही कुटुंबे कशी राहत असतील. येथील कुटुंबात ६ महिने ते ७ वर्षे वयोगटातील १० मुले आहेत. वयोवृद्ध १०, महिला ४० व पुरुषांची संख्या १८ इतकी आहे. त्यांचे खाणे-पिणे, झोपणे, अंघोळ या सगळ्या गोष्टी रस्त्यावरच करीत आहेत. या कुटुंबांना हवा आहे निवारा तोही स्वसंरक्षणासाठी घरातील महिलांच्या व लहान मुलांच्या. व्यवस्थेने रस्त्यावर आणले. भले ही घरे अनधिकृत होती; पण या कुटुंबातील माणसे ही हाडामासाची आहेत. त्यांनाही भावना आहेत. लहान लेकरे व महिला उघड्यावरच झोपत आहेत. लवकरात लवकर आम्हाला निवारा मिळावा, अशी भावना येथील नागरिकांची आहे. या वेळी येथील रहिवासी रेखा कांबळे म्हणाल्या, ‘गेले १९ दिवस झाले आम्ही रस्त्यावर राहत आहोत. कारवाई झाल्यापासून येथील नगरसेवकांनी दोन वेळचे जेवण दिले. त्यानंतर एक वेळचे जेवण मिळायची भ्रांत पडली. काहींनी तरी घराचे राहिलेले पत्रे विकून स्वयंपाकासाठी किराणा भरला आहे. घरात लहान लेकरंबाळं आहेत. त्यांना उराशी घेऊन रात्र काढत आहे. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडावर सगळं चाललं आहे.’
रूपाली फणसे म्हणाल्या, ‘मला दोन लहान मुले आहेत. एक मुलगी शाळेत जाते. दिवस कसाबसा निघून जातो. पण रात्री व पहाटे थंडीने मुले अक्षरश: गारठतात. येथील हातगाडीचा आडोसा घेऊन आम्ही महिला अंघोळ करतो. रात्रीच्या २-३ च्या सुमारास अज्ञात पुरुष गाडीवर येऊन घुटमळतात. आम्ही महिला अशा परिस्थितीत कशा राहत असतील. आमचे संरक्षण आमचा पाळलेला कुत्राच करत आहे. तो रात्रीचा पहारा देतो. चोरायला आमच्या गरिबांकडे काहीही नाही. पण लहान लेकरंबाळ जर कोणी उचलून नेली तरी त्याचीच जास्त भीती वाटते. आम्ही सर्व कुटुंबे एकमेकांना आधार देत राहत आहोत. आम्हांला लवकरात लवकर निवारा मिळाला तर आमच्या लेकरांची आबाळ होणार नाही. या थंडीने मुले आजारी पडली आहेत.’

काव्या फणसे (वय ७) म्हणाली, ‘मी शाळेत दुसरी इयत्तेत शिकते. मला इथे खूप थंडी वाजते. इथे खूप अंधार असतो. आमच्या घराला भिंत नाही की छप्पर नाही. काका आम्हाला कधी घर मिळणार. काका मला इथे फार भीती वाटते. आम्हाला कोणी घर देईल का हो... शाळेत मला सगळे विचारतात, तू रस्त्यावर का राहते?’

आर्त हाक नवाऱ्याची.....
कोणी घर देता का घर या डायलॉगने अनेकांचे करिअर घडविले. काहींनी पैसाही कमविला असेल. परंतु इथे मात्र खरंच प्रत्येक माणुस व्याकुळतेने निवा-यासाठी खरच घर मागतोय. परंतु हा खरा खुरा डायलॉग ऐकण्यासाठी कोणताही व्यवस्थेचा माणुस समोर नाही. दाद मिळत आहे ती पोकळ आश्वासनांची. तोपर्यंत या व्याकुळ झालेल्या माणसांनी झुंज द्यायची ती कुठपर्यंत.......
 

Web Title: Forty years ago the shelter was destroyed; 22 families on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे