गड किल्ल्यांचा अभ्यासक काळाच्या पडद्याआड; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:27 PM2017-10-17T14:27:45+5:302017-10-17T14:37:31+5:30

गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने आज (मंगळवार, दि. १७) सकाळी निधन झाले. अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.

The fort of the fort is behind the curtains of the era; Pradod Mande passes away | गड किल्ल्यांचा अभ्यासक काळाच्या पडद्याआड; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन

गड किल्ल्यांचा अभ्यासक काळाच्या पडद्याआड; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देगडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा, त्याविषयी अभिमान जागृत राहावा यासाठी मांडे सदैव कार्यरतहजारो तरुणांची फौज गड किल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी त्यांनी तयार केली.

पुणे : गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने आज (मंगळवार, दि. १७) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 
छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचे खरे साक्षीदार असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ल्यांची भ्रमंती करून मांडे यांनी महाराष्ट्रातील तरुणांना हा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष दाखविण्याचे काम केले आहे. मांडे यांनी तब्बल ४० वर्षे सह्याद्रीच्या रांगामध्ये पायी भ्रमण करून २ हजार किल्ले पाहिले. त्याबाबत लेखन केले. त्याचे छायाचित्रण केले. टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. 
छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आत्मसात करायचा असेल तर गड किल्ल्यांनाच भेटी दिल्या पाहिजेत, असे ठाम मत मांडे यांचे होते. याच ध्यासापोटी त्यांनी महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतील २ हजार किल्ले तर पाहिलेच पण देशभरातील इतर प्रमुख किल्ल्यांनाही प्रत्यक्ष जाऊन पाहिले. अशा या ध्येयवेड्या इतिहास अभ्यासकाकडे तब्बल १५ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. त्यासोबत ३ हजार स्लाईड्स, २ लाखांहून अधिक गडकिल्ल्यांचे व भटकंतीचे फोटो, ४५० क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटो व तैलचित्रे मांडे यांच्या संग्रही आहेत. विशेष म्हणजे राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड असा छत्रपती शिवाजी राजांनी सात राज्यातून केलेल्या तब्बल ६३०० किमीच्या प्रवासमार्गावर मांडे यांनी दोनवेळा प्रवास केला. त्याचा अभ्यास व संशोधन करून या मागार्चे छायाचित्रीकरण त्यांनी केलेले आहे. पुढील पिढीसाठी ते मोलाचे ठरणारे आहे.
मांडे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र अशी काही निवडक पुस्तकांची नावे सांगता येतील. मांडे यांनी छत्रपतींचा इतिहास, आझादी के दिवाने हा क्रांतिकारकांच्या जीवनावरील कार्यक्र, शिवरायांची आग्रा मोहीम असे अनेक कार्यक्रम व आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. या विषयांवर दोनशेहून अधिक प्रदर्शने केली आहेत. 
पुढच्या पिढीला मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा, त्याविषयी अभिमान जागृत राहावा यासाठी मांडे सदैव कार्यरत राहिले. त्यासाठी पुणे व्हेंचर्स, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, वडवानल प्रतिष्ठान, भारत इतिहास संशोधक मंडळ, लोकसेवा प्रतिष्ठान, गडकिल्ले सेवा समिती इत्यादी अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. 
मांडे हे भाऊ म्हणूनच सर्वांना परिचित होते. तब्बल २ हजारांहून अधिक गड किल्ल्यांचा पायी फिरून अभ्यास केलेल्या भाऊंना 'दुर्ग महर्षी' व 'सह्याद्री पूत्र' म्हणूनही उपाधी दिली गेली. इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले नवीन पिढीने प्रत्यक्ष जाऊन पाहिले पाहिजेत यासाठी मांडे आग्रही होते. त्यातूनच त्यांनी हजारो तरुणांची फौज गड किल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी तयार केली होती. शेवटपर्यंत त्यांचा हा ध्यास कायम राहिला.

Web Title: The fort of the fort is behind the curtains of the era; Pradod Mande passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.