Forestry airport combustion, symbolic Holi of the villagers | वनपुरीत विमानतळाचे दहन, ग्रामस्थांची प्रतीकात्मक होळी
वनपुरीत विमानतळाचे दहन, ग्रामस्थांची प्रतीकात्मक होळी

जेजुरी - वनपुरी येथे ग्रामस्थांनी शिमग्याच्या दिवशी होळीत विमानतळाचे प्रतीकात्मक दहन करून पुरंदर तालुक्यात होणाºया विमानतळाचा निषेध केला. या वेळी सर्व ग्रामस्थांनी बोंबा मारून शासनाविरोधी घोषणा देत विमानतळाला विरोध केला. विमानतळामुळे येथील काही गावांतील ग्रामस्थांच घरदारे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असल्याने वनपुरी येथील ग्रामस्थांनी होळीचा उत्सव साजरा करताना विमानतळाचे प्रतीकात्मक दहन केले. या वेळी ग्रामस्थ जो कोणी तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील नेता आमच्याबरोबर विमानतळास विरोधासाठी सामील होईल, त्यालाच यापुढे गावात प्रवेश देण्याचा तर जो कोणी नेता किंवा अधिकारी विमानतळास पाठिंबा द्या, असे सांगण्यास येईल त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपुर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वणपुरी, उदाचीवाडी या सात गावांच्या परिसरातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्रावर छत्रपती संभाजीराजे विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाला हव्या असणाºया सर्व परवानग्या मिळाल्याने लवकरच जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सातही गावांतील ग्रामस्थांचा विमानतळास मोठा विरोध आहे. गेल्या दीड वर्षापासून पुरंदर विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून येथील ग्रामस्थ विरोध दर्शवीत आहेत. बाधित शेतकºयांनी कोणत्याही परिस्थितीत विमानतळाला जमिनी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक गावातून वेगवेगळी आंदोलने होऊ लागली आहेत. होळीच्या सनानिमित्त वनापुरी येथील ग्रामस्थांनी विमानतळाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याची होळी केली.
यावेळी मा. सरपंच एकनाथ कुंभारकर, मा.सरपंच रामदास कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, शांताराम कुंभारकर, सतिश कुंभारकर, नामदेव कुंभारकर, मारूती कुंभारकर, अंकुश कुंभारकर, बाळुकाका कुंभारकर सयाजी कुंभारक,र दिलीप माणिक कुंभारकर, विजय कुंभारकर, मोहन कुंभारकर, दिनकर कुंभारकर, सखाराम कुंभारकर, नाना खेडेकर, सुभाष गोळे, माजी सैनिक संघटना वनपुरी सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यातील शेतकºयांच्या जिवावर उठलेल्या विमानतळास माजी सैनिक संघटनेचा पूर्ण विरोध असून सर्व ग्रामस्थांनी पंतप्रधान कार्यालय, विमानतळ प्राधिकरण मुंबई व दिल्ली कार्यालय, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना प्रत्येकी पाच वैयक्तिकरीत्या पत्रे पाठवून आमचा विरोध नोंदवलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला विमानतळ नको आहे. जमिनीवर कोणत्याही प्रकारचे शिक्के मारू नये, किंवा भूसंपादन करू नये आणि आम्ही ते होऊ देणार नाही.
- अप्पा कुंभारकर,
अध्यक्ष, माजी सैनिक संघटना

वनपुरी, उदाचीवाडीसह सात गावांच्या क्षेत्रात विमानतळाची निर्मिती करण्याचा शासनाने घाट घातला आहे. एकट्या वनपुरीतील ४०० ते ५०० कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. शासनाकडून वेगवेगळ्या बातम्या पेरून येथील शेतकºयांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रकार चालवलेला आहे. मात्र, बेकायदेशीरपणे आमच्यावर दडपण आणणाºया शासनाला आम्ही भीक घालणार नाही. गेल्या १५ वर्षांत सातशे कोटी रुपये खर्च करून पुरंदर उपसाच्या माध्यमातून बागायती झालेली आमची शेती लाटण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर आमची ही कोणत्याही थराला जायची तयारी आहे.
- अभिमन्यू कुंभारकर,
माजी सरपंच, वनपुरी


Web Title:  Forestry airport combustion, symbolic Holi of the villagers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.