महिला पाेलीस कर्मचाऱ्याशी वाद पडला महागात ; तरुण गेला खडी फाेडायला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:59 PM2019-07-04T20:59:30+5:302019-07-04T21:00:23+5:30

वाहतूकीचे नियम मोडून एका महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तरुणाला सहाय्यक सत्र न्यायाधीश पी.आर.आष्ठुरकर यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि दीड हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

five year imprisonment to traffic violator | महिला पाेलीस कर्मचाऱ्याशी वाद पडला महागात ; तरुण गेला खडी फाेडायला

महिला पाेलीस कर्मचाऱ्याशी वाद पडला महागात ; तरुण गेला खडी फाेडायला

पुणे : वाहतूकीचे नियम मोडून एका महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तरुणाला सहाय्यक सत्र न्यायाधीश पी.आर.आष्ठुरकर यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि दीड हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सोहेल शौकत शेख (19, रा. हरीनारायण कॉम्प्लेक्स, चांदणी हॉटेल जवळ, वडगांव बुद्रुक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 

याप्रकरणी महिला पोलिस कर्मचारी शितल बालाजी जाधव यांनी फिर्याद दिली.  3 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. फिर्यादी ह्या दत्तवाडी वाहतुक विभागात कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्या वडगाव येथील महामार्गाच्या पुलाखाली सर्व्हीस रोडवर पोलिस कॉन्स्टेबल माने यांच्यासोबत वाहतुक नियंत्रण करत होत्या. त्यावेळी सोहेल त्याच्या बुलेटवर उलट्या दिशेने आला. इतक्यात जाधव यांनी त्याला अडवून वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. तसेच वाहतुकीचा नियम मोडल्या प्रकरणी पावती करण्यास सांगितले. यावर सोहेल शेख याने माझे वडील पोलिस खात्यात असल्याचे सांगत गाडीवर चिकटविलेला पोलिसांचा लोगो दाखवून जाधव यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सोहेल कुणाचे ऐकत नसल्याने जाधव यांनी वरिष्ठ सहकारी संपत भोसले यांना बोलवून घेतले. मात्र सोहेलने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी त्याने ई चलन मशिनही फेकून देऊन ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र दाखल केले. वाहतुकीचे नियम मोडतात दंड भरायचा नाही, नियम तोडायचा आणि पोलिसांवर मुजोरी करायची अशा प्रकरणात चांगला संदेश जाण्याची गरज असल्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी करताना सोहेलला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.  न्यायालयाने ती मंजूर केली.  

त्याला पश्चाताप झाल्याचे दिसले नाही
आरोपीची न्यायालयातील वर्तवणुक लक्षात घेता त्याने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप त्याला झाल्याचे दिसत नाही. जेव्हा त्याचा जबाब नोंदविला गेला तेव्हा तो उपहासाने हसत असल्याचे निदर्शनास आले. जेव्हा साक्षीदाराला याप्रकरणात समन्स बजावण्यात आले तेव्हा सोहेल त्याला कोर्टात येण्यापासून रोखत होता. सोहेलचे वडील हे कामगार असताना त्याने पोलीस या लोगोचा वापर करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Web Title: five year imprisonment to traffic violator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.