पहिल्या सभेची सुरुवात राज्यघटना वाचनाने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 03:09 AM2018-09-19T03:09:08+5:302018-09-19T03:09:25+5:30

महापालिकेत साकारले नवे सभागृह; भाषणाची हौस भागल्याने नगरसेवक संतुष्ट

The first meeting was started by reading the Constitution | पहिल्या सभेची सुरुवात राज्यघटना वाचनाने

पहिल्या सभेची सुरुवात राज्यघटना वाचनाने

Next

पुणे : महापालिकेच्या विस्तारीत इमारतीमधील नव्या सभागृहातील पहिल्या सर्वसाधारण सभेची सुरुवात राज्यघटनेच्या अभिवाचनाने करण्यात आली. या देखण्या व आलिशान सभागृहात भाषण करण्याची बहुसंख्य सदस्यांची हौस महापौर मुक्ता टिळक यांनी बोलण्याची संधी दिल्यामुळे भागली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशपूजन करून पेढे व गुलाबपुष्पांचेही वाटप या वेळी करण्यात आले.
लोकशाहीतील रचनेतील स्थानिक स्तरावरच्या या सर्वोच्च सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी या वेळी सत्ताधारी भाजपाला काही चिमटे काढत मिस्कील राजकीय शेरेबाजीही केली. शहर विकासाच्या विविध विषयांवर राजकीय मतभेद विसरून सभागृहात काम होईल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. सत्ताधारी भाजपाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
महापौर टिळक यांनी बरोबर २ वाजून ५५ मिनिटांनी सभेचे कामकाज सुरू केले. सुरुवातीला गणेशप्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी राज्यघटनेच्या प्रास्तविकाचे वाचन केले. सुनील कांबळे, राजाभाऊ बराटे, उमेश गायकवाड, मारुती तुपे, नीलिमा खाडे या स्थायी समितीच्या ५ सदस्यांनी दिलेला नव्या सभागृहात पहिली सभा घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर भाषणांना सुरुवात झाली. अनेक सदस्यांना बोलायचे आहे हे लक्षात घेऊन महापौरांनी प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल, असे स्पष्ट केले व त्याप्रमाणेच त्यांनी अनेक सदस्यांना बोलू दिले. त्यात नवोदित नगरसेवकांची संख्या जास्त होती.
दुपारी ३ वाजता सुरू झालेली सभा सायंकाळी साडेसातपर्यंत सुरू होती. बहुसंख्य सदस्यांनी सभागृहाची रचना, अत्याधुनिक सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले. महापालिकेच्या सभागृहाला मोठा इतिहास आहे. नव्या सभागृहातही तसाच इतिहास निर्माण होईल, असे ते म्हणाले. गोपाळ चिंतल, ज्योत्स्ना एकबोटे, अश्विनी कदम, अविनाश बागवे, सुमन पठारे, बाळा ओसवाल, दिलीप बराटे आदित्य माळवे, वैशाली बनकर, सुभाष जगताप, प्रवीण चोरबेले, पल्लवी जावळे, प्रिया गदादे, अविनाश साळवे, दत्ता धनकवडे, मुरली मोहोळ, गफूर पठाण, सुजाता शेट्टी, माधुरी सहस्रबुद्धे, नंदा लोणकर आदींची भाषणे झाली.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी नव्या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे, तर या पहिल्याच सभेने पहिलेच काम शहरात शिवसृष्टी तयार करण्याचे करावे, असे मत व्यक्त केले. या मागणीसाठी राष्ट्रवादीचे सर्व सदस्य भगवे फेटे घालून सभेला आले होते. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे वसंत मोरे, उपमहापौर डॉ. धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचीही भाषणे झाली. महापौर टिळक यांनी नव्या-जुन्या पुण्याची सांगड घालत या सभागृहातही अभिमानास्पद कामगिरी होईल, अशी ग्वाही दिली.

नव्या सभागृहाची रचना विधानसभा गृहाप्रमाणे गोलाकार असून, २५० आसनक्षमता आहे. जमिनीपासून ६० फूट उंचीच्या घुमटाचे छत आहे. ध्वनिरोधक व्यवस्था आहे. महापौर, आयुक्त व २ अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव यांच्यासाठी लाकडाचे आकर्षक व्यासपीठ व त्यासमोर गोलाकारात बैठक व्यवस्था असलेले हे सभागृह पुण्यातील अशा पद्धतीचे पहिलेच सभागृह आहे. विजेची बचत करणाऱ्या एलईडी दिव्यांनी ते झळाळत असून, सभागृहात सूर्यप्रकाशही यावा यासाठी घुमटाच्या शेवटी काचांच्या त्रिकोणी खिडक्याही केल्या आहेत.

Web Title: The first meeting was started by reading the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.