सासवड पेट्रोलपंपावर गोळीबार; सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:27 AM2019-01-31T02:27:24+5:302019-01-31T02:27:37+5:30

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई; पोलीस जखमी, पलायनाचा प्रयत्न फसला

Firing on Saswad petrol pump; Cinecastle chasing and arresting | सासवड पेट्रोलपंपावर गोळीबार; सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

सासवड पेट्रोलपंपावर गोळीबार; सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

googlenewsNext

लोणी काळभोर : पेट्रोलपंपावर गाडी आडवी लावली, या कारणावरून चिडून तीन तरुणांनी गोळीबार केला. तेथून पलायन करून ते दिवे घाटमार्गे हडपसरकडे येत असताना लोणी काळभोर पोलिसांनी त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. तिघांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना अटक केली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांना जिल्हा पोलीसप्रमुखांनी २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी निखिल शिवराम लोहार (वय २०, मूळ रा. हाळगरा, ता. निलंगा, जि. लातूर, सध्या रा. भेकराईमाता माध्यमिक विद्यालयाजवळ, जकातनाका, भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली) व हनुमंत लक्ष्मण वाघमारे (वय १८, मूळ रा. आंध्र प्रदेश, सध्या रा. ढोलवस्ती, उरुळी देवाची) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा तिसरा साथीदार किशोर दणाणी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास सासवड (ता. पुरंदर) येथे घडली. सासवड येथे फायरिंग करून तीन अज्ञात तरुणांनी असेंट मोटारीमधून पलायन केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी ही बाब तत्काळ जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांना कळवली. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार उरुळी देवाची दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार नीलेश राणे, विशाल रासकर, हेमंत कामथे, दिगंबर साळुंके यांनी या संशयित व्यक्ती व गाडीचा शोध घेण्यासाठी सासवड-पुणे राज्यमार्गावर हॉटेल विजयसमोर नाकाबंदी केली.

काही वेळाने माहिती मिळालेली असेंट गाडी (एमएच १२ एएक्स १७४४) आली. त्यामध्ये तीन तरुण होते. पोलीस पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु, त्यांना न जुमानता चालकाने मोटार पोलीस हवालदार नीलेश राणे यांच्या अंगावर घातली. राणे यांनी समयसूचकता दाखवून बाजूला उडी मारली. यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली. ती मोटार वडकी गावाकडे जात आहे, हे लक्षात येताच पोलीस पथकाने पाठलाग सुरू केला. त्यांच्यानजीक जाऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील एकाने पोलिसांवर पिस्तूल रोखले व पाठलाग केला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर गाडीतून उतरून ते शेतात पळून गेले. पोलिसांनी पुन्हा त्यांचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग होत आहे हे पाहून लोहार याने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने ती कोणास लागली नाही. त्याने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावेळी पिस्तूल लॉक झाले. हा मोका साधून पोलिसांनी त्यास झडप मारून पकडले. पोलिसांनी पिस्तूल व चारचाकी गाडी जप्त केली आहे. लोहार रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, सासवड पोलीस हद्दीत अनेक गुन्हे दाखल आहेत.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी मोटारीमध्ये (एमएच १२ एएक्स १७४४) बसून आलेल्या अज्ञात व्यक्तींची रिलायन्स पेट्रोलपंपासमोर सुजित जगताप याचे मित्र मिहीर दिलीप जगताप, प्रणीत जगताप, अनिकेत जगताप, नाना जगताप व अज्ञात व्यक्तींचा वाद चालू होता. त्यावेळी भांडणे सोडविण्यास गेलेल्या सुजित जगतापवर गोळीबार करण्यात आला. त्याच्यावर झाडलेल्या दोन गोळ्या त्याने चुकविल्या. दुसऱ्या दोघांनी त्याच्यावर दगडफेक केली. त्यामध्ये तो जखमी झाला. एकाने त्याच्या डोक्यावर दगडही घातला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे पळापळ झाली. त्यांच्या दहशतीने काही काळ पेट्रोलपंप बंद झाला होता. या घटनेची खबर सासवड पोलिसांना कळाल्यानंतर ताबडतोब अज्ञात ज्या सिल्व्हर रंगाच्या गाडीत पळून गेले त्या गाडीचा त्वरित पाठलाग करण्यात आला. वडकी गावाजवळ लोणी - काळभोर पोलिसांनी या घटनेची खबर मिळाल्यानंतर नाकाबंदी केल्याने आरोपी जेरबंद करण्यात लोणी - काळभोर पोलिसांना यश आले असल्याची माहिती सासवड पोलिसांनी रात्री उशिरा दिली.

गोळ्या चुकविल्याने अनर्थ टळला
सासवड येथे रिलायन्स पेट्रोलपंपासमोर अज्ञात व्यक्तींकडून भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सुजित जगताप (वय १९) याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत दोन गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.

Web Title: Firing on Saswad petrol pump; Cinecastle chasing and arresting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस