बावधन : बावधन येथील त्रिमूर्ती चौक ते एलएमडी चौकादरम्यानच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग आज अखेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक दिलीप वेडे-पाटील व शहर सुधारणा समिती उपाध्यक्ष किरण दगडे-पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मोकळा झाला.
या रस्त्याच्या मध्यभागी घर असलेले मारुती बाबूराव अंबिलवादे यांनी सहकार्याची भूमिका घेऊन स.नं. १८/७ मधील स्वत:च्या मालकीचे ०१ आर हे संपूर्ण क्षेत्र पालिकेच्या ताब्यात दिले. या वेळी जेसीबीच्या साह्याने हे घर जमीनदोस्त करून हटविण्यात आले. हा रस्ता मोकळा झाल्याने या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप सोयीचे झाले आहे. घर खाली करीत असताना अंबिलवादे यांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याची व त्यांची दुसºया ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी मारुती अंबिलवादे, त्यांच्या सुविद्य पत्नी व मुलाचा नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक व अल्पना वरपे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. येथील रहिवासी अभिनेता विक्रम गोखले यांनी हा प्रश्न सोडविल्याबद्दल मारुती अंबिलवादे, दिलीप वेडे-पाटील व किरण दगडे-पाटील यांचे अभिनंदन केले. सुमारे ३५ वर्षांपूर्वी बांधलेले घर सोडताना अंबिलवादे कुटुंबीयांना गहिवरून आले व अश्रू अनावर झाले. दरम्यान, रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मारुती अंबिलवादे यांचे अर्धेअधिक आयुष्य या घरामध्ये गेले. आज हे घर सोडताना त्यांना जेवढे दु:ख आहे, तेवढेच दु:ख मला होत आहे. मात्र, दुसरीकडे गेली २० वर्षे बावधन परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेला वाहतूककोंडीचा प्रश्न हे घर हटविल्यामुळे सुटणार आहे.
- दिलीप वेडे-पाटील, नगरसेवक

आज माझ्या एका डोळ्यात दु:ख व दुसºया डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप सोयीचे व्हावे, यासाठी अंबिलवादे यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे सर्व नागरिकांच्या वतीने आभार मानतो. भविष्यातही मारुती अंबिलवादे व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारे वैयक्तिक मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. - किरण दगडे-पाटील, नगरसेवक