मावळमध्ये पवारांच्या प्रतिष्ठेची, बारणेंच्या अस्तित्वाची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:16 AM2019-04-23T05:16:08+5:302019-04-23T05:16:56+5:30

शिवसेनेची भिस्त मोदी लाटेवर; युती नेत्यांची दिलजमाई, गटबाजी मोडून राष्ट्रवादीचा प्रचार

Fight against the reputation of Pawar's presence in Maval, Baran's existence | मावळमध्ये पवारांच्या प्रतिष्ठेची, बारणेंच्या अस्तित्वाची लढत

मावळमध्ये पवारांच्या प्रतिष्ठेची, बारणेंच्या अस्तित्वाची लढत

googlenewsNext

- हणमंत पाटील

मावळ लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीची उमेदवारी नातू असलेल्या पार्थ अजित पवार यांना देण्यासाठी आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे पवार कुटुंबीयांसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली असून, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी ती अस्तित्वाची आहे.

भौगोलिकदृष्ट्या मावळ मतदारसंघाची रचना घाटाखाली पनवेल, उरण व कर्जत, तसेच घाटावर पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदारसंघ अशी आहे. सन २००९ ला शिवसेनेचे गजानन बाबर आणि २०१४ ला शिवसेनेचेच श्रीरंग बारणे निवडून आले. गत निवडणुकीत बारणे यांनी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यावर सुमारे दीड लाख मतांनी विजय मिळविला. सध्या आमदार जगताप हे पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. गेल्या १० वर्षांपासून बारणे व जगताप यांच्यात हाडवैर आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुती झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडवून आणण्यात आली. मात्र, त्यानंतरही भाजपाचे जगतापसमर्थक नगरसेवक बारणे यांच्या प्रचारात सक्रीय दिसत नाहीत.

मावळ मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा पार्थ याला महाआघाडीकडून रिंगणात उतरविले आहे. थेट अजित पवार यांचा मुलगा रिंगणात असल्याने पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे वेगवेगळे गट एकत्र येऊन काम करताना दिसत आहेत. शिवाय पार्थ यांची आई सुनेत्रा पवार, भाऊ जय, चुलतभाऊ रोहित आणि दस्तुरखुद्द अजित पवार असे संपूर्ण पवार कुटुंबीय मतदारसंघात तळ ठोकून आहे.

राष्ट्रवादीची भिस्त घाटाखालील मित्रपक्ष ‘शेकाप’वर आहे. तसेच, महायुतीत शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकत अधिक असल्याने श्रीरंग बारणे यांनी भाजपाच्या आमदारांवर प्रचाराची धुरा सोपविली आहे. महायुतीचा प्रचार मोदींच्या नावावर सुरू असून, राष्ट्रवादीला मात्र कार्यकर्त्यांच्या बळावर मतदारांचा कौल घेण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे. सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेल व चिंचवड विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणाऱ्याला विजयश्री खेचता येईल.

गेल्या पाच वर्षांत केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजनांची अंमलजावणी केली. या विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मावळ लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पुढच्या काळात रेड झोन, रेल्वे विस्ताराचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
- श्रीरंग बारणे, शिवसेना

मावळ लोकसभा मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या भागात नव्याने रोजगार निर्माण करण्यासाठी परदेशी कंपन्यांची गुंतवणूक येथे वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे, तसेच आतापर्यंत रखडलेले रेड झोन व रेल्वे विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे.
- पार्थ पवार, राष्ट्रवादी

कळीचे मुद्दे
गेल्या पाच वर्षांत खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत प्रश्न मांडले, पण रेड झोन, रेल्वे विस्तारीकरण यांसारखे प्रश्न सुटलेले नाहीत.
पार्थ घराणेशाहीतून आलेले नवखे उमेदवार असून, त्यांना आयात केल्याचा युतीचा दावा

Web Title: Fight against the reputation of Pawar's presence in Maval, Baran's existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.