सचिन सिंग 
वारजे : गणपती माथ्याकडून वारजे उड्डाणपुलाकडे येण्यासाठी उताराचा रस्ता असल्याने, या अरुंद रस्त्यावर एखाद्या मोठ्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास, अप्पर-इंदिरानगरसारखा भयंकर अपघात होऊ शकतो.
वारजे-माळवाडीमध्ये देखील शहराच्या इतर उपनगरांप्रमाणे अनेक अपघातप्रवण क्षेत्र तयार होत आहेत. रस्त्यावरील फेरीवाले पथारीवाले यांचे अतिक्रमण, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, रस्तारुंदीकरणात महापालिकेकडून होत असलेली अक्षम्य दिरंगाई, नागरिकांकडून रस्त्यावर होणारे बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर झळकणारे बेकायदा फलक व होर्डिंग आदी कारणांमुळे वारजे उपनगरात व आसपासच्या परिसरात अशी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
रुंदीकरण रखडलेले : १९९७ मध्ये महापालिकेत समावेश होऊन २० वर्षे झाली, तरी आजही गणपती माथा ते आंबेडकर चौक या दरम्यान मुख्य एनडीए रस्त्याचे रुंदीकरण रखडलेलेच आहे. वरच्या भागात ग्रामीण भागातील नागरीकरण प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यातच आता शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे ही गावे महापालिकेत आल्याने त्याचा वेग अजून वाढणार आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. त्यामुळे गणपती माथा ते वारजे उड्डाणपूल या भागात किमान या टप्प्यात, तरी लवकरात लवकर रुंदीकरण गरजेचे आहे. वारजे-माळवाडी मुख्य बस थांब्यासमोर तर एका बाजूला दोन पीएमपी बस एकाच वेळी जातील, एवढादेखील रस्ता उरत नाही. त्यामुळे येथील रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत गरजेचे आहे.
फेरीवाल्यांचे अतिक्रमण : संपूर्ण वारजे, महामार्गाचा भाग, शिवणे, कर्वेनगर मुख्य रस्त्यावर, आतील उपरस्त्यांवरदेखील हमखास ही समस्या पाहायला मिळते. काही ठिकाणी इमारतीमधील दुकानदारांनी आपल्या दुकानसमोरची मोकळी जागा पथारी व्यावसायिकांना भाड्याने देऊन उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण केले आहे. या पथारीवाल्यांनी आपला माल ग्राहकांना दिसावा, यासाठी अधिकाधिक रस्ता अडवला आहे.
पथारीवाल्यांची वाढती संख्या : पथारीवाल्यांची वाढती संख्या हे देखील चिंतेचे कारण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना जकात नाका, माळवाडी बसथांबा, उत्तमनगर येथे दर आठवड्याला एक तरी बेकायदा टपरी उभी राहत आहे. पालिका प्रशासन सर्व ठिकाणी डोळेझाक करून आहे. यात काही वेळेला राजकीय आशीर्वादानेच या टपºया दिमाखात व्यवसाय करत आहेत.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : वारजे उड्डाणपुलाखालीच वाहतूक पोलीस विभागाचे कार्यालय आहे. त्यांच्या अखत्यारित उत्तमनगर ते वनदेवी मंदिर, तसेच महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते चांदणी चौक असा वाहतुकीच्या कामाचा मोठा डोलारा आहे. तरीही त्यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर बेकायदा वाहतूक चालत आहे.
पुलापासून कात्रजकडे जाणाºया रस्त्यावर तर अगदी बेकायदा प्रवासी वाहनांनी रस्ता व्यापलेला आहे. तीच गत चांदणी चौकाकडे जाणाºया रस्त्यावर आहे. या मुख्य चौकापासून सर्व बाजूस जाण्यासाठी सहा आसनी व इतर प्रवासी वाहने दिवसभर उभी राहिली तरी कारवाई करण्याठी दुर्लक्ष करण्यात येते.
वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून एका नागरिकाने तर दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी पोलीस अधिकाºयाच्या डोळ्यात अंजन घालणारे फलक लावले होते. वाहतूक विभागाने ते काढण्याची चपळाई मात्र तत्परतेने दाखविली.
नो पार्किंग क्षेत्रातही वाहने : याशिवाय वारजे वाहतूक विभागाकडे बेकायदा पार्किंग करणाºया दुचाकी वाहनांवर कारवाईसाठी खात्याचा कुठलाही टेम्पो नाही. त्यामुळे चारचाकींना जॅमर कारवाई करणारे मर्यादित पोलीस दुचाकीच्या बेकायदा पार्किंगबाबत उदासीन वाटतात. त्यामुळे या सर्व भागात तुम्ही नो पार्किंग क्षेत्रातही वाहने लावून खुशाल फिरू शकता, असे सध्याचे चित्र आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.