मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 09:09 PM2018-12-18T21:09:30+5:302018-12-18T21:11:27+5:30

गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

Everyone should try to decrease ego: Mohan Bhagwat | मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

Next

पुणे : जे काम करता ते समरस होऊन करा. पण त्यात अडकू नका. आपण जे काम करतो त्यामागे पुष्कळ लोक असतात. आपण करतो तेच चांगले असेल, असे मानू नये. मी केले, मी केले असा अहंकार बाळगण्यात अर्थ नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. 
              गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकूंद दातार, कार्यवाह, विजया मेहेंदळे, कार्यकारिणी सदस्य वसुधा पाळंदे, मुकूंद कोंढवेकर व मोरेश्वर जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. पाळंदे यांना यावेळी भागवत यांच्या हस्ते पहिला सरस्वतीबाई आपटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

               भागवत म्हणाले, कोणतेही राष्ट्र नीती, सरकार, माणूस किंवा पार्टीवर उभे राहत नाही. समाज जोपर्यंत गीतेचे आचरण करून तसेच बनत नाही, तोपर्यंत अपेक्षित राष्ट्र उभे राहणार नाही. आम्ही संघात सांगतो की, जे करता ते समरस होऊन करा. पण त्यात न अडकू नका. आणीबाणीमध्ये एका शाखेचा प्रचारक असताना खुप काम केले. पण त्यावेळी असे वाटले नव्हते की संघाचे असे दिवस येतील. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. त्यासाठी कर्तव्य करत राहावे. फळ काय मिळेल याचा विचार करू नये. 
             उग्र माणसे लवकर प्रसिध्द होतात. प्रत्येक विषयावर उगीचच, अधिकार नसताना बोलायचे नसते. ते जमत नसेल तर मौन बाळगावे. पण त्यासाठी भाव शुध्द असावा लागतो. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द नंतर टाकले. पण एका न्यायमुर्ती म्हटले आहे की, हे संविधानात गृहितच धरले आहे. हे शब्द टाकल्याने उघड झाले. भारतवर्षात सर्व विश्व कुटूंब मानण्याची परंपरा आहे. हेच संविधानाचेही रुप आहे. त्याचा उपयोग देश चालविण्यासाठी केला पाहिजे. गीतेमध्ये सांगितलेला धर्म विश्वधर्म आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून चालत आले आहे. त्यानुसार सृष्टी चालणार आहे. कुणी काही केले तरी असेच होणार आहे, असे भागवत यांनी नमुद केले.
 

... तर शंभरपट रुपात विश्वगुरू 
गीतेमध्ये सर्व निरुपण धर्माचे आहे. गीतेनंतर आजतागायत ज्या विचारधारा आल्या, ते सगळे गीतेमध्ये आहे. त्यामुळे गीता अभ्यासली पाहिजे. आचरणात आणली पाहिजे. सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याची तपस्या केली तरी देश आजच्या शंभरपट रुपात विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असे मोहन भागवत यांनी सांगितले

Web Title: Everyone should try to decrease ego: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.