‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:00 AM2018-09-23T01:00:20+5:302018-09-23T01:00:30+5:30

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत.

 Efforts to be done for the existence of women | ‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे

‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे

Next

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत. तिला सक्षम करण्यासाठी तसेच तिचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पालकांनी सर्व ते प्रयत्न केल्यास महिलांनादेखील समाजात मानाचे स्थान मिळू शकेल, असा विश्वास दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

गुलामगिरीचे जीवन जगत असलेल्या महिलांसाठी घराचा उंबरठा ओलांडून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यामुळे पुणे शिक्षणाचे माहेर ठरले असून शिक्षणाच्याबाबत अनेक अनोखे उपक्रम या ठिकाणी झाले आहेत. शिक्षणाची दारे खुली करून तिला तिचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी सावित्रीबार्इंनी दिली. मात्र आजही महिलांना समाजात सन्मानाचे स्थान नाही. समाजाचे सोडा घरातदेखील तिला दुय्यम दर्जा दिला जातो. घरात धार्मिक कार्यक्रम असतील, तर त्याची सर्व तयारी महिलांना करावी लागते.
स्वयंपाकापासून पाहुण्यांचे आदरातिथ्य ठेवण्याची जबाबदारी ती पार पाडते. मात्र पूजेचे ताट हे कुटुंबातील पुरुषांच्याच हाती असते. पण ‘लोकमत’च्या तीचा गणपतीमध्ये गेली सहा वर्षे पूजेचे ताट हे तिच्या हाती आहे, हा खूप चांगला उपक्रम आहे. त्यातून समाजाचे परिवर्तन घडणार आहे. कुटुंबातील महिलेमुळे मी समाजात काही तरी करू शकलो, अशी भावना या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या मनात निर्माण होणार आहे. शोषित आणि पीडित महिलांच्या प्रश्नांवर व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम लोकमत करीत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. शिवाजीमहाराजांच्या मागे जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या मागे माता रमाबाई, तर महात्मा फुले यांना सावित्रीबाई फुले यांचा पाठिंबा होता.
समाजात एवढे परिवर्तन होत असतानाही महिला सुरक्षित नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे समोर येते. या घटना ऐकून मनाचा थरकाप होत असून अत्याचार करणाऱ्यांविषयी प्रचंड चीड निर्माण होत आहे. समाजाला दिशा देणारे शिक्षणदेखील त्याला अपवाद राहिले नाही. त्यातून पुरुषांची मानसिकता आणि स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे अधोरेखांकित होते. हे सर्व बदलण्यासाठी आणि महिलांना अधिक सुरक्षित करण्यासाठी या मानसिकतेत आणि पुरुषांच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे.
स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. या बदलाची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हावी. मुलांवर लहानपणापासूनच तसे संस्कार झाले तर महिला नक्कीच सुरक्षित होईल. केवळ मुलगाच नव्हे, तर मुलगीदेखील वंशाचा दिवा आहे, असा विचार पसरायला हवा. ग्रामीण भागात असा बदल रुजवणे गरजेचे आहे. परक्याचे धन म्हणून तिच्यावर होणारे अन्याय थांबायला हवेत. हुंड्यासाठी तिला जाळले जाते, विहिरीत ढकलले जाते, तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, अशी स्थिती आहे. या सर्व पीडित महिला ‘लोकमत’च्या तीच्या गणपतीपासून प्रेरणा घेतील आणि आम्ही अबला नसून सबला आहोत, असे दाखवून देऊ शकतील. ‘लोकमत’च्या माध्यमातून मला या चळवळीमध्ये सामील होता आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल ऐकले आहे, अनुभवले आहे. तीचा गणपती या उपक्रमामध्ये सर्व महिला हातात हात घालून काम करीत आहेत, सर्व जबाबदाºया समर्थपणे पेलत आहेत. एकमेकींना पाठिंबा देऊन एकमेकींची शक्ती बनत आहेत. महिलांनी एखादे विधायक कार्य करायचे ठरवल्यास काय होऊ शकते, याचे सकारात्मक आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ‘लोकमत’तर्फे आयोजित तीचा गणपती हा उपक्रम आहे.

Web Title:  Efforts to be done for the existence of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.