ठळक मुद्दे'इथे यावं, रमावं, इथंलच होऊन जावं, कारण हेच कुठंतरी आपलं मूळ आहे.'पर्यटकांच्या स्वागतासाठी सुसज्ज असं महाद्वार आणि त्यावरील नगारखाना सज्ज आहे.सातखाणी दिवाणखाना लाकडी खांब नक्षीच्या कमानी, काचेच्या हंड्या, नक्षीदार छत अशा पारंपारिक सजावटीने सजवलेल्या आहेत.

पुणे : ऐतिहासिक वास्तुचं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं.  शिवाजी महाराज, पेशवे  कालीन इतिहासाची साक्ष म्हणजे पुणे. त्यामुळे पुण्यात मराठी वास्तूशैलीची ओळख करून देणारे वाडेही आपल्याला पाहायला मिळताता. अर्थात आता हे वाडे नामशेष झाले आहेत. पूर्वी ज्याप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धत होती, एकत्र कुटंबाला प्रशस्त घरांची सवय होती. माणसांची मनं जितकी मोठी होती, तितकीच त्यांची घरंही प्रशस्त होती. या घरांनाच वाडा म्हणत, जिथे आपल्या पूर्वजांचा आर्शिवाद होता. मात्र आत एकत्र कुटुंब पद्धत लोप पावली आणि विभक्त पद्धत उदयाला आली. त्यामुळे हम दो हमारे दोसाठी कशाला हवा वाडा आणि आता वाडा बांधायचा म्हणजे एवढा खर्च कोणाला सोसणार आहे? तसंच जुनी जी काही वाडे पुण्यात होती ती विकून त्याजागी मोठाले टॉवर उभे राहिले आहेत. पण पुणे येथील एरंडवणेच्या मेहेंदळे गॅरेज रोडवर असणाऱ्या नितिन ढेपे यांनी बांधलेला ढेपेवाडा आधुनिक लयेतला प्राचीन वाडा आहे असं म्हणायला हरकत नाही. पर्यटनासाठी या हटके स्थळाचा तुम्ही विचार करू शकता. 

मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या इमारतींना मराठा वास्तूशैलीचं रुप देण्याचं काम शिवाजी महाराजांच्या काळात झालं. सासवडचा पुरंदरे वाडा, साताऱ्याचा कदम वाडा, मेणवलीचा फडणवीस वाडा, बारामतीचा काळे वाडा आणि बाबुजी नाईक वाडा, बारामतीचा काळे वाडा, पुण्याचा रास्तेवाडा, विश्रामबाग वाडा, शनिवारवाडा तसेच त्याकाळचे सरदार, पाटील, देशमुखांनी बांधलेले काही वाडे मराठा वास्तुशैलीनुसारच बांधलेले आहेत. या मराठा वास्तुशैलीवर मुघल, राजस्थानी, गुजराथी तसेच दाक्षिणात्य वास्तुशैलींचा प्रभाव होता. संपूर्ण भारतात तुम्हाला वाडे दिसतील. पण प्रत्येक ठिकाणी या वाड्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. उत्तरकडे वाड्यांना हवेली म्हणतात, दक्षिणेकडे विड किंवा तारवाड असं म्हणतात. हे सगळं तुम्हाला इथं सांगण्यामागचं कारण असं की आज आपण पुण्यातल्या अशा वाड्याला भेट देणार आहोत जो वाडा पुरातन काळातला नसला तरीही त्या वाड्यात गेल्यावर ऐतिहासिक वास्तूत शिरल्याचा नक्कीच भास होतो. 

बांधकाम व्यावसायिक असलेले नितिन ढेपे यांनी हा वाडा बांधलाय. आजवर त्यांनी बांधकाम व्यवसायात अनेक वाड्यांच्या जागेवर इमारती बांधल्या. त्यामुळे प्रत्येकवेळी असा वाडा तोडताना त्यांच्या फार जिव्हारी लागे. आपण एखादा प्राचीन अवशेषच मिटवून टाकतोय असं त्यांना वाटायचं. पण व्यावसायिक आयुष्यात फार भावनिक होऊन चालत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी असे प्रकल्प त्यांना आले की ते मनावर दगड ठेवून आपलं काम पूर्ण करत. पण यामधूनच त्यांना काहीतरी नवं करण्याची इच्छा निर्माण झाली.

आजच्या लोकांनाही हीच वाडा संस्कृती दाखवायची असेल तर काय करता येईल? याचा विचार करत असतानाच त्यांनी स्वत:च एक वाडा बांधायचं ठरवलं, शिवाय या वाडा लोकांना पर्यटनासाठीही खुला करायचं ठरवलं. त्यातून ही संकल्पना रुजू लागली आणि बघता बघता प्रशस्त वाडा तयार झाला. ढेपे वाडा ही केवळ वास्तू नव्हे तर पर्यटनासाठी एक आकर्षणकेंद्र आहे, म्हणूनच तर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने त्याची विशेष दखल घेतली आहे. 

याबाबत ढेपेवाडाचे नितिन ढेपे म्हणतात की,‘इथे यावं, रमावं, इथंलच होऊन जावं, कारण हेच कुठंतरी आपलं मूळ आहे. असंच आपल्याला अगदी मनापासून वाटावं यासाठी आपण मराठमोळ्या पारंपारिक पोषाखात सहकुटूंब आमच्या वाड्यात वास्तव्य करावे, ढेपवाडा व परिवार खुल्या मनानं, खान्देशी मायेनं, वर्हाडी लयीत, कोकणी शैलीत आणि पुणेरी दिमाखात आपल्या सहर्ष स्वागतासाठी सज्ज आहे.’या वाड्याची आकर्षणे म्हणजे महाद्वार, सातखणी दिवाणखाना, पाचखणी चौक. पर्यटकांच्या स्वागतासाठी सुसज्ज असं महाद्वार आणि त्यावरील नगारखाना सज्ज आहे. तसंच झिम्मा, फुगडी, मंगळागौरीचे खेळ, लपाछपी, खांबखांब खांबोळी,  लंगडी या खेळांसाठी पाचखाणी चौक आहे. अगदी पारंपारिक पद्धतीचं चूल असलेलं स्वयंपाकघर आणि माजघर आहे.

जुन्या पद्धतीचे लाकडी बिन्नीचे दरवाजे आणि कमानीच्या खिडक्या तसेच लाकडी पलंग, दिवाण तसंच लाकडी खुर्च्यांनी व काचेच्या हंड्यांनी सुसज्ज आणि कोळवण खोऱ्यांचे विहंगम दृष्य दिसणाऱ्या खोल्या आहे.  सातखाणी दिवाणखाना लाकडी खांब नक्षीच्या कमानी, काचेच्या हंड्या, नक्षीदार छत अशा पारंपारिक सजावटीने सजवलेल्या आहेत. न्हाणीघरही अगदी पारंपारिक पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे. बंब, घंगाळ, पाण्याचा पाट, चौरंग आदी गोष्टी न्हाणीघरात ठेवण्यात आल्या आहेत.

त्याकळच्या स्त्रियांना एकत्र आणण्याचं काम ज्या पारंपारिक यंत्रानं केलं ते म्हणजे जातंही तुम्हाला इथे पाहायला मिळेल, एवढेच नव्हे तर चुल, मांडणी, मोठी ताकाची रवी या गोष्टीही इथं ठेवण्यात आल्या आहेत. तसं पहाटे मंद आवाजातील भूपाळ्या आणि दिवसा मराठी संगीत. ढेपेवाडाच्या आजूबाजूलाही अनेक पर्यटन स्थळं आहेत. हाडशीचे सत्यसाईबाबा मंदिर, चिन्मयी विभुती, वाळेण व पवना धरण, ताम्हिणी घाट आणि तुंग व तिकोना लोहगड किल्ला ढेपावाड्याच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यामुळे प्राचीन काळातल्या वास्तूत तुम्हाला तुमची सुट्टी घालवायची असेल तर ढेपेवाड्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. 

आणखी वाचा - पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी


Web Title: Dwape Wada in Pune is the ancient architecture of modern times. See history history
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.