बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:17 AM2019-02-06T02:17:33+5:302019-02-06T02:17:43+5:30

पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.

Due to leopard fear of falling out of the house at night, citizens of Keshavnagar, Cats area | बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना

बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना

Next

पुणे : पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. ‘‘रात्री उशिरा लांबून पाणी आणावे लागते. त्यासाठी शेतीतून जावे लागते. आता अचानक बिबट्याने हल्ला केला तर काय करायचे? पाणी तर आणावेच लागेल.’’ अशा भावना मांजरी परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. यावरून बिबट्याची चांगलीच दहशत बसल्याचे स्पष्ट होत आहे.
केशवनगरमध्ये रविवारी सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात त्याची जरब बसली आहे. कधी कुठून कसा बिबट्या येईल आणि आपल्यावर हल्ला करेल, याची शाश्वती राहिलेली नाही. कारण आता पुणे शहरात अनेक ठिकाणाहून बिबट्या एन्ट्री मारत आहेत. काही दिवसांपूर्वी खडकवासला, शिवणे परिसरात तो दिसला होता, तर एक-दोन वर्षांपूर्वी कोंढवा परिसरात आढळला होता. त्यामुळे भविष्यातही बिबट्या पुण्यात येऊ शकत असल्याने त्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगत आहेत.
मानव आणि बिबट्यामधील संघर्ष वाढत आहे. त्यामुळे बिबट्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री, प्रशिक्षण दिलेले पथक, कुरण क्षेत्राचा विकास आदींवर काम करणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी याबाबतचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार आहे. परंतु, त्यावर काहीच काम केलेले दिसून येत नाही. ते केले तर कदाचित बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
बिबट्या ज्या परिसरात येण्याची शक्यता आहे, तर त्या परिसरात त्याबाबत जनजागृती केली पाहिजे. तसेच रात्रीच्या वेळी काम करणाºयांमध्ये योग्य सुरक्षासाधनांची माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून बिबट्याने हल्ला केला तर कसा बचाव करता येईल, हे नागरिकांना समजेल. त्यासाठी वन विभागाने काम करणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये बिबट्यांबाबत चांगले काम झाले आहे. त्याची माहिती घेऊन पुण्यात तसे करणे गरजेचे असल्याचे वन्यजीव अभ्यासक डॉ. विद्या आत्रेय यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आजूबाजूला स्वच्छता ठेवावी

आपल्या आजूबाजूला कचरा साठला असेल तर तो साठू देऊ नये. कारण त्यामुळे कुत्री, डुकरे, मांजरे, उंदीर तिथे अधिक प्रमाणात आढळतात आणि त्यांना खाण्यासाठी बिबट्या येऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे, अशी माहिती जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.

डेअरी फार्ममध्ये हरिण, ससे, मोर...

मुंढवा : काही नागरिकांनी तरी बिबट्याच्या भीतीने सकाळी व सायंकाळी फिरायला जाणेही बंद केले आहे. कारण केशवनगच्या पुढे डेअरी फार्ममध्ये अजून एखादा बिबट्या असेल तर... या काळजीने नागरिक धास्तावलेले दिसत आहेत. केशवनगर भागात सद्यपरिस्थितीत १० टक्केच शेतीचा भाग राहिलेला आहे. परंतु केशवनगरच्या हद्दीच्या पुढे व मांजरी बुद्रुकच्या हद्दीत साधारण २०० एकर जागेत डेअरी फार्मचे जंगल परिसर आहे. पूर्वी याठिकाणी मिलिटरीचा डेअरी फार्म होता. तेथे मोठ्या प्रमाणात गाई होत्या. परंतु काही वर्षांपूर्वी येथील डेअरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात जंगलच आहे. तिथे सध्या मोठ्या प्रमाणात मोर, साप, हरणे, ससे व जंगली कुत्र्यांचे वास्तव्य आहे. या भागात अजूनही एकटा मनुष्य जात नाही. सोमवारी जो बिबट्या केशवनगरमध्ये आला, तो मादी असल्याचे समजते. या जंगलात भक्ष्याच्या शोधात त्याचे वास्तव्य असल्याचे नाकारता येत नाही. या परिसरात तिचे पिल्लेही असू शकतात, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.

बिबट्या येणाºया क्षेत्रात सतर्कता

रात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावी, त्यामुळे बिबट्या जवळ येत नाही
पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त गोठे तयार करावेत
शेतात किंवा उसामध्ये रात्रीच्या वेळी जाऊ नये
घराबाहेर झोपणे टाळावे
रात्री घराबाहेर पडताना हातात काठी असावी
स्ट्रॉर्च घेऊन फिरावे

Web Title: Due to leopard fear of falling out of the house at night, citizens of Keshavnagar, Cats area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.