लालफितीच्या कारभारामुळे नागरिक अडकतायेत वाहतूक काेंडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:52 PM2018-09-20T17:52:51+5:302018-09-20T17:55:31+5:30

लालफितीच्या काराभारामुळे विश्रांतवाडी- धाराेरी भागातील नागरिकांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागत अाहे.

due to delay of government people are facing traffic problem | लालफितीच्या कारभारामुळे नागरिक अडकतायेत वाहतूक काेंडीत

लालफितीच्या कारभारामुळे नागरिक अडकतायेत वाहतूक काेंडीत

googlenewsNext

पुणे : लालफितीच्या काराभारामुळे नागरिकांना मनस्ताप साेसावा लागला असल्याची अनेक उदाहरणे अाजपर्यंत अापण पाहिली अाहेत. याच लालफितीच्या काराभारामुळे विश्रांतवाडी- धाराेरी भागातील नागरिकांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागत अाहे. येरवडा येथील काॅमरझाेन अायटी पार्कच्या शेजारील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या भागात दरराेज सकाळी माेठी वाहतूक काेंडी हाेत अाहे. 

    येरवडा मनाेरुग्णालयाच्या बाजूस काॅमरझाेन हा अायटीपार्क अाहे. याच रस्त्याला पुढे येरवडा मध्यवर्ती कारगृह अाहे. या भागात कारागृह असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा अाहे. काॅमरझाेन अायटी पार्कमध्ये सकाळी कर्मचाऱ्यांच्या वाहनांची गर्दी हाेत असते. त्यामुळे या रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. संध्याकाळच्या वेळेसही सारखीच परिस्थीती असते. या अायटी पार्कमध्ये येणारे बहुतांश कर्मचारी हे स्वतःच्या वाहनांमधून त्यातही चारचाकींमधून येत असल्याने इतर नागरिकांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागते. या अायटी पार्कचे कर्मचारी अनेकदा इतर वाहने थांबवून अायटी पार्कमध्ये येणाऱ्या वाहनांना जाऊ देत असतात. त्यामुळे त्यांची मुजाेरी इतर वाहनचालकांना सहन करावी लागते. त्यातच येरवडा कारगृह जवळच असल्याने वाहतूक काेंडीमुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला अाहे. 

  संगमवाडीकडून टिंगरेनगर पर्यंत रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात अाला अाहे. यात अग्रेसन हायस्कूल ते काॅमरझाेन पर्यंत जाणारा रस्ता लालफितीत अडकला अाहे. हा मधला भाग हा केंद्र सरकारच्या सर्वे अाॅफ इंडिया या संस्थेच्या भागातून जाताे. या जागेचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय अाहे. या संदर्भात महापालिकेने राज्य सरकारला तसेच राज्य सरकारने केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला अाहे. परंतु लालफितीच्या काराभरामुळे केंद्र सरकारकडून या जागेच्या बाबतीत अद्याप हिरवा कंदिल दाखविण्यात अाला नसल्याने हा रस्ता अर्धवटच राहिला अाहे. त्यामुळे दाेन मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना दाेन ते तीन किलाेमीटरचा वळसा घालावा लागत अाहे. त्यातच हा रस्ता अपूर्ण असल्याने सर्व वाहतूक ही जेलराेडवरुनच जात असल्याने या रस्त्यावर माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना याचा माेठा मनस्ताप सहन करावा लागताे. 

    नाव न सांगण्याच्या अटीवर येथील एक प्रवासी महिला म्हणाल्या, राेज सकाळी जेलराेडला माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. काॅमरझाेन अायटी पार्कमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने इतर वाहनांनाही या वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागते. अनेकदा या अायटी पार्कचे सुरक्षारक्षक इतर वाहतूक थांबवून केवळ अायटी पार्कमध्ये जाणाऱ्या वाहनांना जाऊ देत असतात. त्यामुळे अामच्या सारख्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अापल्या कार्यालयात जाण्यास उशीर हाेत असताे. काॅमरझाेनच्या शेजारून जाणारा रस्ता लवकर तयार झाला तर या रस्त्यावरील वाहतूक कमी हाेण्यास मदत हाेईल. 

    उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे म्हणाले, काॅमरझाेनच्या शेजारुन जाणाऱ्या रस्त्यासाठीची जागा ताब्यात मिळवण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहीले हाेते. जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय अायुक्त, विभागीय अायुक्तांनी राज्य सरकार अाणि राज्य सरकारने सर्वे अाॅफ इंडियाच्या डेहरादून येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क केला अाहे. सर्वे अाॅफ इंडियाकडून या जागेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत अाहे. परंतु केंद्र सराकरकडून अंतिम मंजुरी न मिळाल्याने हा रस्ता अर्धवट राहिला अाहे.  केंंद्राकडून मंजुरी मिळताच हा रस्ता तातडीने पूर्ण करण्यात येईल.

Web Title: due to delay of government people are facing traffic problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.