वाहनचालक झाले ‘आऊट आॅफ कंट्रोल’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 01:15 AM2018-09-22T01:15:11+5:302018-09-22T01:15:20+5:30

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवित स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणारे वाहनचालक ‘आउट आॅफ कंट्रोल’ झाले आहेत.

Driving Out 'Out of Control' | वाहनचालक झाले ‘आऊट आॅफ कंट्रोल’

वाहनचालक झाले ‘आऊट आॅफ कंट्रोल’

Next

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवित स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणारे वाहनचालक ‘आउट आॅफ कंट्रोल’ झाले आहेत. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी त्यावर अंकुश ठेवता आलेला नाही. या भरधाव वेगापायी अनेकांना जीव गमवावा लागत असूनही बेशिस्त वाहनचालक ताळ्यावर येताना दिसत नाहीत.
शहरात दोन दिवसांत झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी खराडी येथे भरधाव वेगात असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने आजी व नातवाचा बळी गेला. तर गुरुवारी रात्री सातारा रस्त्यावर दुचाकीवरून चाललेल्या दोघा मित्रांना अपघातात प्राण गमवावे लागले. या घटना शहर व परिसरात सातत्याने घडतात. एखाद्या ठिकाणी लवकर पोहचण्याची घाई, वाहन वेगात चालविण्याचे थ्रील, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहन वेडेवाकडे चालविणे यांमुळे लहान-मोठे अपघात होतात. पोलिसांकडून असे प्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कारवाई केली जाते. पण, याकडे वाहनचालकांकडून सर्रासपणे दुर्लक्ष करतात.
काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक वाहनचालकांना संयम नसल्याचे दिसून आले. सिग्नलवर उभे असलेले वाहनचालक पुढे जाण्यासाठी सातत्याने हॉर्न वाजवून समोरच्या वाहनचालकांनाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यास भाग पाडतात. अनेकदा सिग्नल तोडून वेगात पुढे जाणारे वाहनचालक शहरातील रस्त्यांवर नेहमी दिसतात. वर्दळीच्या रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत दुचाकी चालविणे तरुणही आहेत. तर रात्रीच्या वेळी रिकाम्या रस्त्यावर स्पोर्ट्स बाईकवरून वेगाने जाणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाºया वाहनचालकांचाही अनेकदा अपघात झाला आहे. पण त्यानंतरही अशा वाहनचालकांना धडा मिळालेला नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच शहरांतील रस्त्यांवर रॅश ड्रायव्हिंग करणाºया बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पण त्यामुळे या वाहनचालकांसह इतर निष्पाप नागरिकांचाही बळी जात आहे. मद्यपान करून वाहन चालविणाºयांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. यावर्षी आॅगस्टअखेरपर्यंत ९ हजार १३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून शहरात अधूनमधून नाकाबंदी करून संबंधितांना पकडले जाते. पण त्यानंतरही मद्यपी वाहनचालक बिनदिक्कतपणे वाहन चालवत असतात.
>रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी
पोलिसांनी केलेली कारवाई
महिना वाहनचालक दंड वसुली
जानेवारी ७१७ ७,१७,०००
फेब्रुवारी २५२ २,५२,०००
मार्च २९६ २,९६,०००
एप्रिल ४११ ४,११,०००
मे ५४५ ५,४५,०००
जून ४१९ ४,१९,०००
जुलै ४२५ ४,२५,०००
आॅगस्ट ६७२ ६,७२,०००
एकूण ३,७३७ ३७,३७,०००
>तीन हजार वाहनचालकांवर कारवाई
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पोलिसांनी जानेवारी महिन्यापासून आॅगस्ट अखेरपर्यंत ३ हजार ७३७ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून ३७ लाख ३७ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तसेच काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आता बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
>वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणांचा तपास देखील जलद गतीने होत आहे. त्यामुळे आता नियमभंग केल्यानंतर दंड भरून वाहन चालकांची सुटका होईलच असे नाही. वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० चालकांचे पासपोर्ट थांबविण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे.
-तेजस्वी सातपुते, उपायुक्त, वाहतूक शाखा

Web Title: Driving Out 'Out of Control'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.