ठळक मुद्दे पुण्यात कार्यरत असलेली या थिएटरमध्ये नाट्यकलेविषयी अगदी उत्तम ज्ञान दिलं जातं. मुलाखतीत तुमचा कल नेमका कोणत्या दिशेला आहे हे पाहिलं जातंतुमच्याकडे जर काही युनिक कल्पना असेल आणि तुम्ही एका योग्य ग्रुपच्या शोधात असाल तर हे वाचा.

पुणे : अभिनेत्यांना घडवण्यामध्ये नाट्यसंस्थांचा फार मोठा वाटा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नाट्यसंस्था स्थापन झाल्या आहेत. या नाट्यसंस्थांमधून अनेक नाट्यशिबिरंही होतात. पुण्यात अशा अनेक नाट्यसंस्था आहेत. पुण्यातील अशाच काही प्रसिद्ध नाट्यसंस्थाविषयी आज पाहुया.

आसक्त कलामंच

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिनही भाषांच्या नाटकांसाठी प्रसिद्ध असलेला आसक्त कलामंच पुण्यात फार नाट्यप्रेमींच्या यादीत पहिला आहे. या संस्थेत फक्त अभिनयाचेच बाळकडू पाजलं जातं असं नाही , तर बॅकस्टेजला असलेल्या अनेक कामात इकडे पारंगत केलं जातं. एखाद्या कलाकाराला कोणत्या क्षेत्रात जास्त रस आहे, हे पाहूनच त्यांना उत्तम शिक्षण दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मोफत शिक्षण इकडे दिलं जातं.

नाट्य कलासंस्कार

नाट्य कालसंस्कार ही नाट्यसंस्था लहान मुलांना नाटकाविषयी गोडी लावण्यात प्रसिद्ध आहे. जर तुमच्या मुलाच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळण्याकरता एखादी चांगली नाट्यसंस्था मिळावी असं तुम्हाला वाटत असेल नाट्य कलासंस्कार बेस्ट आहे. गेल्या 38 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या नाट्यसंस्थेने अनेक कलाकार तयार केलेत. मुलांना केवळ अभिनयच न शिकवता त्यांना इथे नाट्यलिखाणही शिकवलं जातं. त्यासाठी खास दर रविवारचे विशेष शिबिरे आयोजित करण्यात येतात. 

स्वतंत्र थिएटर

गेल्या दहा वर्षांपासून पुण्यात कार्यरत असलेली स्वतंत्र थिएटरमध्ये नाट्यकलेविषयी अगदी उत्तम ज्ञान दिलं जातं. यासाठी खास त्यांची तीन कोर्सेसही आहे. सहा महिने, एक वर्ष किंवा दोन वर्ष अशा कालावधीत तुम्ही इकडे अभिनयाचं शिक्षण घेऊ शकता. या कोर्सेसमधून तुम्ही मेंदू आणि शरिराचा व्यायाम, आवाज प्रशिक्षण, लिखाण आदी विषयही शिकू शकता. त्यांच्या कोर्ससाठी प्रवेश घेताना तुम्हाला आधी एक मुलाखत पार पाडावी लागते. या मुलाखतीत तुमचा कल नेमका कोणत्या दिशेला आहे हे पाहिलं जातं आणि मगच तुमचा प्रवेश निश्चित केला जातो.

र्‍हॅप्सोडी थिएटर

इंग्रजी नाटकांसाठी प्रसिद्ध असलेला र्‍हॅप्सोडी थिएटरला विशिष्ट नाट्यसंस्थेची ओळख नसली तरी या ग्रुपद्वारे अनेक शाळा आणि महाविद्यालयात नाट्य शिबिरे भरवली जातात. दिपक मोरीज हे या थिएटरचे सर्वेसर्वा असून त्यांनी या थिएटरमार्फत अनेक उपक्रम राबवले आहेत.

ऑक्रिस्ट्रेटेड क्यू वर्क

हिना सिद्दीकी यांच्यामार्फत चालणाऱ्या ऑक्रिस्ट्रेटेड क्यू वर्कतर्फे अनेकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केलं जातं. शिवाय अनेक संस्थामध्ये ही या ग्रुपतर्फे शिबिरेही घेतली जातात. तुमच्याकडे जर काही युनिक कल्पना असेल आणि तुम्ही एका योग्य ग्रुपच्या शोधात असाल तर ऑक्रिस्ट्रेटेड क्यू वर्क हा ग्रुप एकदम परफेक्ट आहे.