बंद  '' एक्स रे '' मशिनवर डॉक्टरांच्या बदल्यांचा उतारा :आरोग्य विभागाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:19 PM2019-07-02T14:19:53+5:302019-07-02T14:20:11+5:30

गाडीखाना दवाखान्यातील एक्स रे मशीन बंद असल्यामुळे टीबी, एड्ससह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे

Doctor's transfer on 'X-ray' machine closed : Health Department's order | बंद  '' एक्स रे '' मशिनवर डॉक्टरांच्या बदल्यांचा उतारा :आरोग्य विभागाचे आदेश 

बंद  '' एक्स रे '' मशिनवर डॉक्टरांच्या बदल्यांचा उतारा :आरोग्य विभागाचे आदेश 

Next
ठळक मुद्देडॉ. कोटणीस दवाखान्यातील मशीन दीड महिन्यांपासून बंदच      

पुणे : पालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रामधील (गाडीखाना) एक्स रे मशीन दीड महिन्यांपासून बंद पडलेली असून हे मशीन दुरुस्त करण्याऐवजी डॉक्टरांच्या बदल्या करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. आरोग्य कार्यालयाच्या मेडिकल युनिटच्या कामकाजाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्याचे कार्यालयीन आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.   गाडीखाना दवाखान्यातील एक्स रे मशीन बंद असल्यामुळे टीबी, एड्ससह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ही मशीन नादुरुस्त होऊन दीड महिना होत आला आहे. रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाला याबाबत कळविले होते. परंतू, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे चित्र आहे.पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरु करण्यात आलेल्या एक्स रे मशिन्सच्या सुविधेचे खासगीकरण करण्यात आलेले आहे. एका खासगी संस्थेला हे काम देण्यात आलेले आहे. त्यामुळे रुग्णांकडून ६० रुपयांपासून पुढे शुल्क आकारणी केली जाते. शासकीय आणि पालिकेच्या आरोग्य योजनांमधील रुग्ण आले तर त्यांना मोफत सेवा देणे बंधनकारक आहे. गाडीखाना दवाखान्यामध्ये कोणतेही शुल्क न आकारता एक्स रे मशिनची सुविधा पुरविली जात होती. परंतू, मशिनच बंद पडल्याने हे काम ठप्प झाले आहे.   साधारणपणे आठ-नऊ वर्षे जुने असलेले हे मशीन दीड महिन्यांपुर्वी बंद पडले. हे मशीन सुरु करण्यासाठी उत्पादक कंपनीकडून तपासणी करुन घेतल्यानंतर  दहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला. त्याचे कोटेशन गाडीखाना दवाखान्यातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाला पाठवून दिले होते. त्यावर अद्याप निर्णयच झाला नाही. मशीन दुरुस्त करणे अथवा नवीन मशीन खरेदी करण्याऐवजी आरोग्य विभागाने डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत.   
=चौकट=
डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रामधील रेडिओलॉजिस्ट डॉ. विद्या गायकवाड यांची पुढील आदेश होईपर्यंत कमला नेहरु रुग्णालयात तर अनुराधा कोकरे (आॅ. नर्स) यांची मित्र मंडळ चौकातील राजमाता जिजाऊ प्रसुतीगृहामध्ये बदली करण्यात आली आहे. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे आणि आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी हे आदेश दिले आहेत. 
 

Web Title: Doctor's transfer on 'X-ray' machine closed : Health Department's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.