डीएसके विश्वमधील मालमत्तेचा लिलाव, महाराष्ट्र बँकेचे थकविले कर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 11:41 AM2018-06-20T11:41:37+5:302018-06-20T11:41:37+5:30

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक आॅफ महाराष्ट्रचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकवले आहेत.

DKK Auction of Property, Maharashtra Bank's Tired Loan | डीएसके विश्वमधील मालमत्तेचा लिलाव, महाराष्ट्र बँकेचे थकविले कर्ज 

डीएसके विश्वमधील मालमत्तेचा लिलाव, महाराष्ट्र बँकेचे थकविले कर्ज 

googlenewsNext

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक आॅफ महाराष्ट्रचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकवले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने धायरीच्या डीएसके विश्वमधील गहाण ठेवण्यात आलेली मालमत्ता विक्रीस काढली आहे. तशी जाहिरात बँकेच्या वतीने आज वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकेने या जागेचा १ जून २०१८ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. 

लिलावात बोली लावण्यासाठी ८६ लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे. २१ जुलैपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज भरता येणार आहेत. २३ जुलैला डीएसके प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे.  गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसके आणि पत्नी हेमंती हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर त्यांचा पुत्र शिरीष कुलकर्णी याचा सोमवारी अटकपूर्व अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल २ हजार ४३ कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर काही दिवसांपूर्वीच ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

डीएसकेकडील वसुलीसाठी विशेष न्यायालयात क्लेम करावा

डी.एस. कुलकर्णी यांच्या २७६ मालमत्ता आणि ४६ गाड्या शासनाने जप्त केल्या असून त्याच्यावर कोणाचा क्लेम असेल तर त्यांनी त्यासाठी जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायालयात आपला दावा सादर करावा, अशी माहिती मावळचे प्रांत आणि विशेष अधिकारी सुभाष भागडे यांनी सांगितले. डी.एस. कुलकर्णी यांच्या मालमत्ता शासनाने जप्त करुन तशी अधिसूचना काढली आहे. तसेच या २७६ मालमत्ता व ४६ गाड्यांच्या यादीसह शपथपत्र विशेष न्यायालयात सादर केले आहे. बँकांना या बाबत माहिती नसल्याने त्यांनी त्यांच्याकडे जप्त असलेल्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली असेल. मात्र, या मालमत्तांची विक्री होऊ नये, यासाठी संबंधित तहसिलदारांना शासनाचे पत्र देण्यात आले आहे. जप्त केलेल्या गाड्या या नाशवंत असल्याने व त्या डी.एस. कुलकर्णी  यांच्या मालकीच्या असून त्यावर अन्य कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव करायला परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, असे सुभाष भागडे यांनी सांगितले.

Web Title: DKK Auction of Property, Maharashtra Bank's Tired Loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.