पुणे : ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ यासाठी आता नागरिकांना आपल्या भागातील ऐतिहासिक वास्तंूच्या विकासात सहभाग घेता येईल. अशा वास्तूंसाठी ते नागरिकांचा सहभाग या अंदाजपत्रकातील शीर्षकासाठी कामे सुचवू शकतात; मात्र या कामांना खर्चाची मर्यादा टाकण्यात आली आहे. तरीही सुरुवात म्हणून ही चांगली गोष्ट असल्याचे पदाधिकारी व अधिका-यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या अंदापत्रकात ‘नागरिकांचा सहभाग’ हे लेखाशीर्ष वापरण्यात येते. यामध्ये प्रभागातील नागरिकांनी त्यांना प्रभागात आवश्यक वाटणारी कामे सुचवणे अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या कामांसाठी प्रत्येक प्रभागाला १ कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. एका प्रभागात ४ वॉर्ड याप्रमाणे प्रत्येक वॉर्डासाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तरतूद येते. ही तरतूद फक्त नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठीच वापरण्यात येते. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या या कल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
असे असले, तरीही या कामांना व त्यासाठीच्या खर्चालाही मर्यादा आहेत. एका व्यक्तीला एकच काम सुचवता येते. त्यासाठी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येत नाही. कामांचे स्वरूप किरकोळ म्हणजे गल्लीतील एखाद्या कोपºयाचे डांबरीकरण, गटारीवरची जाळी बसवणे असेच असते. अगदी अपवाद म्हणून एखादे चांगले काम सुचवलेले असते. त्यामुळे आता त्या त्या प्रभागातील ऐतिहासिक वास्तूच्या भोवतालची काही कामेही नागरिकांना सुचवता येतील, अशी सुधारणा यात करण्यात आली आहे.

बहुतेक प्रभागांमध्ये ऐतिहासिक वास्तू असतात. त्याची पडझड झालेली असते. महापालिकेने अशा वास्तूंच्या विकासासाठी हेरिटेज सेल तयार केला आहे. त्याला महापालिका स्वतंत्र आर्थिक तरतूद करून देते. त्यातून कामे होतच असतात; मात्र वास्तू भोवतालच्या कामांसाठी पैसे खर्च करता येत नाही. ती उणीव आता या नागरिकांस सहभाग अंदाजपत्रकातून दूर करता येणार आहे. त्याप्रकारची कामे नागरिक सुचवू शकतात. नगरसेवकांकडून आपल्या प्रभागातील नागरिकांना या अंदाजपत्रकातील त्यांच्या सहभागाची माहिती दिली जावी, असे प्रशासनाला अपेक्षित आहे; मात्र असे काही न होताही नागरिकांकडून या योजनेसाठी चांगला सहभाग मिळतो आहे, दरवर्षी त्यात वाढ होत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

एका व्यक्तीने काही ऐतिहासिक दस्तऐवज मोडीत भाषांतर करण्याचे काम यात सुचवले आहे. त्यासाठी बराच पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे ही सुधारणा झाली आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून, तो आपल्या प्रभाग समिती कार्यालयात द्यायचा आहे. समितीच्या सभेत त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
- उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी