बारामतीच्या वेशीत विकास; वेशीबाहेर भकास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:46 PM2019-04-12T12:46:13+5:302019-04-12T12:55:26+5:30

सुजलाम-सुफलाम बारामती, चकचकीत-झगमगाट,  राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय उद्योग, व्यवसाय, बँका, शोरुम हे बारामती तालुक्याचे खरे चित्र नसल्याचे प्रकाशाने जाणवले.

Development in Baramati; Out of city no development | बारामतीच्या वेशीत विकास; वेशीबाहेर भकास

बारामतीच्या वेशीत विकास; वेशीबाहेर भकास

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यात विषमतेची प्रचंड दरीदुष्काळग्रस्त गावातून दबक्या आवाजात तर प्रगत गावांमधून जाहीरपणे बदलाची चर्चा              रोजगार नसल्याने तरुण पिढीच्या भविष्याचा गंभीर प्रश्न,

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : बारामती तालुक्यात काही मिनिटाच्या अंतरावर विषमतेची, विकासाची प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे. सुजलाम-सुफलाम बारामती, चकचकीत-झगमगाट,  राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय उद्योग, व्यवसाय, बँका, शोरुम हे बारामती तालुक्याचे खरे चित्र नसल्याचे प्रकाशाने जाणवले. प्रचंड दुष्काळग्रस्त भाग, पिण्याच्या पाण्यासाठी आठ-आठ दिवस टँकरची वाट पाहावी लागते. जनावरांच्या चा-याचा व पाण्याची गंभीर समस्या,   दोन-दोन वर्ष शेतीत पाचाट पण उगवलेले नाही,  रोजगार नसल्याने तरुण पिढीच्या भविष्याचा गंभीर प्रश्न, दहा-पंधरा एकर जमिनी असूनही खायचे हाल असे भयाण वास्तव बारामती तालुक्याचा दौरा करताना समोर आले.
    बारामती शहर व लगतच्या माळेगाव, सोमेश्वर, निंबूत, वडगाव निंबाळकर आदी गावांमध्ये दिवसरात्र पाण्याचा धो-धो वापर, सर्वत्र प्रचंड पाणी लागणा-या ऊसाची, फळबागांची लागवड, सर्वत्र हिरवीगार शेती तर दुसरीकडे केवळ काही मिनिटांच्या अंतरावर १०-१५ किलोमीटर अंतरावर सुरु होणारे अंजनगाव, जळगाव-सुपे, क-हाटी, तरडोली, पवार वाडी, बाबुर्डीसह दुष्काळग्रस्ता २२ गावे व वाड्यावस्त्यांमध्ये  आठ-पंधरा दिवसांतून सहा-आठ लोकांच्या कुटुंबासाठी मिळणारे केवळ ५०० लिटर पाणी, सलग दोन वर्षे पावसाने दडी दिल्याने शेतात काही उगवले नाही, बारामती शहरात व लगतच्या परिसरात दूधाचे मोठ-मोठे धंदे, डीअरी व्यवसाय पण या दुष्काळग्रस्त भागात पाणी व चा-या अभावी लाख-लाख, दीड-दीड लाखांची जनावरे दहा अन् वीस हजारांमध्ये विकायची वेळ आली. बारामती एमआयडीसीतील विविध कंपन्या, टेक्सटाईल पार्क अन्य उद्यागे व्यावसायमुळे रोजगाराच्या उपलब्ध झालेल्या विविध सुविधा, यानिमित्त देशाच्या विविध भागातून आलेले कामगार यामुळे स्थानिक लोकांनी सुरु केलेले लहान-मोठे उद्योग धंदे, तर दुसरीकडे शेतात काही उगवत नसल्याने, जनावरांना चारा-पाणी देणे कठीण झाल्याने हजारो हातांना काम नाही, रोजगारा अभावी तरुण पिढी सैरभैर झाली. सधन शेतक-यांची वाढती मागणी व उद्योग-व्यवसायामुळे आलेल्या भरभराटीमुळे सर्व अलिशान गाड्यांच्या शो-रुमध्ये होणारी गर्दी तर दुसरीकडे साधी दुचाकी घेण्यासाठी मारामार, बरामती शहर व लगतच्या परिसरामध्ये वाढत असलेला हॉटेल व्यवसाय, टु स्टार, थी्र स्टार हॉटेलस् तर दुसरीकडे रोजच्या रोजी-रोटीसाठी रोजगार हमीचा आधार,  तालुक्यातील तरुणपिढीच्या विकासासाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था, उच्च शिक्षणाच्या संधी, पण परिस्थिती व सततच्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे साधे प्राथमिक शिक्षण घेणे कठीण अशी सर्वच सामाजित, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासाच्या प्रत्येक ठिकाणी बारामती तालुक्यात काही किलोमीटरच्या अंतरामध्ये विषमतेची प्रचंड मोठी दही तयार होत असल्याचे लोकमतच्या पहाणी दौ-यामध्ये निदर्शनास आली.
-----------------
सदन भागाकडून पाण्याचा धंदा
नीरा -डाव्या कालव्यामुळे सदन झालेल्या बारामती शहर, माळेगाव, सोमेश्वर, वडगाव निंबाळकर व लगतच्या काही गावांमधील लोकांनी पाण्याचा धंदा सुरु केला आहे. प्रामुख्याने दुष्काळग्रस्ता गावांच्या लगत असलेल्या सुपिक भागात जगो-जागी पाण्याच्या बाटल्यांचे प्लॅंट टाकण्यात आलेल्याचे निदर्शनास आले. या पाण्याचे प्लॅंट वाल्याचे सर्वांत मोठे  गि-हाईक हे दुष्काळग्रस्त २२ गावांतील शेतकरीच आहेत. सरकारकडून आठ-दहा दिवसांतून टँकरद्वारे ५००-६०० लिटर पाणी मिळत असल्याने नाईलाजाने अनेक वेळा ३० रुपयांचा बाटला घ्यावा लागतो. 
----------------------------
चारा छावण्या सुरु करण्याची मागणी
गेल्या दोन वर्षांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांमध्ये पाण्याअभावी शेतीत मूठ भर धान्य उगवले नाही. विहिरी, बोरवेलवर आता पर्यंत जनावरांचा चारा-पाणी भागवले. परंतु आता विहिरीच्या पाण्याने देखील तळ गाठला आहे. पिण्यासाठी विकत पाणी घेऊन कसेबसे जगू शकतो. पण जनावरांचे काय त्याच्या पाण्याचा व चा-याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे या अंजनगाव, लोणी भापकर, क-हावागज, का-हाटी, देऊळगाव रसाळ आदी सर्वच गावांमधून तातडीने चारा छावण्या सुरु करण्याची मागणी वाढू लागली आहे.
------------------
पोटापाण्यासाठी रोजगार हमीचा आधार
 बारामती शहरापासून १५ ते २० किलो मिटरवर असलेल्या जळगाव सुपे या एका गावांमध्ये तब्बल २०० ते २५० लोक रोजगार हमीच्या कामावर जातात. जमिनी सपाटीकरणाच्या कामावर महिला, पुरुष काम करतात. शासनाकडून बोर्डावर २०६ रुपये रोजगार देण्यात येत असल्याचे सांगितले तरी प्रत्यक्ष १०० ते १५० रुपयेच मिळत असल्याचे महिलांनी सांगितले.
--------------------
तुम्ही सांगा कुणाला मत द्यायच
दुष्काळग्रस्त भागातून फिरताना राजकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे चकट सहन करुन देखील त्याचा विरोधामध्ये जाहीरपणे बोलण्याची हिमंत लोकांमध्ये नाही. लोकांना निवडणुकी विषय विचारल्यावर तुम्ही ताईची माणसे का , तुम्ही सांग कुणाला मत द्यायच असे अशी सहज प्रतिक्रिया आली. तर पवार वाडी गावात शाळेच्या ओड्यावर बसलेल्या काही आजोबांनी इतकी वर्षे त्याचा बरोबर राहिलो पण आमच्या जगण्यात काही बद्दल झाला नाही. आता पाच वर्षांत काय होणार. त्यामुळे स्पष्टपणे कोणी बोलण्यास तयार नव्हते. तर वडगाव निबांळकर, निंबून भागातून रस्त्यावर थांबून लोक आम्हाला आता बदल पाहिजे जाहीरपणे सांगत होते. बारामती शहरामध्ये मात्र पवारामुळे आमचा विकास झाल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले. तर एका वडगाव निंबाळकर येथील एका चहावाल्याने तालुक्यात बदल झालात तर पाणी मिळणे कठीण होईल सांगितले.
.................


  

 
 

Web Title: Development in Baramati; Out of city no development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.